Russia-Ukraine War: इस्राईलचे पंतप्रधान रशियात दाखल, पुतिन यांच्यासोबत युक्रेन संकटावर चर्चा, युद्ध थांबण्याची शक्यता

मागील अनेक दिवसांपासून रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध सुरू आहे. आज युद्धाचा अकरावा दिवस आहे. परंतु सर्वात महत्त्वाचं म्हणजे इस्राईलचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट काल(शनिवार) रात्री अचानक रशियात पोहोचले. राजधानी मॉस्कोमध्ये राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यासोबत अडीच तासांहून अधिक काळ चर्चा केली. दरम्यान, इस्त्राईलने रशिया आणि युक्रेनमधील संघर्षात मध्यस्थी करण्याची तयारी दाखवल्याचे दिसत आहे. त्यामुळे युद्ध थांबवण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर इस्राईलच्या पंतप्रधानांचा मॉस्को दौरा सध्या चर्चेचा विषय झाला आहे. खरं तर अमेरिकेच्या जवळ असलेल्या इस्राईलने रशियाच्या युक्रेनवरील हल्ल्याचा निषेध केला आहे. या देशाने युक्रेनला मदत करण्याचे ठरवले आहे. अशा स्थितीत इस्राईलची रशियासोबतची चर्चा अत्यंत महत्त्वाची असल्याची समजली जात आहे.

युद्धाच्या पार्श्वभूमीवर चर्चा केल्यानंतर संकट कमी होण्याची शक्यता आहे, असा विश्वास इस्राईलला आहे. या बैठकीमागे धोरणात्मक विश्लेषकांचे मत वेगळे आहे. त्यांचा असा विश्वास आहे की, इस्राईलचा उत्तर सीमावर्ती देश सीरियासोबत सतत संघर्ष करत आहे. जिथे इस्राईल नियमितपणे इराण आणि हिजबुल्लाह सैन्य तळांवर हल्ल करू शकतात. सीरियाच्या हवाई क्षेत्रावर रशियाचे नियंत्रण आहे. त्यामुळे इस्राईलने मॉस्कोसोबत ताळमेळ राखणे गरजेचे आहे, असे म्हटले आहे.

जर इस्राईल या युद्धात युक्रेनला पाठिंबा देत रशियाच्या विरोधात गेला तर इस्राईलला मोठे नुकसान सहन करावे लागू शकते. त्यामुळे ज्यू धर्मांतील लोकांबद्दल विशेष सहानुभूती असलेला इस्राईल या निमित्ताने तटस्थ राहणार असल्याचे समजले जाते. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेंस्की हे ज्यू धर्माचे आहेत आणि त्यांनी इस्राईलच्या पंतप्रधानांना युद्ध थांबवण्यासाठी मध्यस्थी करण्याचे आवाहन केले आहे.


हेही वाचा : Disha Salian case: दिशा सालियान मृत्यू प्रकरणात मुख्यमंत्र्यांबाबत नारायण राणेंचा गौप्यस्फोट