खलिस्तान समर्थकांकडून ऑस्ट्रेलियातील भारतीय दूतावास लक्ष्य, हिंदूविरोधी घोषणा

ब्रिस्बेन : ऑस्ट्रेलियाच्या ब्रिस्बेनमधील भारतीय वाणिज्य दूतावासाजवळ (Indian Consulate in Brisbane) खलिस्तान (Khalistan) समर्थक अनधिकृतपणे जमले आणि त्यांनी कार्यालयातील प्रवेश रोखून धरला. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव बुधवारी दूतावास बंद ठेवावे लागले. काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज (Australian PM Anthony Albanese) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भारतविरोधी समाजकंटकांना आळा घालण्याचे आश्वासन दिले होते.

ऑस्ट्रेलियातील भारतीय समुदायाविरुद्ध सुरू असलेल्या कट्टरपंथी कारवायांच्या मालिकेतील ही आणखी एक घटना आहे. खलिस्तान समर्थकांनी ब्रिस्बेनच्या तारिंगा उपनगरातील स्वान रोडवरील (Swann Road in Taringa) वाणिज्य दूतावासाचे प्रवेशद्वार रोखले आणि दूतावास बंद करण्यास भाग पाडले. हा अनधिकृतरीत्या जमलेला जमाव होता, असे सांगतानाच आम्ही याप्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली असल्याचे क्वीन्सलँड पोलिसांनी सांगितले.

‘द ऑस्ट्रेलिया टुडे’च्या वृत्तानुसार, खलिस्तान समर्थक झेंडे, पोस्टर आणि बॅनर घेऊन भारतीय दूतावासाजवळ पोहोचले. त्यांनी लोकांना वाणिज्य दूतावासात प्रवेश करण्यास रोखले. त्यामुळे वाणिज्य दूतावासात काम होऊ शकले नाही. या समाजकंटकांनी ‘खलिस्तान झिंदाबाद’बरोबरच हिंदूंविरोधातही घोषणाबाजी केली. खलिस्तान समर्थकांनी गेल्या महिन्यात, 21 फेब्रुवारीला ब्रिस्बेन येथील भारतीय वाणिज्य दूतावासावर हल्ला केला होता.

तर, शीख फॉर जस्टिसने प्रवेश रोखल्याने सुरक्षेच्या कारणास्तव भारतीय वाणिज्य दूतावास आज बंद करणे भाग पडले, असे हिंदू मानवाधिकारच्या संचालक सारा एल गेट्स यांनी सांगितले. या परिसरात आता पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

हिंदूंना घाबरवण्याचा प्रयत्न
काही दिवसांपूर्वी खलिस्तान समर्थकांनी ब्रिस्बेनमधील एका हिंदू मंदिरालाही लक्ष्य केले होते. मार्चच्या सुरुवातीला खलिस्तान समर्थकांनी श्री लक्ष्मी नारायण मंदिराची तोडफोड केली होती. ऑस्ट्रेलियातील हिंदूंना धमकावण्याचा हा प्रयत्न असल्याचे हिंदू मानवाधिकार संचालक सारा गेट्स यांनी स्पष्ट केले. या हल्ल्यानंतर हिंदूंनी मंदिराच्या भिंतींवरून हिंदूविरोधी घोषणा पुसून टाकल्या. गेट्स यांनी त्याचा एक फोटो ट्वीट करून हिंदुस्थान झिंदाबाद असे लिहिले.