नवी दिल्ली: इराणने मध्यरात्री इस्रायलवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले केले आहेत. इराणने इस्रायलवर 200 हून अधिक विविध प्रकारचे ड्रोन हल्ले केले, ज्यात किलर ड्रोन, बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे आणि क्रूझ क्षेपणास्त्रांचा समावेश आहे. जेरुसलेमसह इस्रायलमधील अनेक शहरांमध्ये स्फोट आणि सायरनचे आवाज ऐकू येत आहेत. इस्रायली लष्कराने हवाई संरक्षण यंत्रणा कार्यान्वित केली आहे. लष्कराला हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे. (Iran Attack on Israel Iran takes revenge after 14 days 200 missiles and drones fired at Israel)
पुढील काही तासांत इराण इस्रायलवर आणखी क्षेपणास्त्र हल्ले करू शकतो, असे बोलले जात आहे. इस्रायलवर हल्ले करणाऱ्या इराणने इस्रायलच्या सततच्या गुन्ह्यांची ही शिक्षा असल्याचं स्पष्ट केलं आहे. इराणच्या लष्कराने एक निवेदन जारी करून या हल्ल्याला ‘ऑपरेशन ट्रू प्रॉमिस’ असे नाव दिले आहे.
इस्रायली आर्मी आयडीएफचे प्रवक्ते रिअर ॲडमिरल डॅनियल हगारी म्हणतात की, इराणने इस्रायलवर थेट हल्ले सुरू केले आहेत. इराणच्या किलर ड्रोनवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. इराणच्या हल्ल्यात दक्षिण इस्रायलमधील लष्करी तळाचे किरकोळ नुकसान झाले आहे. इस्रायलने एरो एरियल डिफेन्स सिस्टीमद्वारे यापैकी बहुतेक क्षेपणास्त्रे पाडली आहेत.
या हल्ल्यादरम्यान इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू आणि अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी फोनवर चर्चा केली. दोन्ही नेत्यांमध्ये सध्याच्या परिस्थितीवर चर्चा झाली. यादरम्यान बायडन म्हणाले की, इराणच्या धोक्यांपासून आम्ही इस्रायलच्या सुरक्षेसाठी कटिबद्ध आहोत आणि आम्ही त्यासाठी ठामपणे उभे आहोत. संयुक्त राष्ट्र संघानेही आज तातडीची बैठक बोलावली आहे.
नेतान्याहू म्हणाले- आम्ही खूप मजबूत
या हल्ल्यांवर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू म्हणाले की, आम्ही देशाची संरक्षण यंत्रणा कामाला लावली आहे. कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यास तयार आहोत. आपले राष्ट्र खूप बलवान आहे. IDF खूप मजबूत आहे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आमचे लोक खूप मजबूत आहेत. या संकटकाळात आम्हाला पाठिंबा देणाऱ्या अमेरिका, ब्रिटन आणि फ्रान्ससह सर्व देशांचे आम्ही कौतुक करतो.
इराणच्या हल्ल्याने इस्रायल हादरला
इराणने मध्यरात्री इस्रायलवर केलेल्या हल्ल्यामुळे जागतिक तणाव शिगेला पोहोचला आहे. इराणचे परराष्ट्र मंत्री म्हणतात की, इराण कोणत्याही प्रकारच्या लष्करी हल्ल्यापासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी कोणतेही पाऊल उचलण्यास मागेपुढे पाहणार नाही.
इस्त्रायली संरक्षण दलाने (आयडीएफ) असं म्हटलं आहे की जेथे आवश्यक असेल तेथे ते हल्ले तत्परतेने थांबवले जात आहेत. या संदर्भात इस्रायलमध्ये युद्ध मंत्रिमंडळाची बैठक बोलावण्यात आली आहे.
इस्रायलला शिक्षा मिळणार
हल्ल्याच्या काही दिवस आधी इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांनी इशारा दिला होता. इस्रायलला शिक्षा मिळणारच, असं ते म्हणाले होते.
Israelis’ reality in the last hours: pic.twitter.com/VXeHM8WqJi
— Israel Defense Forces (@IDF) April 14, 2024
अमेरिका, ब्रिटनसह अनेक देश इस्रायलच्या मदतीसाठी पुढे
इराणच्या हल्ल्यानंतर ब्रिटनने इस्रायलच्या मदतीसाठी रॉयल एअर फोर्स जेट आणि एअर रिफ्यूलिंग टँकर पाठवले. ब्रिटनच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, इराणकडून येणारे धोके आणि मध्यपूर्वेतील झपाट्याने वाढणारा तणाव पाहता, तणाव कमी करण्यासाठी आणि हे हल्ले रोखण्यासाठी ब्रिटिश सरकार आपल्या भागीदारांच्या सहकार्याने सर्व शक्य पावले उचलत आहे. आम्ही अनेक अतिरिक्त रॉयल एअर फोर्स जेट आणि एअर रिफ्युलिंग टँकर इस्रायलला पाठवले आहेत.