नवी दिल्ली : एका आईने तिच्या दोन वर्षाच्या लेकीसाठी दोन सुपरफास्ट एक्स्प्रेसला थांबविल्याची घटना नवी दिल्ली ते इटावा स्थानकादरम्यान घडली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, या दोन्ही एक्स्प्रेसना इटावा स्थानकात थांबा नव्हता, पण मुलीसाठी आईने प्रयत्नांची पराकाष्ठा करत दोन्ही एक्सप्रेस थांबवल्या. गुल्हा शहा असे या महिलेचे नाव असल्याची माहिती समोर आली असून ती आपल्या कुटुंबासोबत ट्रेन क्रमांक 12562 स्वतंत्र सेनानी एक्स्प्रेसने मधुबनीला जाणार होती. (Indian Railway Mother stopped two superfast express for Daughter, what exactly happened in Delhi?)
मिळालेल्या माहितीनुसार, बिहारमधील मधुबनी येथील रहिवासी असलेले नकीर उल हसन, त्यांची पत्नी गुल्फा शहा, त्यांची दोन वर्षांची मुलगी आणि काही नातेवाईक नवी दिल्लीहून ते वास्तव्यास असलेल्या मधुबनी येथे प्रवास करत होते. हे कुटुंब दिल्ली रेल्वे स्टेशनवर आल्यानंतर याचवेळी ट्रेन क्रमांक 12276 प्रयागराज दुरंतो आली. ज्यामध्ये मानसिक आजारी असलेले महिलेचे पती नकीर उल हसन चढले. पण पती मुलीला घेऊन चुकीच्या ट्रेनमध्ये चढत असल्याचे पाहून गुल्फा शहा ओरडू लागल्या. पण तोपर्यंत ती ट्रेन निघाली होती. ज्यानंतर गुल्फा शहा यांनी याबाबतची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांना दिली. तसेच, मुलगी पतीसोबत असली तरी पती मानसिकरित्या आजारी असल्याची माहिती गुल्फा यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना दिली.
हेही वाचा… Nepal : नेपाळच्या काठमांडूमध्ये विमानाचे इमर्जन्सी लँडिंग; आग लागली अन्…
गुल्फा शहा यांनी अधिकाऱ्यांना तर याबाबतची माहिती दिलीच पण याचसोबत तिच्यासोबत प्रवास करत असणाऱ्या तिच्या नातेवाईकांनी याबाबतची माहिती रेल्वेच्या ट्विटर आणि रेल्वे हेल्प साइटवर टाकली. यानंतर कंट्रोल रुमने दुरांतो एक्स्प्रेसच्या लोको पायलटला याबाबतची माहिती देत ही ट्रेन इटावा स्थानकात थांबवण्याची सूचना दिली. त्यामुळे इटावा स्थानकात थांबा नसतानाही ही ट्रेन सकाळी 9.18 वाजता या स्थानकात थांबविण्यात आली. ज्यानंतर . ट्रेन थांबताच आरपीएफचे एसआय हिराचंद मीना यांनी महिला हेड कॉन्स्टेबल पुष्पा यांच्यासोबत नकीर उल हसन आणि त्यांच्या दोन वर्षांच्या मुलीला इटावा स्थानकात उतरविले.
या दोघांनाही इटावा स्थानकात उतरविल्यानंतर त्यांना आरपीएफ चौकीत बसविण्यात आले. पण यानंतर गुल्फा शहा यांनी तीन तासांनंतर इटावाला पोहोचणारी स्वतंत्र सेनानी एक्स्प्रेस पकडून इटावा स्थानक गाठले. महत्त्वाची बाब म्हणजे या ट्रेनला सुद्धा या स्थानकात थांबा नव्हता. मात्र, तरी सुद्धा ही ट्रेन इथे थांबविण्यात आली. दुपारी 12.16 वाजता स्वतंत्र सेनानी ट्रेनला इटावा स्थानकात थांबा देण्यात आला. ज्यानंतर कागदोपत्रांची औपचारिकता पार पडल्यानंतर या कुटुंबाला याच ट्रेनने मधुबनीकरिता पाठविण्यात आले. या घटनेमुळे दुरांतो एक्स्प्रेस 5 मिनिटे आणि स्वतंत्र सेनानी एक्स्प्रेस 6 मिनिटे इटावा स्थानकात थांबविण्यात आली होती.