नवी दिल्ली : देशाचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) जनरल बिपिन रावत यांचा 8 डिसेंबर 2021 रोजी तामिळनाडूमधील कुन्नूर येथे झालेल्या Mi-17V5 हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला. त्यांच्यासह यामध्ये 13 जणांचा या अपघातामध्ये मृत्यू झाला होता. त्यासंदर्भातील एक अहवाल नुकताच समोर आला आहे. संसदेच्या संरक्षण स्थायी समितीच्या या अहवालामध्ये हेलिकॉप्टर अपघाताची कारणे समोर आली असून हा अपघात मानवी चुकीमुळे झाल्याचे सांगण्यात आले आहे. (Indias first CDS General Bipin Rawat crash report)
हेही वाचा : India – China : आमच्या राज्यकर्त्यांचे कागदी बाण चिनी ड्रॅगन फेकून देतो, ठाकरे गटाचा मोदी सरकारवर निशाणा
संसदेमध्ये सादर केलेल्या एका अहवालात संरक्षणविषयक स्थायी समितीने 13 व्या संरक्षण योजनेच्या कालावधीत भारतीय हवाई दलाच्या विमानांना झालेल्या अपघातांची आकडेवारी दिली. स्थायी समितीच्या अहवालात 2017-22 मध्ये 34 विमान अपघातांच्या कारणांची माहिती देण्यात आली. विशेष म्हणजे या अहवालात ‘कारण’ नावाचा एक स्तंभ असून त्यामध्ये अपघाताचे कारण ‘मानवी त्रुटी’ असे नमूद केलेले आहे. अहवालात असे म्हटले आहे की, 8 डिसेंबर 2021 रोजी झालेल्या Mi-17V5 हेलिकॉप्टर अपघाताचे कारण मानवी त्रुटी (एअरक्रू) होती. हे रशियन बनावटीचे हेलिकॉप्टर अत्यंत सुरक्षित आणि विश्वासार्ह मानले जात होते. हेलिकॉप्टर कमी उंचीवर उडत होते आणि अपघाताच्या काही सेकंद आधी ढगांमध्ये शिरले. यानंतर आगीचा भडका उडाला आणि हेलिकॉप्टर खाली पडले. हेलिकॉप्टर उतरण्यापूर्वी अवघे सात मिनिटे शिल्लक असताना हा प्रकार घडला.
अहवालात सांगितलेल्या माहितीनुसार, हेलिकॉप्टरने सकाळी 11:48 वाजता सुलूर हवाई तळावरून उड्डाण केले. त्यानंतर दुपारी 12:15 वाजता ते हेलिकॉप्टर गोल्फ कोर्सवर उतरणे अपेक्षित होते. पण, दुपारी 12:08 वाजता हेलिकॉप्टरचा हवाई वाहतूक नियंत्रणाशी संपर्क तुटला. या अपघातामध्ये जनरल बिपीन रावत यांच्या पत्नी मधुलिका राजे सिंह रावत, त्यांचे संरक्षण सहायक ब्रिगेडियर एलएस लीडर, लेफ्टनंट कर्नल हरजिंदर सिंग, विंग कमांडर पृथ्वी सिंह चौहान, हेलिकॉप्टर पायलट स्क्वाड्रन लीडर कुलदीप सिंग, सहवैमानिक ज्युनियर वॉरंट अधिकारी राणा प्रताप, जे. वॉरंट अधिकारी अरक्कल प्रदीप, हवालदार सतपाल राय, नाईक गुरसेवक सिंग, नाईक जितेंद्र कुमार, लान्स नाईक विवेक कुमार आणि लान्स नाईक बी साई तेजा यांचाही मृत्यू झाला.