चांद्रयान-३ च्या यशानंतर भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) आपल्या यशस्वी कामगिरीचा धडाका सुरूच ठेवत शनिवारी पुन्हा एकदा नवचैतन्याची भरारी घेतली आहे. इस्रोने आपली पहिली सूर्य मोहीम ‘आदित्य-एल१’ चे शनिवारी सकाळी ११.५० वाजता श्रीहरिकोटा अंतराळ केंद्रातून यशस्वी प्रक्षेपण केले. भारताच्या या पहिल्या सौर मोहिमेद्वारे इस्रो सूर्याचा अभ्यास करणार आहे.
‘आदित्य-एल१’ यान जवळपास १५ लाख किलोमीटरचा प्रवास करणार आहे. हे यान अंतराळातील ‘लॅग्रेंज पॉईंट’ म्हणजेच एल-१ कक्षेत स्थापित करण्यात येणार आहे. यानंतर हा उपग्रह २४ तास सूर्यावरील घडामोडींचा अभ्यास करेल. श्रीहरिकोटा येथून हे यान पोलार सॅटेलाईटद्वारे प्रक्षेपित करण्यात आले. ही भारताची महत्त्वाकांक्षी मोहीम पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. हे यान प्रक्षेपित होताच नागरिकांनी ‘भारत माता की जय’च्या घोषणा दिल्या.
आदित्य मोहिमेतून सूर्याचा अभ्यास करणार
आदित्य-एल१च्या प्रक्षेपणानंतर हा उपग्रह सुमारे ४ महिने अंतराळात प्रवास करणार असून सूर्य आणि पृथ्वीमध्ये असणार्या एका लँग्रेज पॉईंटवर आदित्य-एल१ हा उपग्रह स्थापित होईल. ‘आदित्य-एल१’ ही मोहीम केवळ भारतासाठीच नव्हे, तर संपूर्ण जगासाठी फायदेशीर ठरणार आहे. या मोहिमेद्वारे इस्रो मुख्यतः अंतराळातील सौरवादळे, तेथील तापमानवाढ आदी बाबींवर प्रकाश टाकणार आहे. अंतराळातील घडणार्या या बाबींचा परिणाम पृथ्वीवर कशाप्रकारे होणार असून यामुळे जीवसृष्टीला आगामी काळात कोणत्या संकटांचा सामना करावा लागणार आहे, या गोष्टींचा अभ्यास करण्यात येणार आहे.
लँग्रेज पॉईंट म्हणजे काय?
आदित्य-एल१ हे यान सूर्याभोवतीच्या लॅग्रेंज पॉईंट १च्या कक्षेत प्रवेश करेल आणि तिथून सूर्याभोवती प्रदक्षिणा घालत घालत आपला अभ्यास सुरू करेल. अंतराळातील तारे, ग्रह, उपग्रह इत्यादींमध्ये गुरुत्वाकर्षण असते. या दोन वस्तूंमधील काही बिंदू असे असतात की तेथे दोन्हींचे गुरुत्वाकर्षण समतोल म्हणजेच समसमान असते. अशा बिंदूंना खगोल शास्त्राज्ञांच्या भाषेत लँग्रेंज पॉईंट असे संबोधले जाते. इटालियन संशोधक जोसेफ लुई लँग्रेंज यांच्या स्मरणार्थ हे नाव देण्यात आले आहे.
भारताची पहिली सौर मोहीम आदित्य-एल१ च्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल इस्रोचे शास्त्रज्ञ आणि अभियंत्यांचे अभिनंदन. चांद्रयान-३ च्या यशानंतर भारताचा अंतराळ प्रवास पुढे सुरू आहे. भारताच्या पहिल्या सौर मोहीम आदित्य-एल१ च्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल आमचे शास्त्रज्ञ आणि अभियंत्यांचे अभिनंदन. संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी ब्रह्मांडाचे अधिक चांगले आकलन करून घेण्यासाठी आमचे अथक वैज्ञानिक प्रयत्न सुरूच राहतील.
– नरेंद्र मोदी, पंतप्रधान
चांद्रयान-३ या यशस्वी मोहिमेतून भारताने चंद्रावर तिरंगा फडकवला आहे. आता सौर मोहिमेतील आदित्य एल-१ हे पहिलेच सूर्ययान सूर्याच्या अभ्यासासाठी यशस्वीरित्या प्रक्षेपण करून भारताने अवकाश संशोधनाच्या इतिहासात सुवर्ण अक्षरात नोंद करून ठेवावी अशी कामगिरी केली आहे. या यशासाठी इस्त्रो या आपल्या अवकाश संशोधन संस्थेचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे.
– एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री
प्रज्ञान रोव्हरकडून चंद्रावर १०० मीटरचे अंतर पूर्ण
आदित्य-एल१ च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर इस्त्रोचे प्रमुख डॉ. एस. सोमनाथ यांनी चांद्रयान-३ बाबत महत्त्वाची माहिती दिली. प्रज्ञान रोव्हरने चंद्रावर १०० मीटरचे अंतर पूर्ण केले. विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हरवरील सर्व पेलोडस योग्य प्रकारे काम करत आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. यापूर्वी प्रज्ञान रोव्हरने विक्रम लँडरचा फोटो टिपला होता. चांद्रयान-३ने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील भूभागाचा अभ्यास सुरू केला आहे.