घरताज्या घडामोडीRajiv Gandhi assassination : मानवी बॉम्बने आधीही भेदले होते सुरक्षा कवच

Rajiv Gandhi assassination : मानवी बॉम्बने आधीही भेदले होते सुरक्षा कवच

Subscribe

भारताचे सर्वात तरूण पंतप्रधान म्हणजे राजीव गांधी यांची आज २१ मे म्हणजे ३० वी पुण्यतिथी. अतिशय नियोजनबद्ध असा अंमलात आणलेला असा हा हत्येचा कट LTTE च्या माध्यमातून घडवून आणण्यात आला होता. २१ मे १९९१ रोजी भारताचे सातवे पंतप्रधान असलेल्या राजीव गांधी यांची हत्या झाली होती. श्रीलंकेत सक्रिय असलेल्या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्विकारली. श्रीलंकेत अंतर्गत अशा तमिळ संघर्षातूनच या घटनेचे बीज रोवले गेले होते. पण राजीव गांधी अखंढ श्रीलंकेच्या दिलेल्या नाऱ्यामुळे LTTE चे स्वप्नभंग होईल असे दिसू लागले. त्याचेच उत्तर म्हणून राजीव गांधी यांची हत्या करण्याचा कट रचला गेला.

श्रीलंकेच्या स्वातंत्र्याच्यावेळी तमिळ भाषीय लोकांना बौद्ध धर्माला मानणाऱ्या सिंहला समाजापासून उपेक्षा सहन करावी लागली होती. त्यानंतर मोठ्या प्रमाणात ठिकठिकाणी तमिळ लोकांवर होणारा भेदभाव वाढतच गेला. या भेदभावामुळेच तमिळ जनतेने हत्यार उचलण्याचा निर्णय घेतला. वेलुपिल्लई प्रभाकरन नावाच्या युवकाने याच भेदभावातून लिबरेशन टाइगर्स ऑफ तमिल ईलम (LTTE) ही संघटना तयार केली. पुढे जाऊन हीच संघटना १९८० च्या दशकात सर्वात मजुबत अशी दहशतवादी संघटना म्हणून उदयास आली.

- Advertisement -

भारतातील तमिळ समाज हा श्रीलंकेच्या तमिळ समुदायाला सहानभुती देऊ लागला होता. श्रीलंकेच्या तमिळ समाजाला अनेक बाबतीत भारतातून सहकार्यही मिळू लागले होते. याच दरम्यान १९८३ मध्ये श्रीलंकेत १३ सैनिकांच्या हत्येनंतर दंगल भडकली. या दंगलीत मोठ्या प्रमाणात तमिळ जनता मृत्यूमुखी पडली. त्यामुळे श्रीलंकेतील अंतर्गत कहल मोठ्या प्रमाणात वाढला.

भारत श्रीलंका सामंजस्य करार

१९८७ मध्ये भारत आणि श्रीलंकेत सामंजस्य करार झाला. ज्यामध्ये तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी स्वाक्षरी केली. या कराराअंतर्गत भारताकडून श्रीलंकेत इंडियन पीस कीपिंग फोर्स नावाची एक सैनिकांची तुकडी पाठवण्यात येणार होती. या तुकडीला LTTE च्या सदस्यांचे आत्मसमर्पण करून घेण्याचे लक्ष्य देण्यात आले होते. सुरूवातीला या संघटनेतील सदस्यांनी आत्मसमर्पण करण्याची तयारी दाखवली. त्यानंतर अनेकांनी सामुहिक पद्धतीने आत्मसमर्पणही केले. पण तिसऱ्याच आठवड्यात हे आत्मसमर्पण प्रक्रिया ठप्प झाली.

- Advertisement -

भारत Vs LTTE

आत्मसमर्पण आणि तमिळ नागरिकांचे पुर्नवसन यामुळे मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण होऊ लागला. या प्रकरणात समर्पण केलेल्यांना विरोधकांच्या हाती देणे यासारखेही प्रकार समोर आले. श्रीलंकन सेनेने LTTE समर्थकांना अटक करण्यात आली. त्यानंतर या समर्थकांना मुक्त करण्याची मागणी न होताच १२ जणांच्या आत्महत्येने हे संपुर्ण प्रकरण गंभीर झाले. त्यानंतर ही LTTE संघटना आणि भारतीय सैन्याची तुकडी (आयपीकेएफ) एकमेकांविरोधात आले. दिल्लीतील राजकीय पक्षांनीही आईपीकेएफला पुन्हा बोलावून घेण्याची मागणी करण्यात आली. त्याचवेळी श्रीलंकेतही जवान मृत्यमुखी पडत गेले.

दिल्लीतही राजकारण बदलले

त्यानंतर १९८९ मध्ये दिल्लीतले सरकार बदलले. नव्याने सत्तेत आलेल्या वी पी सिंह सरकारने श्रीलंकेतून आईपीकेएफला पुन्हा भारतात बोलावून घेतले. दरम्यानच्या काळात १९९० मध्ये राजीव गांधी यांनी भारत श्रीलंका कराराची पुन्हा एकदा बाजू घेतली. त्याचवेळी अखंड श्रीलंकेचीही मागणी त्यांनी केली. त्यामुळे LTTE ला आपला स्वप्नभंग होणार असल्याचे दिसू लागले. राजीव गांधी पुन्हा पंतप्रधान झाले तर LTTE ने ठेवलेले लक्ष्य चुकणार ही भीती त्यांच्या मनात निर्माण झाली. त्यामुळेच LTTE मार्फत त्यांच्या हत्येचा कट रचण्यात आला.

असा रचला गेला कट

राजीव गांधी यांच्या हत्येचा कट प्रामुख्याने LTTE चे प्रमुख प्रभाकरन, पोट्टू ओम्मान, महिला तुकडीच्या प्रमुख अकीला आणि सिवरासन यांनी रचला. सिवरासन या प्लॅनचा मास्टरमाइंड होता. राजीव गांधी यांची मुलाखत प्रसिद्ध झाल्यानंतर एका महिन्यानंतरच दहशतवाद्यांची पहिली अशी आत्मसमर्पण करणाऱ्यांची तुकडी ही भारतात दाखल झाली. त्यानंतर याच दलातील अनेकांनी भारतात वेगवेगळ्या ठिकाणी मुक्काम ठोकला. याठिकाणाहून संदेश एकमेकांना व्यवस्थित पद्धतीने पोहचवण्यात येत होते.

झाली होती रंगीत तालिम

मे १९९१ च्या पहिल्याच आठवड्यात आत्मघातकी मानवी बॉम्बसाठीचे प्रशिक्षण सुरू झाले. मानवी बॉम्बच्या स्वरूपात प्रशिक्षण घेणाऱ्या धनु आणि सुबा यांच्यासह ९ लोकांनी वी पी सिंह यांच्या सभेत सुरक्षा कवच भेदण्यात यश मिळवले. त्या दोघांनाही सुरक्षा कवच भेदण्याचे प्रशिक्षण देण्यात आले होते. त्यानुसार वी पी सिंह यांना त्या दोघींनी हारही घातला. त्यानंतर सिवरासनला वृत्तपत्रातील बातम्यांमध्ये राजीव गांधी यांच्या निवडणुकीच्या कार्यक्रमाची माहिती मिळाली. त्यानंतर २१ मे रोजी राजीव गांधी यांच्या श्रीपेरंबदूरच्या दौऱ्याची निवड हत्येसाठी करण्यात आली. याच सभेत धनु आणि सुबाने राजीव गांधी यांच्या जवळ पोहचत मानवी बॉम्बचा कट यशस्वी केला. बॉम्बच्या शक्तीशाली धमाक्यात देशाने एक तरूण अशा स्वरूपाचे नेतृत्व गमावले.

 


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -