नुपूर शर्माच्या हत्येसाठी पाकिस्तानातून घुसखोरी, राजस्थानात बीएसएफची मोठी कारवाई

nupur sharma

भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांची हत्या करण्यासाठी पाकिस्तानातून एक घुसखोर भारतात पोहोचला होता. मात्र, राजस्थानच्या श्रीगंगानगर जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय सीमेजवळ सुरक्षा दलाच्या जवानांनी २४ वर्षाच्या एका पाकिस्तानी नागरिकाला अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या पाकिस्तानी नागरिकाची ओळख रिझवान अशरफ अशी करण्यात आली आहे.

ही व्यक्ती हिंदुमलकोट सेक्टरमधील खखां चेकपोस्टवरून देशाच्या सीमेत घुसण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती मिळाली होती. पाकिस्तानातील पंजाबमधील मंडी बहाव बीन येथील रहिवासी असलेल्या अशरफबाबत आता धक्कादायक खुलासे होत आहेत.

अशरफचा भारतात येण्यामागील हेतू अत्यंत धोकादायक होता. बीएसएफने केलेल्या चौकशीत असे उघड झाले आहे की, या घुसखोरी करणाऱ्या व्यक्तीला भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांची हत्या करायची होती. नुपूर शर्मांच्या वक्तव्यामुळे अशरफ यांच्यामध्ये प्रचंड मोठी नाराजी होती. त्यामुळे त्यांनी शर्मांची हत्या करण्याचा कट रचला होता.

भारतात प्रवेश केल्यानंतर अशरफला श्री गंगानगरहून अजमेर दर्ग्याला जायचे होते, असंही सांगितलं जात होतं. त्यानंतर त्याने नुपूर शर्माला मारण्याचा कट रचला होता. आठवीपर्यंत शिकलेल्या अशरफला उर्दू, पंजाबी आणि हिंदी भाषा अवगत आहे. मात्र, त्याच्याकडून कोणतीही शस्त्रे सापडलेली नाहीत.

नुपूर शर्मा यांच्या या वक्तव्यानंतर पाकिस्तानातील मौलवींची बैठक झाली. या बैठकीला अशरफ रिझवानही उपस्थित होता. या बैठकीनंतरच त्याने शर्मा यांना मारण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, आता सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी पकडलेल्या घुसखोराची अधिक चौकशी केली जात आहे. तसेच आणखी काही खुलासे समोर येण्याची शक्यता आहे.


हेही वाचा : माझी भावना उद्धव ठाकरेंसोबत पण..,धैर्यशील मानेंची ऑडिओ क्लिप व्हायरल