Cyclone Yaas: बंगाल-ओडिशा किनाऱ्यावर २६ मेच्या संध्याकाळी धडकणार ‘यास’; NDRF च्या ६५ टीम तैनात

प्रातिनिधीक फोटो

तौक्ते चक्रीवादळाने थैमान घातल्यानंतर बंगालच्या उपसागरात २६ मेच्या संध्याकाळपर्यंत यास हे चक्रीवादळ धकण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पश्चिम बंगाल आणि उत्तर ओडिशाच्या किनाऱ्यावर यास चक्रीवादळाची धडक बसण्याची शक्यता आहे. या वादळामुळे नुकसान पोहोचणाऱ्या भागांच्या सुरक्षेचा विचार करता राष्ट्रीय आपत्ती बचाव दलाच्या म्हणजेच NDRF ची ६५ पथके तैनात करण्यात आली आहेत. यासोबत NDRF ची आणखी २० पथके सज्ज असतील जे आवश्यक असल्यास तैनात करण्यात येणार असल्याचे सांगितेल जात आहे.

यास चक्रीवादळाचा सामना करण्याच्या तयारीच्या आढावा घेण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन समितीची (NCMC) बैठक पार पडली. कॅबिनेट सचिव राजीव गाबा यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. यास सामोरे जाण्यासाठी बैठकीत केंद्र, राज्य व केंद्रशासित प्रदेश सरकारच्या यंत्रणांच्या तयारीचा आढावा घेण्यात आला. यावेळी भारतीय हवामानशास्त्र विभागाचे (IMD) महासंचालक हे देखील उपस्थितीत असून त्यांनी या समितीला चक्रीय वादळाच्या परिस्थितीविषयी माहिती दिली आहे. यास चक्रीवादळ पश्चिम बंगालच्या किनारपट्टीसह त्यालगतच्या उत्तर ओडिशाच्या किनारपट्टीवर २६ मे रोजी संध्याकाळपर्यंत धडकण्याची शक्यता आहे. या राज्यांच्या किनारपट्टी भागात याकालावधीत, ताशी १५५ ते १६५ किमी पर्यंतचे जोरदार वारे, मुसळधार पाऊस आणि वादळाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. संबंधित राज्यांच्या मुख्य सचिवांनी चक्रीवादळाच्या वादळाला सामोरे जाण्याच्या तयारीविषयी समितीला माहिती दिली आहे.

अन्नधान्य, पिण्याचे पाणी आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचा पुरेसा साठा करण्याची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती राज्यांच्या मुख्य सचिवांनी दिली. त्याबरोबरच वीज व दूरसंचार यासारख्या अत्यावश्यक सेवा सुरळीत राहण्यासाठी आवश्यक व्यवस्था करण्यात आली आहे. यासोबतच NDRF ची ६५ पथके तैनात करण्यात आली आहेत. यासोबत NDRF ची आणखी २० पथके सज्ज ठेवण्यात आले आहेत.