नवी दिल्ली : अमेरिकेतील विस्कॉन्सिनमध्ये तेलंगणातील २७ वर्षीय विद्यार्थी प्रवीण कुमार गम्पा याची गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याचे बुधवारी (4 मार्च) समोर आले. त्यानंतर पुन्हा एकदा भारतीय विद्यार्थ्यांवर अमेरिकेत होणाऱ्या हल्ल्यांबाबत चिंता व्यक्त करण्यात येत आहे. अशामध्ये प्रवीणच्या कुटुंबांला ही बातमी मिळताच त्यांना मोठा धक्का बसला. “एका कोर्ससाठी प्रवीण अमेरिकेत गेला होता. त्याचा तो कोर्स संपण्यासाठी फक्त 4 महिनेच राहिले होते. त्याने अमेरिकेतच नोकरी करुन तिथे राहण्याचे ठरवले होते. पण, त्याआधीच माझ्या मुलाची हत्या झाली,” अशी मन सुन्न करणारी प्रतिक्रिया प्रवीणच्या वडिलांनी दिली. (Indian student shot dead in US Pravin’s father raction)
हेही वाचा : Jaishankar in London : जयशंकर यांच्या गाडीसमोर आला खलिस्तानी समर्थक…
नेमकं काय घडलं?
अमेरिकेतील विस्कॉन्सिनमधली मिल्वॉकी या ठिकाणी अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून गम्पा प्रवीण कुमार या भारतीय विद्यार्थ्याची हत्या केली. तो तेलंगणातील रंगारेड्डी जिल्ह्यातील रहिवासी होता. त्याने डेटा सायन्समधून शिक्षण घेतले होते. त्यानंतर तो विस्कॉन्सिन विद्यापीठामध्ये उच्च शिक्षणासाठी गेला होता. त्या अभ्यासक्रमाचे त्याचे दुसरे वर्ष सुरू होते. त्याचा कोर्स संपण्यासाठी चार महिने राहिले होते. तो एका स्टोअरमध्ये पार्ट टाइम काम करत होता. त्या दुकानावर काही हल्लेखोरांनी दरोडा टाकला. यावेळी झालेल्या गोळीबारात प्रवीणचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.
वडिलांची मन हेलावणारी प्रतिक्रिया
प्रवीणच्या वडिलांनी सांगितले की, “बुधवारी पहाटे 2.50 वाजता मला प्रवीणचा व्हॉट्सऍप कॉल आला होता. पण मी तो उचलू शकलो नव्हतो. त्यानंतर मी त्याला पुन्हा फोन केला तर एका अनोळखी व्यक्तीने फोन उचलला आणि प्रवीणचा फोन सापडल्याचे त्याने सांगितले.” यावेळी, त्यांना काहीतरी गडबड असल्याचा संशय आला आणि त्यांची भीती खरी ठरल्याचे प्रवीणच्या वडिलांनी सांगितले. ते म्हणाले की, “प्रवीणच्या मित्रांचा आम्हाला प्रवीणचा मृतदेह सापडला असल्याचे सांगितले. आता आमच्यासाठी सगळेच संपले आहे,” अशी प्रतिक्रिया दिली. या संपूर्ण घटनेनंतर प्रवीणच्या आईला मोठा धक्का बसला आहे. तसेच, प्रवीण कुमार ज्या विद्यापीठात शिकत होता त्या विद्यापीठानेही या घटनेबाबत शोक व्यक्त केला. आम्ही प्रवीणच्या कुटुंबाच्या संपर्कात आहोत तसंच आम्ही आमच्या परिने जो लागेल तो पाठिंबा प्रवीणच्या कुटुंबाला देत आहोत, असे विद्यापीठाकडून सांगण्यात आले आहे.