ऐकावं ते नवल : या गावात घरांना करत नाहीत रंगरंगोटी, लग्नातही नसते सजावट

रंग प्रत्येकालाच आकर्षित करत असतात. पण उज्जैनच्या आलोट तालुक्यातील कछालिया गावातील ग्रामस्थ घर बांधण्यासाठी लाखो रूपये खर्च करतात पण घराची रंगरंगोटी करत नाहीत. या गावातील फक्त सरकारी कार्यालये आणि मंदिरांवर रंगरंगोटी केलेली असते. इतकेच नाही तर या गावात लग्नकार्य किंवा इतर कार्यक्रमांमध्ये डेकोरेशनही करत नाहीत. कछालिया गावात अनेक पिढ्यांपासून ही परंपरा सुरू आहे.

गावातील वृद्धांपासून ते लहान मुलांपर्यंत सर्वजण या परंपरेचे पालन करतात. या गावाची लोकसंख्या 1400 असून येथे 200 घरे आहेत. पण यातील एकाही घरावर रंगकाम केलेले नाही. गावात काळ्या रंगाच्या वापरावर पूर्णतः बंदी आहे. येथील ग्रामस्थ काळ्या रंगाचे कपडे आणि बुट परिधान करत नाहीत. अगदी पायमोजे सु्द्धा वापरत नाहीत. लग्न कार्यात माता पूजनावेळी सुद्धा रंगाचा उपयोग करत नाहीत. फक्त देवी-देवतांच्या कलाकृतीवर रंग लावून पूजन करण्यात येते.

अशाप्रकारे दिवाळीला पशुंच्या शिंग रंगवण्यासाठी तपकिरी रंग लावण्यात येतो. गावात कालेश्वर भगवानचे मंदिर आहे. भगवान कालेश्वरावर ग्रामस्थांची आस्था आहे. यामुळे मंदिराशिवाय कोणाही आपल्या घरावर रंगरंगोटी करत नाही. ही परंपरा अनेक पिढ्यांपासून सुरू आहे. पण यामागचे अख्यायिका काय आहे याबाबत कोणालाही काहीच माहिती नाही. दोन-तीन वेळेस या परंपरांना तोडण्यात आले असता दुर्घटना घडल्या. कालेश्वर भगवानच्या मंदिरसमोरून कोणीही घोडीवर बसून जात नाही. मंदिराच्या मागील बाजुने निघु जातात.