IndiavsBharat : राष्ट्रपती भवनात 9 सप्टेंबर रोजी होणाऱ्या G-20 डिनरच्या निमंत्रण पत्रिकेत ‘इंडियाचे राष्ट्रपती’ असे लिहिण्याऐवजी ‘भारताचे राष्ट्रपती’ असे लिहिण्यात आले आहे. त्यामुळे आता ‘इंडिया विरुद्ध भारत’ (India vs Bharat) असा नवा वाद सुरू झाला आहे. विरोधकांनी आपल्या युतीला ‘इंडिया’ नाव दिल्यानंतर मोदी सरकारकडून हे सर्व केले जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. याशिवाय सध्याचे मोदी सरकार राज्यघटनेतून ‘इंडिया’ हा शब्दही काढून टाकू शकते, अशी भीतीही विरोधकांनी व्यक्त केली आहे. मात्र भाजपाच्या अनेक नेत्यांनीही नाव बदलले तर अडचण काय? असा प्रश्न उपस्थित केला आहे. हा सर्व वाद-विवाद सुरू असताना भारताने ‘इंडिया’ नाव सोडल्यास पाकिस्तान त्यावर दावा करू शकते, अशी माहिती समोर येत आहे. ‘साऊथ एशिया इंडेक्स’ (South Asia Index) यांनी याबाबतचे ट्वीट केले आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. (India vs Bharat Will Pakistan claim if India gives up the name India This tweet sparks discussion)
पाकिस्तानच्या स्थानिक मीडियाचा हवाला देताना साऊथ एशिया इंडेक्सने आपल्या ट्वीटमध्ये म्हटले की, जर भारताने ‘इंडिया’ हे नाव सोडले तर, पाकिस्तान त्यावर आपला हक्क सांगू शकतो. तथापि, पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिना यांनी देशाच्या फाळणीच्या वेळी ‘इंडिया’ नावावर आक्षेप घेतला होता. तर दुसरीकडे बऱ्याच काळापासून पाकिस्तानमधील राष्ट्रवादी गट ‘इंडिया’ नावावर दावा करत आहेत. कारण ‘इंडिया’ हे नाव सिंधू नदीच्या इंग्रजी नाव इंड्स यावरून आले आहे आणि सध्या ही नदी फक्त पाकिस्तानमध्ये वाहते.
हेही वाचा – INDIA आघाडीच्या मोठ्या बैठकांना आता पूर्णविराम; समन्वय समिती साधणार ‘समन्वय’
असा झाला वाद सुरू?
मंगळवारी (5 सप्टेंबर) जी-20 परिषदेच्या निमंत्रणाची छायाचित्रे समोर आली. ज्यात सर्व प्रतिनिधींना डिनरसाठी बोलावण्यात आले आहे. भारताच्या राष्ट्रपतींनी पाठवलेल्या कार्डवर सहसा ‘इंडियाचे राष्ट्रपती’ असे लिहिलेले असते, मात्र यावेळी ‘भारताचे राष्ट्रपती’ असे लिहिण्यात आले आहे. याचपार्श्वभूमीवर काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी ट्वीट करत मोदी सरकारवर आरोप केले आहेत आणि संविधानाच्या कलम 1 ची आठवण करून दिली आहे. ज्यामध्ये देशाच्या नावाचा उल्लेख आहे.
Just IN:— Pakistan may lay claim on name “India” if India derecongnises it officially at UN level. – local media
— Nationalists in Pakistan have long argued that Pakistan has rights on the name as it refers to Indus region in 🇵🇰.
— South Asia Index (@SouthAsiaIndex) September 5, 2023
इंडिया नावावरून आरोप-प्रत्यारोप
जयराम रमेश यांच्या ट्वीटनंतर भाजपाच्या अनेक नेत्यांनी त्यांना प्रत्युत्तर देताना आम्ही नव्या दिशेने वाटचाल करण्यासाठी घेण्यात आलेल्या निर्णयाचे स्वागत करत असल्याचे म्हटले. यानंतर ‘इंडिया’ नावावरून वाद सुरू झाला. विरोधकांनी आरोप केला की, युतीचे नाव ‘इंडिया’ केल्यामुळेच देशाचे नाव बदलण्याचा मोदी सरकार प्रयत्न करत आहे. मात्र दुसरीकडे भाजपा नेत्यांचे म्हणणे आहे की, ‘इंडिया’ हे नाव गुलामगिरीचे प्रतीक आहे आणि आम्ही त्यातून पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहोत. ही चांगली गोष्ट आहे. असे असले तरी ‘इंडिया’ नाव बदलण्याबाबत अद्याप कोणतीही औपचारिक प्रक्रिया मोदी सरकारकडून सुरू करण्यात आलेली नाही.
हेही वाचा – संसदेच्या विशेष अधिवेशनावरून सोनिया गांधीचं पंतप्रधानांना पत्र; ‘या’ मुद्द्यावर वेधलं लक्ष
‘इंडिया’ नावाचा इतिहास?
1947 मध्ये ‘इंडिया’ आणि ‘पाकिस्तान’ अशी फाळणीची प्रक्रिया सुरू होती, तेव्हा एका कार्यक्रमात मोहम्मद अली जिना यांना पाकिस्तानचे गव्हर्नर जनरल आणि लॉर्ड माउंटबॅटन यांना भारताचे गव्हर्नर जनरल म्हणून बोलावण्यात आले होते. या कार्यक्रमात कुठेतरी ‘इंडिया’ नाव लिहिलेले पाहून जिनांना राग आला. यावेळी त्यांनी माउंटबॅटन यांना पत्र लिहिताना म्हटले की, भारताने ‘इंडिया’ हा शब्द स्वीकारला. मात्र ही खेदाची आणि निश्चितच दिशाभूल करणारी बाब आहे.’ विशेष म्हणजे फाळणीपूर्वी ‘युनियन ऑफ इंडिया’ या नावावरही मुस्लिम लीगने आक्षेप घेतला होता. संविधान सभेतही ‘इंडिया’ नावाबाबत अनेक वादविवाद झाले. मात्र, कोणत्याही एका नावावर कोणताही करार न झाल्यानंतरच इंडिया आणि भारत ही दोन्ही नावे वापरण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळेच संविधानात ‘इंडिया म्हणजे भारत’ असे लिहिले गेले आहे.