मुंबई : ‘इंडिया’चे पंतप्रधान म्हणून नेहरूंपासून मोदींपर्यंत सगळेच जगभरात मिरवले. त्या ‘इंडिया’ नावाविषयी इतका द्वेष मोदी सरकारच्या मनात ठासून भरला जावा, याचे आश्चर्य वाटते. देशातील प्रमुख 27 राजकीय पक्ष मोदी सरकारच्या हुकूमशाही कारभाराविरुद्ध एकत्र आले. त्यांनी आपल्या आघाडीचे नाव ‘इंडिया’ ठेवले. इंडिया आघाडीशी सामना करता येणे कठीण. त्यामुळे हुकूमशहांनी देशाचे ‘नाव’ बदलून टाकले, अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे.
हेही वाचा – ‘स्वतःला पोलादी पुरुष म्हणवून घेणारे तकलादू…’, उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका
आपल्या देशाच्या घटनेने मंजूर केलेल्या ‘नावा’लाच घाबरणारे सरकार आम्ही प्रथमच पाहिले. मोदींच्या सरकारने ‘इंडिया’चे नामांतर परस्पर करून रिपब्लिक ऑफ भारत केले. ‘जी-20’ या करमणुकीच्या कार्यक्रमात President of Republic of Bharat अशा नावाने त्यांनी निमंत्रणे छापून टाकली. तेव्हा देशाला कळले की, घटनेने दिलेले, सगळ्यांनी मान्य केलेले व जगात प्रसिद्ध असलेले ‘इंडिया’ हे नाव भाजपा पुसून टाकायला निघाला आहे, असे खासदार संजय राऊत यांनी सामना दैनिकातील आपल्या रोखठोक सदरात म्हटले आहे.
हेही वाचा – सरकारचे हे कामही 50% कमिशनवर होते का? जी-20च्या गैरव्यवस्थापनावरून काँग्रेसचा निशाणा
‘इंडिया’ बदलून भारत केले, पण घटनेत इंडिया आणि भारत अशा दोन्ही नावांना मान्यता आहे. भारतीय संविधानाच्या अनुच्छेद-1 मध्ये स्पष्ट लिहिले आहे, “इंडिया अर्थात भारत. राज्यांचा संघ असेल.” त्यामुळे मोदी किंवा संघाच्या मनात आले म्हणून ‘इंडिया’ हे नाव नष्ट करता येणार नाही, पण ‘जी-20’ संमेलनासाठी सरकारने जो दस्तावेज तयार केला त्यात देशाचे नाव ‘भारत’ असे करण्यात आले. ‘जी-20’ साठी येणाऱ्या प्रतिनिधींसाठी पुस्तिका तयार करण्यात आली. त्यात म्हटले आहे, “भारत हेच देशाचे अधिकृत नाव आहे. त्याचा उल्लेख संविधान आणि 1946-48मधील संविधान सभेतील चर्चेत करण्यात आला आहे,” असे त्यांनी नमूद केले आहे.
हेही वाचा – मोदी सरकारच्या मनात आले म्हणून…, संजय राऊत यांची भाजपावर घणाघाती टीका
‘भारत द मदर आाफ डेमाक्रसी’ या शीर्षकाच्या पुस्तिकेतसुद्धा विदेशी प्रतिनिधींना हेच सांगण्याचा प्रयत्न केला. “भारत म्हणजेच इंडियातील शासनास लोकांची सहमती आवश्यक आहे व ही पद्धत प्राचीन काळापासून भारतवासीयांच्या जीवनाचा हिस्सा बनली आहे,” असे या पुस्तिकेत म्हटले, पण इंडियाचे ‘भारत’ करताना सरकारने लोकांची सहमती अजिबात घेतली नाही. 27 पक्ष एकत्र येऊन त्यांनी ‘इंडिया’ आघाडी स्थापन केली नसती तर ‘भारत’ हा विचार त्यांच्या मनास शिवला नसता, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.