कोरोनाचा विस्फोट! ऑक्टोबरनंतर देशात आढळले सर्वाधिक रुग्ण, मृतांचा आकडा ४०० पार

India reports 72,330 new Covid-19 cases, 459 deaths in 24 hours
कोरोनाचा विस्फोट! ऑक्टोबरनंतर देशात आढळले सर्वाधिक रुग्ण, मृतांचा आकडा ४०० पार

देशात पुन्हा एकदा कोरोनाचा व्हायरसने पाय पसरायला सुरुवात केली आहे. कोरोनाची दुसरी लाट आल्याचे म्हटले जात आहे. सातत्याने नव्या कोरोनाबाधितांची झपाट्याने वाढ होत आहे. देशात ऑक्टोबर २०२०नंतर आज सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर वर्षांतील सर्वाधिक कोरोना बळी काल दिवसभरात झाले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा कोरोनामुळे चिंता वाढताना दिसत आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत ७२ हजार ३३० नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ४५९ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ४० हजार ३८२ जण रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे आता देशातील कोरोनाबाधितांची संख्या १ कोटी २२ लाख २१ हजार ६६५वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत १ लाख ६२ हजार ९२७ जणांचा मृत्यू झाला असून १ कोटी १४ लाख ७४ हजार ६८३ जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या ५ लाख ८४ हजार ५५ रुग्णांवर उपचार सुरू आहे. तसेच आतापर्यंत ६ कोटी ५१ लाख १७ हजार ८९६ जणांचे लसीकरण झाले आहे.

३१ मार्चपर्यंत २४ कोटी ४७ लाख ९८ हजार ६२१ नमुन्यांच्या चाचण्या झाल्या आहेत. यापैकी काल दिवसभरात ११ लाख २५ हजार ६८१ नमुन्यांच्या चाचण्या झाल्या आहेत, अशी माहिती आयसीएमआरने दिली आहे.


हेही वाचा – Corona Vaccination: मुंबईत दोन शिफ्टमध्ये कशा पद्धतीने होणार लसीकरण?