Thursday, March 20, 2025
27 C
Mumbai
Homeदेश-विदेशJaffar Express : प्रत्येकाच्या ओळखपत्राची तपासणी, बलुच लिबरेशन आर्मीच्या निशाण्यावर पंजाबी

Jaffar Express : प्रत्येकाच्या ओळखपत्राची तपासणी, बलुच लिबरेशन आर्मीच्या निशाण्यावर पंजाबी

Subscribe

बलुच बंडखोरांचा पंजाबी वंशाच्या लोकांवर राग आहे. ते बऱ्याच काळापासून पंजाबी लोकांचे लक्ष्य करत आहेत. गेल्या वर्षाच्या सुरुवातीपासून आतापर्यंत अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत ज्यात बलुच बंडखोरांनी पंजाबी लोकांची हत्या केली आहे.

(Jaffar Express) इस्लामाबाद : पाकिस्तानच्या बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने मंगळवारी जाफर एक्सप्रेस ट्रेन हायजॅक करून प्रवाशांना ओलीस ठेवले. जवळपास 24 तास उलटून गेले असून, आतापर्यंत पाकिस्तानी सैन्याला बलुचिस्तान लिबरेशन आर्मीच्या ताब्यातील ही ट्रेन सोडवण्यात यश आलेले नाही. क्वेट्टाहून पेशावरला जाणाऱ्या जाफर एक्स्प्रेस या नऊ डब्यांच्या ट्रेनमध्ये सुमारे 500 प्रवासी होते. बोगदा क्रमांक 8 जवळ काही सशस्त्र बंडखोरांनी ट्रेन थांबवली आणि हायजॅक केली. त्यातील 182 प्रवाशांना ओलीस ठेवण्यात आले असून जवळपास 20 सैनिकांची हत्या केल्याचे सांगण्यात येते. (Baloch Liberation Army checks everyone’s identity card)

बलुच बंडखोरांनी रॉकेट लाँचर, बंदुका आणि बॉम्बचा वापर करत जाफर एक्स्प्रेस हायजॅक केली. सर्वप्रथम त्यांनी ट्रेन चालकावर हल्ला केला आणि त्याला खाली फेकल्यावर त्यांनी ट्रेनचा ताबा घेतला. त्यानंतर त्यांनी ट्रेनमधील अनेक नागरिक आणि सुरक्षा रक्षकांना ठार मारल्याचे वृत्त आहे. पाकिस्तानी माध्यमांनुसार, बंडखोरांनी विशेषतः पंजाबी वंशाच्या लोकांना लक्ष्य केले आहे. बलुच बंडखोरांच्या कैदेतून सुटलेल्या प्रवाशांनी आपला अनुभव सांगितला. सुटका झाल्यानंतर अनेक किलोमीटर चालत जवळच्या रेल्वे स्थानकावर पोहोचलेल्या अल्लाहदित्ता या व्यक्तीने सांगितले की, डोंगर-दऱ्यांमधून बरेच अंतर चालल्यानंतर येथे पोहोचलो आहोत. मी सकाळपासून रोजा ठेवला होता, तो अद्याप सोडलेला नाही. मला मधे कुठे जेवायलाच मिळाले नाही.

हेही वाचा – Bangladesh : शेख हसीना आणि कुटुंबीयांची मालमत्ता जप्त होणार, न्यायालयाचे आदेश

बलुच बंडखोरांकडून पंजाबी वंशाच्या लोकांना लक्ष्य केले जात आहे. त्यामुळे बंडखोर प्रवाशांची आयडी (ओळखपत्रे) तपासत होते. कोण बलुचिस्तानचे आहेत आणि कोण बाहेरचे आहेत, हे त्यांनी पाहिले. विशेषतः पंजाबी वंशाच्या लोकांचा ते शोध घेत होते, असे अन्य एका प्रवाशाने सांगितले. मी चार तास चालल्यानंतर एका रेल्वेस्थानकावर पोहोचलो, असे सांगून अन्य एक प्रवासी म्हणाला, बंडखोर आले आणि त्यांनी आयडी तपासले. याशिवाय, सर्व्हिस कार्डही त्यांनी चेक केले. माझ्यासमोरच दोन सैनिकांना गोळ्या घातल्या आणि अन्य चौघांना ते घेऊन गेले. त्यांना ते कुठे घेऊन गेले, ते मला समजले नाही. ओखळपत्र तपासल्यानंतर जे पंजाबी आढळले, त्यांना ते बरोबर घेऊन गेले, असेही त्याने सांगितले.

खरंतर, बलुच बंडखोरांचा पंजाबी वंशाच्या लोकांवर राग आहे. ते बऱ्याच काळापासून पंजाबी लोकांचे लक्ष्य करत आहेत. गेल्या वर्षाच्या सुरुवातीपासून आतापर्यंत अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत ज्यात बलुच बंडखोरांनी पंजाबी लोकांची हत्या केली आहे. अनेकदा महामार्गांवर बस थांबवून पंजाबी लोकांना मारले आहे. पंजाबी वंशाचे लोक बलुचिस्तानच्या नैसर्गिक संसाधनांचे बेलगाम वापर करत आहेत, अशी बलुचिस्तान लिबरेशन आर्मीची धारणा आहे. याशिवाय, सैन्य, नोकरशहा, न्याययंत्रणा आणि सत्तेतही पंजाबी वंशाच्या लोकांचा वरचष्मा असल्याबद्दलचा रागही बलुचिस्तानींमध्ये आहे. पाकिस्तानपासून वेगळे होण्यासाठी 1947पासून बलुचिस्तानमधीस नागरिकांचा संघर्ष सुरू आहे.

हेही वाचा – Thackeray Vs Mahayuti Govt : हे राज्य शिवरायांचे नसून मोदींचे झाले…, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल