घरताज्या घडामोडीIndia Corona Update: देशात बाधितांच्या संख्येत वाढ; गेल्या २४ तासात ४ लाख...

India Corona Update: देशात बाधितांच्या संख्येत वाढ; गेल्या २४ तासात ४ लाख १४ हजारांहून अधिकांची नोंद

Subscribe

देशभरात सध्या कोरोनाचा उद्रेक सुरू असून दररोज मोठ्या संख्येने कोरोनाबाधित रूग्ण आढळून येत आहे. तर रूग्णांच्या मृत्यूंच्या संख्येतही मोठी भर पडताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर आता अनेक राज्यांमध्ये पुन्हा एकदा लॉकडाऊनची घोषणा देखील केली आहे. गुरूवारी देशात ४ लाख १२ हजार २६२ नव्या कोरोना बाधितांची नोंद करण्यात आली तर ३, ९८० जणांचा कोरोनाने बळी गेल्याचे समोर आले होते. त्यानंतर गेल्या २४ तासात देशातील कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ झाल्याचे समोर आले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, दिवसभरात ४ लाख १४ हजार १८८ नव्या कोरोना बाधितांची नोंद करण्यात आली तर ३,९१५ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला. त्यामुळे देशात बाधितांचा एकूण आकडा वाढून २ कोटी १४ लाख ९१ हजरांवर पोहोचला आहे तर एकूण २ लाख ३४ हजार ८३ जणांचा आतापर्यंत बळी गेला आहे.

- Advertisement -

देशात कोरोनाचा फैलाव वेगाने सुरू असताना देशात सध्या ३६ लाख ४५ हजार १६४ इतके सक्रिय रूग्ण असून त्यांच्यावर कोरोनाचे उपचार सुरू आहे. या काळात दिलासादायक बाब म्हणजे १ कोटी ७६ लाख १२ हजारांहून अधिकांनी कोरोनावर मात केली आहे. यासह देशभरात कोरोना लसीकरण मोहीम वेगात सुरू असताना आतापर्यंत १६ कोटी ४९ लाख ७३ हजारांहून अधिक नागरिकांना कोरोनाची लस घेतली आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात केवळ लसीचे सर्वाधिक डोस देण्यात महाराष्ट्र अव्वल नाही तर राज्यातील २८ लाख ६६ हजार ६३१ नागरिकांना दोन्ही डोस देऊन त्यांना संरक्षित करण्याकामीही महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर आहे. आजपर्यंत लसीकरण मोहिमेत १ कोटी ६७ लाख ८१ हजार ७१९ डोस देण्यात आले आहेत. महाराष्ट्र पाठोपाठ राजस्थान (१ कोटी ३५ लाख ९७ हजार), गुजरात (१ कोटी ३२ लाख ३१ हजार), पश्चिम बंगाल (१ कोटी १४ लाख ७५ हजार), कर्नाटक (१ कोटी १ लाख ११ हजार) इतके लसीकरण झाले आहे.

यासह राज्यात गेल्या २४ तासात ६२ हजार १९४ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ८५३ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यातील आता एकूण कोरोनाबाधितांची संख्या ४९ लाख ४२ हजार ७३६वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ७३ हजार ५१५ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच आज दिवसभरात ६३ हजार ८४२ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून राज्यात आजपर्यंत एकूण ४२ लाख २७ हजार ९४० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -