श्रीहरिकोटा : आजवर इस्रोने म्हणजेच भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने अनेक मानाचे तुरे आपल्या शिरपेचात रोवून घेतले आहेत. पण या वर्षाच्या अखेरीस इस्रोने स्पॅडेक्स नावाचे नावाचे दोन लघुग्रह अवकाशात सोडून आणखी एक मोठी कामगिरी केली आहे. इस्रोने पहिल्यांदा डॉकिंग आणि अनडॉकिंग तंत्रज्ञान यशस्वी करण्यासाठी दोन लघुग्रह सोमवारी (ता. 30 डिसेंबर) रात्री 09 वाजून 58 मिनीटांनी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटर येथून अवकाशात लाँच केले. PSLV-C60 रॉकेटच्या साहाय्याने पृथ्वीपासून 470 किमी वर अंतराळात दोन स्पेसक्राफ्ट जोडली जाणार आहेत. आता 7 जानेवारी 2025 रोजी या मोहिमेत बुलेटच्या वेगापेक्षा दहापट वेगाने अंतराळात जाणारी ही दोन अंतराळयाने एकमेकांशी जोडली जातील, अशी माहिती समोर आली आहे. (ISRO SpaDex Mission When will spaceships join)
डॉकिंग आणि अनडॉकिंगची ही प्रक्रिया यशस्वी झाल्यास भारत हा अमेरिका, रशिया आणि चीन या देशातील रांगेत बसणारा चौथा देश ठरेल .या मोहिमेच्या यशावर भारताचे चांद्रयान-4 मोहीम अवलंबून आहे. कारण त्या मोहिमेच्या माध्यमातून चंद्राच्या मातीचे नमुने पृथ्वीवर आणले जातील. चांद्रयान-4 मोहीम 2028 मध्ये लाँच केले जाण्याची शक्यता आहे. पण इस्रोची स्पॅडेक्स ही मोहीम आताच यशस्वी झाली असल्याचे या मोहिमेचे संचालक एम. जयकुमार यांनी सांगितले आहे. याबाबतची माहिती देताना जयकुमार यांनी सांगितले की, रॉकेटने 15 मिनिटांच्या उड्डाणानंतर अंतराळयान 475 किलोमीटरच्या वर्तुळाकार कक्षेत ठेवले आहे. डॉकिंगची प्रक्रिया पुढील एका आठवड्यात, शक्यतो 7 जानेवारीला पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे.
स्पॅडेक्स मोहिमेत टार्गेट आणि चेझर या दोन लहान अंतराळयानांचा समावेश आहे. हे PSLV-C60 रॉकेटमधून 470 किमी उंचीवर वेगळ्या कक्षेत सोडण्यात आले आहेत. तैनात केल्यानंतर, अंतराळ यानाचा वेग ताशी 28,800 किलोमीटर असेल. हा वेग व्यावसायिक विमानाच्या वेगाच्या 36 पट आणि बुलेटच्या वेगाच्या 10 पट आहे. आता लक्ष्य आणि पाठलाग करणारे अंतराळ यान दूरच्या पल्ल्याच्या भेटीचा टप्पा सुरू करतील. या टप्प्यात दोन अंतराळयानांमध्ये थेट संवाद साधता येणार नाही. त्यांना जमिनीवरून मार्गदर्शन केले जाईल.