पॅन कार्ड आधार कार्डसोबत लिंक केले का? आयकर विभागाने दिला ‘हा’ इशारा

income tax and aadhar card
पॅन कार्ड-आधार लिंक

नवी दिल्ली : सध्याच्या काळात पॅन कार्डचा वापर करून प्रत्येकजण आयकरासंबंधित सर्व कामे करत आहेत. जिथे पैशांचा जास्त व्यवहार असेल तिथे पॅनकार्डही सरकारकडून अनिवार्य करण्यात आले आहे. त्यामुळे गेल्या वर्षभरापासून सरकाराने पॅनकार्डला आधार कार्डशी लिंक करण्याचा आग्रह धरला आहे. भविष्यात कोणतीही अडचण येऊ नये म्हणून सरकारकडून पॅन कार्ड सर्वांनी लवकरात लवकर आधारशी लिंक करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यासोबतच सरकारकडून असेही सांगण्यात आले आहे की 31 मार्च 2023 पर्यंत ज्यांचे पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक झाले नसेल, त्यांचे पॅनकार्ड निरुपयोगी होतील, असा इशारा आयकर विभागाने दिला आहे.

आधार आणि पॅन कार्ड लिंक संबंधित माहीती
1. आधार आणि पॅन कार्ड लिंक करणे कोणासाठी आवश्यक?
प्राप्तिकर कायद्याच्या कलम 139AA मध्ये अशी तरतूद आहे की, 1 जुलै 2017 रोजी कायमस्वरूपी खाते क्रमांक (PAN) वाटप करण्यात आलेल्या प्रत्येक व्यक्तीने आणि आधार क्रमांक मिळविण्यासाठी पात्र असलेल्या प्रत्येक व्यक्तीने विहित नमुन्यात त्याचा आधार क्रमांक लिंक करणे आवश्यक आहे. अशा व्यक्तींनी दिलेल्या तारखेपूर्वी (सध्या 31.03.2022 शुल्क न भरता आणि 31.03.2023 विहित शुल्क भरण्याआधी) त्यांचे आधार आणि पॅन लिंक करणे आवश्यक आहे. अधिक तपशिलांसाठी CBDT परिपत्रक क्रमांक 7/2022 दिनांक 30.03.2022 पाहू शकता.

2. आधार-पॅनकार्ड लिंक करणे कोणासाठी अनिवार्य नाही?
आसाम, जम्मू-काश्मीर आणि मेघालय राज्यांमध्ये राहणाऱ्या लोकांसाठी.
आयकर कायदा, 1961 नुसार अनिवासी भारतीयांसाठी.
मागील वर्षी ऐंशी वर्षे किंवा त्याहून अधिक वय झालेल्या लोकांसाठी.

रोख पैसे काढणे, ठेवींसाठी पॅन-आधारची आवश्यकता
भारतात बँकांमधून रोख पैसे काढणे आणि जमा करण्यासाठी असलेल्या नियमांमध्ये 26 मेपासून बदल करण्यात आले आहे. केंद्राने आता नागरिकांना बँक, पोस्टातून पैसे काढण्यासाठी किंमा जमा करण्यासाठी पॅन (कायमचा खाते क्रमांक) किंवा आधार कार्ड नमूद करणे सक्तीचे केले आहे. यामुळे एका आर्थिक वर्षात सहकारी बँका आणि पोस्ट ऑफिससह बँक खात्यांमधून 20 लाखांपेक्षा जास्त पैसे काढण्यासाठी ग्राहकांना आधार आणि पॅन नंबर द्यावा लागणार आहे. हा नियम चालू खाते उघडण्यासाठी देखील लागू होईल. अशी माहिती केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने मे महिन्यात जारी केलेल्या एका अधिसूचनेत दिली आहे.