पुलवामात सुरक्षा दलाला यश, ३ दहशतवादयांचा खात्मा

जम्मू-कश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील त्राल येथे सुरक्षा दलाला मोठे य़श मिळाले आहे. सुरक्षा दलाने बुधवारी पहाटे ३ दहशतवाद्यांचा खात्मा केला. हे तिघेही दहशतवादी अंसार गजवातुल हिंद या दहशतवादी संघटेनेसाठी काम करायचे. जहांगीर रफीक वानी, राजा उमर मकबूल बट आणि उजैर अमीन बट अशी या तिघांची नावे आहेत. हे तिघेही स्थानिक असून जहांगीर याआधी हिजबुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेशी संबंधित होता. दिड महिन्याआधीच तो अंसार गजवातुल हिंद या दहशतवादी संघटनेत सामील झाला होता.

सुरक्षा दलाला त्राल मध्ये दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर जम्मू-कश्मीर पोलीस, सीआरपीएफ आणि सुरक्षा दल यांनी संयुक्त मोहिम राबवत शोध मोहिम सुरू केली. यादरम्यान सुरक्षा दलाला बघून दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. त्यास जवानांनीही चोख प्रत्युत्तर दिले. यावेळी जवानांनी तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले.

यातील जहांगीर हा हिजबुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेचा दुसरा कमांडर होता. जानेवारी २०२० मध्ये हम्मादच्या मृत्यूआधी जहांगीर अंसार गजवा उल हिंदमध्ये सहभागी झाला होता. या तिघांचा दहशतवादी कारवायांमध्ये सहभाग होता. ज्यात सामान्य नागरिकांचे हत्याकांड, नोव्हेंबर २०१९ साली एका ट्रकला आग लावणे, २०१९ सप्टेंबरला त्रालमध्ये आक्षेपार्ह पोस्टर लावण्याचा त्याच्यावर आरोप आहेत.