भारतीय नौदलाला आणखी बळकटी मिळणार, आयएनएस दुणागिरीचं उद्घाटन

या प्रकल्पातील तिसरी युद्धनौका उदयगिरी गेल्याच महिन्यात लॉन्च करण्यात आली आहे. जीआरएसईची ही दुसरा युद्धनौका आहे. या प्रकल्पातील सातही युद्धनौका देशातील विविध पर्वत-शिखरांच्या नावाने आहेत.

INS dunagiri

भारतीय नौदलाला आता आणखी बळकटी येणार असून आयएनएस दुणागिरीचं उद्घाटन करण्यात आलं आहे. भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी हुगळी नदी किनारी या युद्धनौकेचे उद्घाटन केलं. उत्तराखंडातील एका शिखराच्या नावावरून या युद्धनौकेला नाव देण्यात आले असून याची निर्मिती कोलकत्ता येथील गार्डन रिच शिपबिल्डर्स आणि इंजिनिअर्स म्हणजेच जीआरएसई शिपयार्डने केली आहे. (INS Dunagiri launched by Rajnath Singh)

प्रोजेक्ट 17A अंतर्गत या युद्धनौकेची निर्मिती करण्यात आली आहे. या प्रोजेक्ट अंतर्गत नौसेनेसाठी सात शिवालिक क्लास फ्रिगेट बनवण्यात येणार आहेत. यापैकी चार मुंबईतील माझगांव डॉकमध्ये तयार होत असून बाकी तीन जीआरएसईमध्ये बनवण्यात येत आहेत. माझगाव डॉर्कने आधीच दोन युद्धनौका समुद्रात लॉन्च केल्या आहेत. या प्रकल्पातील तिसरी युद्धनौका उदयगिरी गेल्याच महिन्यात लॉन्च करण्यात आली आहे. जीआरएसईची ही दुसरा युद्धनौका आहे. या प्रकल्पातील सातही युद्धनौका देशातील विविध पर्वत-शिखरांच्या नावाने आहेत.

शिवालिक वर्गातील इतर युद्धनौकांप्रमाणेच दुणागिरी युद्धनौकेचीही संरक्षण क्षेत्रात महत्त्वाची ओळख आहे. या युद्धनौकेतील ७५ टक्के शस्त्रे, उपकरणे आणि यंत्रणा स्वदेशी आहेत. या सर्व युद्धनौकांची रचना नौदलाच्या नौदल संचालनालयाने तयार केली आहे.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज लॉन्च केलेली दुणागिरी युद्धनौका नौदलाच्या जुन्या दूणागिरी ASW फ्रिगेटचा अवतार आहे. जुनी युद्धनौका 33 वर्षे सेवा पूर्ण करून 2010 मध्ये निवृत्त झाले होते. नवीन फ्रीगेटचे नाव याच नावावरून ठेवण्यात आले आहे.