19 नोव्हेंबरला साजरा केला जाणारा ‘आंतरराष्ट्रीय पुरुष दिवस ‘ हा केवळ समाजातील पुरुषांचे योगदानच अधोरेखित करत नाही तर त्यांच्यासमोर येणाऱ्या आव्हानांबाबत नागरिकांना जागरुक करण्याचंही काम करतो. हा दिवस लैंगिक समानता, पुरुषांचे स्वास्थ्य आणि त्यांच्या आयुष्याशी जोडलेल्या मुद्द्यांवर आधारित आहे. सोबतच समाज, परिवार आणि पर्यावरणामध्ये पुरुषांचे योगदान काय याबद्दलही जागरुकता निर्माण केली जाते. जाणून घेऊयात या दिवसाचे महत्त्व, त्याचा इतिहास आणि या वर्षाची थीम काय ? याबद्दल.
आंतरराष्ट्रीय पुरुष दिवसाचे महत्त्व :
1999 मध्ये, वेस्ट इंडिजचे प्राध्यापक डॉ. जेरोम टीलकसिंह यांनी आपल्या वडिलांचा जन्मदिन साजरा करण्यासाठी एक नवा दिवस सुरू केला. त्याला त्यांनी ‘आंतरराष्ट्रीय पुरुष दिन’ असं नाव दिलं. आणि पुरुषांशी संबंधित मुद्द्यांबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी हा दिवस समर्पित केला. भारतात हा दिवस 2007 पासून साजरा केला जात आहे, तेव्हापासून लोकांनी पुरुषांच्या स्वास्थ्य आणि कल्याण यांच्याबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी हा दिवस दरवर्षी साजरा केला जातो.
का साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय पुरुष दिवस ?
आंतरराष्ट्रीय पुरुष दिवसाचा मुख्य उद्देश पुरुषांचे स्वास्थ्य , कल्याण आणि त्यांचे समाजातील सकारात्मक योगदानांविषयी जागरुकता निर्माण करणे हा आहे. हा दिवस साजरा करण्यामागे काही खास कारणं आहेत. आंतरराष्ट्रीय पुरुष दिन हा दिवस पुरुषांना आवाज उठवण्याचा आणि त्यांच्याप्रती सन्मान व्यक्त करण्याचा दिवस आहे. पुरुषांनाही अनेक प्रकारच्या संघर्षाला आणि आव्हानांना सामोरे जावे लागते. या दिवशी केवळ पुरूषांचे स्वास्थ्य आणि कल्याण या विषयांवर नव्हे तर पुरूषांसोबत होणाऱ्या भेदभाव आणि असमानता या मुद्दयांवर देखील चर्चा केली जाते. हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश म्हणजे एक असा समाज बनवणे जिथे प्रत्येकाला जगण्याचा समान अधिकार आणि हक्क मिळेल.
या वर्षाची थीम काय ?
आंतरराष्ट्रीय पुरुष दिवस हा एका खास विषयावर केंद्रित असतो. जागतिक महिला दिनाप्रमाणेच पुरुष दिवसाचीही थीम असते. यंदाची थीम आरोग्याशी संबंधित आहे. या थीमचा उद्देश पुरुषांच्या आरोग्याशी निगडीत समस्यांविषयी जनजागृती करणे आणि त्यांचे आरोग्य सुधारण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणे हा आहे.
तुम्ही आंतरराष्ट्रीय पुरुष दिवस कसा साजरा करू शकता ?
जागरुकता निर्माण करा :
तुम्ही तुमच्या मित्रांना, कुटुंबियांना आणि सोसायटीमधल्या लोकांना याबाबत सांगून जनजागृती केली जाऊ शकते.
कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हा :
तुम्ही तुमच्याच परिसरात आयोजित होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊन हा दिवस साजरा केला जाऊ शकतो.
जीवनात सकारात्मकता आणा :
तुम्ही तुमच्या जीवनात सकारात्मक बदल करुनही हा दिवस साजरा करू शकता. जसे की आरोग्याकडे लक्ष देणे, दुसऱ्यांची मदत करणे किंवा आपल्या कम्युनिटीमध्ये उत्साहाने सहभागी होणे.
हेही वाचा : Mens Health : पुरुषांना नकळत घेरतात हे आजार
Edited By – Tanvi Gundaye