घरदेश-विदेशभारत नेहरू-गांधींनी निर्माण केलेल्या व्यवस्थेवर तग धरुन; सेनेचा केंद्रावर निशाणा

भारत नेहरू-गांधींनी निर्माण केलेल्या व्यवस्थेवर तग धरुन; सेनेचा केंद्रावर निशाणा

Subscribe

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशाच्या आरोग्य यंत्रणा खिळखिळी झाली आहे. लोकांचा ऑक्सिजनअभावी, औषधांअभावी मृत्यू होतोय. या पार्श्वभूमीवर शिवसेनेने केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. भारत नेहरू-गांधींनी निर्माण केलेल्या व्यवस्थेवर तग धरुन आहे, असं शिवसेनेने म्हटलं आहे. मागील १० दिवसांत हिंदुस्थानात ३६ हजार ११० कोरोना बळी गेले. हे आकडे धडकी भरवणारे आहेत. अमेरिका, ब्राझिलला आपण मागे टाकले. हे चित्र बरे नाही. जगाला आता भारताची भीती वाटू लागली आहे. भारतात जाण्यापासून व्यापार-उद्योग करण्यापासून त्या देशांनी आपल्या लोकांना रोखले आहे. भारतात विमान आणि प्रवासबंदी केली. याचा आर्थिक फटका भारताला बसत आहे. तरीही देश तग धरून राहिलाय तो ७० वर्षांपासून पंडित नेहरू, शास्त्री, इंदिराजी, राजीव गांधी, नरसिंह राव, मनमोहन सिंग यांनी उभ्या केलेल्या योजना, प्रकल्प व आत्मविश्वासावरच. ती पुण्याई मोठी आहे, अशा शब्दांत शिवसेनेने काँग्रेसच्या नेतृत्वाचं कौतुक करत केंद्रावर निशाणा साधला आहे.

भारतापासून जगाला धोका असल्याची चिंता आता ‘युनिसेफ’नेही व्यक्त केली आहे. कोरोना ज्या वेगाने भारतात पसरत आहे त्यापासून संपूर्ण जग संकटात येईल. त्यामुळे भारताला कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी इतर देशांनी जास्तीत जास्त मदत करावी, असे युनिसेफतर्फे सांगण्यात आले आहे. बांगलादेशने भारताला १० हजार रेमडेसिवीर वायल्स देणगीदाखल पाठवले. भूतानसारख्या देशाने ऑक्सिजन पाठवला. नेपाळ, म्यानमार, श्रीलंकासारखे देशही आत्मनिर्भर भारताला मदतीचा हात पुढे करीत आहेत. स्पष्ट सांगायचे तर आजही भारत तग धरून आहे तो नेहरू-गांधी यांनी निर्माण करून ठेवलेल्या व्यवस्थेवर. नाहीतर कोरोनाच्या लाटेत सव्वाशे कोटी लोक कधीच नष्ट झाले असते, असं स्पष्ट मत शिवसेनेने व्यक्त केलं आहे. राज्यकर्त्यांच्या चुकीच्या धोरणांमुळे ही वेळ आत्मनिर्भर म्हणवून घेणाऱ्या भारतावर आली, अशी टीका देखील शिवसेनेने केली आहे.

- Advertisement -

गोरगरीब देश आपल्याला त्यांच्या ऐपतीने किडुकमिडुक मदत करीत असले तरी आपले सन्माननीय पंतप्रधान महोदय २० हजार कोटींचा महत्त्वाकांक्षी ‘सेंट्रल विस्टा’ प्रकल्प थांबवायला तयार नाहीत. दिल्लीत नवे संसद भवन, त्यात पंतप्रधानांचा नवाकोरा महाल या योजनांवर हजारो कोटी रुपये उधळायचे व त्याच देशाने बांगलादेश, भूतान, श्रीलंकासारख्या देशांकडून कोरोना निवारणासाठी मदत स्वीकारायची, याची खंत कोणाला वाटू नये याचे आश्चर्य वाटते, असं शिवसेनेनं म्हटलं आहे.

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -