Eco friendly bappa Competition
घर देश-विदेश भारताचे चंद्रावर मून वॉक! प्रज्ञान रोव्हरचा चंद्रावर फेरफटका

भारताचे चंद्रावर मून वॉक! प्रज्ञान रोव्हरचा चंद्रावर फेरफटका

Subscribe

भारताचे महत्त्वाकांक्षी मिशन चांद्रयान-३ मधील विक्रम लँडर बुधवारी संध्याकाळी ६:०४ वाजता चंद्रावर उतरले आणि संपूर्ण देशात आनंदाची लाट उसळली. लँडिंगनंतर सुमारे ४ तासांनी प्रज्ञान रोव्हर विक्रम लँडरमधून बाहेर आला आणि चंद्राच्या पृष्ठभागावर चालू लागला, अशी माहिती भारतीय अंतराळ संशोधन संस्थे (इस्रो) ने गुरुवारी ट्विट करून दिली. चांद्रयान-३ मधील ६ चाकी प्रज्ञान रोव्हर भारतात तयार करण्यात आले आहे. चंद्राच्या पृष्ठभागावर चालण्यासाठी बनवण्यात आले आहे. लँडरमधून बाहेर पडत प्रज्ञान रोव्हरने चंद्राच्या पृष्ठभागावर फेरफटका मारला आणि भारत चंद्रावर चालू लागला आहे, असे इस्रोने म्हटले आहे.

१४ दिवस माहिती पाठवणार
ही मोहीम १४ दिवसांसाठी चालणार आहे. प्रज्ञान रोव्हर पुढील १४ दिवस चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पाणी आणि खनिजांचा शोध घेऊन एकत्र केलेली सर्व माहिती रोव्हर लँडरला पाठवेल आणि लँडर ती भारतीय डीप स्पेस नेटवर्कला पाठवेल. चंद्रावरील एक दिवस हा भारतावरील १४ दिवसांच्या बरोबरीचा आहे. चंद्रावर सूर्याचा उजेड असताना म्हणजे दिवसा विक्रम लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरले आहे. विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हला सूर्यापासून ऊर्जा मिळत असल्याने जोपर्यंत तेथे सूर्याचा उजेड असेल, तोपर्यंत ते दोघेही कार्यरत असतील. १४ दिवसांनंतर लँडिंग साईटवर अंधार होईल. हा अंधार पुढील १४ दिवस कायम असेल, तोपर्यंत लँडर आणि रोव्हरचे काम थांबलेले असेल. सूर्य उगवल्यावर विक्रम आणि प्रज्ञान पुन्हा चंद्रावर काम करण्याची शक्यता असल्याचे इस्रोच्या शास्त्रज्ञांनी सांगितले. तसे झाल्यास ती भारतासाठी आनंदाची बाब असेल.

- Advertisement -

म्हणून दक्षिण ध्रुवाची निवड- एस. सोमनाथ
चंद्राच्या दक्षिण ध्रुवाची मोहिमेसाठी का निवड केली याची माहिती सांगताना इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी सांगितले की, चांद्रयान-२ चे चंद्राच्या पृष्ठभागावर हार्ड लँडिंग झाल्याने त्या मोहिमेतून आपल्या हाती काहीच लागले नाही. परिणामी आपल्याला पुन्हा शून्यापासून सुरुवात करावी लागली. चांद्रयान-२ या मोहिमेतील चुका शोधण्यात एक वर्ष गेले. चुका दुरुस्त करून मागील २ वर्षांत आम्ही अनेक चाचण्या घेतल्या. कोरोना संकटकाळात जवळपास पूर्ण काम थांबले होते. दक्षिण ध्रुव हा विषुववृत्तीय प्रदेशापासून दूर आहे. हा भाग मोठे खड्डे आणि खोल खंदकांनी भरलेला आहे. दक्षिण ध्रुवावर सपाट पृष्ठभाग शोधणे अवघड आहे. आतापर्यंत कोणत्याही देशाचे यान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करू शकले नाही. हे आव्हान स्वीकारून आम्ही चंद्राच्या दक्षिण ध्रुवाची निवड केली, असे एस. सोमनाथ म्हणाले.

सूर्याच्या अभ्यासासाठी लवकरच आदित्य एल-१
सूर्याचा अभ्यास करण्यासाठी भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो) सप्टेंबरमध्ये ‘आदित्य एल-१’ यान अवकाशात सोडणार असल्याची माहिती आहे. सूर्य आणि भोवतीच्या वातावरणाचा या मोहिमेत अभ्यास करण्यात येणार आहे. त्यामुळे, सूर्याविषयीची असणार्‍या अनेक रहस्यांचा उलगडा होऊ शकतो. सूर्याचा अभ्यास करणारी ‘इस्रो’ची ही पहिलीच मोहीम असणार असून त्याद्वारे विविध निरीक्षणे नोंदविण्याचा इस्रोचा मानस आहे.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -