Shashi Tharoor On Congress Future : नवी दिल्ली : लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये देशभरात कॉंग्रेसची कामगिरी चांगली होती. मात्र, त्यानंतर विविध राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांमधील कॉंग्रेसची कामगिरी खालावली. नुकत्याच पार पडलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत तर पक्षाला खातेही उघडता आले नाही. यातच आता खासदार शशी थरुर यांनी काँग्रेसच्या भवितव्यावर महत्त्वाची टिप्पणी केली आहे. (its difficult to come to power now shashi tharoors big statement on the future of congress)
कॉंग्रेसचे ज्येष्ठ खासदार, कॉंग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवणारे शशी थरूर आणि पक्षाचे संबंध सध्या ताणलेले आहेत. अशातच थरूर यांच्या या वक्तव्याने हे संबंध अधिक बिघडण्याची शक्यता आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत थरूर म्हणाले होते की, पक्षाला माझी गरज नसेल तर माझ्यासमोर अनेक पर्याय आहेत. आता तर त्यापुढे जात ते म्हणाले की, कॉंग्रेसमध्ये सारेच नेते आहेत. पण आमच्याकडे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची कमतरता आहे. त्यामुळेच आम्ही संघटनात्मक पातळीवर कमी पडत असल्याचे थरूर यांचे म्हणणे आहे.
शशी थरुर म्हणतात की, तुम्हाला देशात बदल घडवून आणायचा असेल, तर एकटे लढून चालणार नाही, तर इतर पक्षांना सोबत घ्यावे लागेल. यूपी आणि बिहारमध्ये आम्ही स्थानिकांसोबत आघाडी करूनच पुढे जाऊ शकतो. दिल्लीत पक्ष तीन वेळा सत्तेबाहेर असल्याने दिल्लीत पुनरागमन कठीण आहे. कम्युनिस्ट आणि समाजवादी पक्षाचा उल्लेख करत थरुर म्हणाले की, काँग्रेस आज प्रत्येक राज्यात एक-दोन जागावर आहे, मात्र इतर पक्ष केवळ एक दोन राज्यांपुरते मर्यादित आहेत.
हेही वाचा – High Court On Toll : खराब महामार्गाचे कसले पैसे घेता, उच्च न्यायालयाने खडसावले
अनेक राज्यांमध्ये काँग्रेस आघाडी करुनच पुढे जाऊ शकते. उदाहरणार्थ, काँग्रेस 1996 पर्यंत यूपीमध्ये स्वबळावर सत्तेत होती. पण आता त्याची शक्यता फारच कमी आहे. समाजवादी पक्ष किंवा इतर कोणत्याही पक्षाशी युती करूनच आम्ही पुढे जाऊ शकतो. बिहारमध्येही तेच आहे. तमिळनाडूतही आमची द्रमुकसोबत आघाडी आहे. प्रत्येक राज्याची परिस्थिती वेगळी आहे.
कर्नाटक आणि तेलंगणामध्ये काँग्रेस जी ताकद दाखवू शकते, ती पश्चिम बंगाल आणि बिहारमध्ये दाखवू शकणार नाही. त्यामुळे तेथे वेगळ्या मार्गाचा अवलंब करावा लागेल. देशात बदल घडवून आणायचा असेल, तर प्रत्येकवेळी स्वबळावर लढण्याची गरज नाही. एकाच विचारधारेच्या इतर पक्षांसोबत पुढे जाता येऊ शकते, असे सूचक विधानही त्यांनी केले.
शशी थरूर यांच्याबाबतचे वाद काय?
चार वेळा खासदार असलेल्या शशी थरूर यांनी काँग्रेस अध्यक्षपदासाठी मल्लिकार्जुन खरगे यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. 2022 मध्ये त्यांनी सोनिया गांधींना पत्र लिहिलेल्या G23 गटातही होते. या गटाने काँग्रेस नेतृत्व बदलण्याची मागणी केली होती. तसेच, शशी थरूर यांनी अनेकदा राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर काँग्रेस नेतृत्वाविषयी आपला असंतोष व्यक्त केला आहे. काही दिवसांपूर्वी, शशी थरूर यांनी इंग्रजी वृत्तपत्रात प्रकाशित झालेल्या लेखामध्ये केरळच्या पिनाराई विजयन सरकारचे कौतुक केले होते. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फ्रान्स आणि अमेरिका दौऱ्याचीही प्रशंसा केली होती.