जम्मू-काश्मीरच्या बडगाममध्ये सुरक्षा दलाला मोठं यश; 3 दहशतवाद्यांचा खात्मा

गेल्या वर्षी 171 दहशतवादी मारले गेले. या यादीतील १९ दहशतवादी हे पाकिस्तानचे होते तर 151 स्थानिक असल्याचे सांगण्यात आलेय.

Jammu and Kashmir Three Jaish terrorists neutralised by security forces in Budgam
जम्मू-काश्मीरच्या बडगाममध्ये सुरक्षा दलाला मोठं यश; 3 दहशतवाद्यांचा खात्मा

जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. बडगामच्या जोलवा क्रालपोरा चाडूरा भागात सुरक्षा दलांनी चकमकीत तीन दहशतवाद्यांना ठार केले आहे. मारले गेलेले दहशतवादी जैश-ए-मोहम्मदचे असल्याची माहिती समोर आली आहे. या दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा आणि इतर साहित्य जप्त केले आहे.

गुरुवारी सुरक्षा दलांना बडगामच्या जोलवा क्रालपोरा चाडूरा भागात काही दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली होती. यानंतर दहशतवाद्यांविरोधात शोध मोहीम राबवण्यात आली. यादरम्यान दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार सुरु केला. गुरुवारपासून ही चकमक सुरु होती. दरम्यान प्रत्युत्तरादाखल सुरक्षा दलांनी तीन दहशतवाद्यांना ठार केले.

2022 च्या सात दिवसात ही पाचवी चकमक

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात सुरक्षा दलाची सातत्याने कारवाई सुरु आहे. याआधी बुधवारी सुरक्षा दलांनी पुलवामामध्ये जैश-ए-मोहम्मद या दहशवादी संघटनेच्या 3 दहशतवाद्यांना ठार केले आहे. 2022 च्या पहिल्या 7 दिवसांत सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेली ही 5 वी चकमक आहे. तर अलीकडेच दक्षिण काश्मीरच्या अनंतनागमध्ये लष्कराने 9 दहशतवाद्यांचा खात्मा केला.

 

गेल्या वर्षी 171 दहशतवादी ठार

लष्कराच्या आकडेवारीनुसार, गेल्या वर्षी 171 दहशतवादी मारले गेले. या यादीतील 19 दहशतवादी हे पाकिस्तानचे होते तर 151 स्थानिक असल्याचे सांगण्यात आलेय. मात्र या पुढेही दहशतवाद्यांविरोधात मोठी कारवई करण्याची तयारी सुरु आहे.


coronavirus india : कोरोनाची त्सुनामी! देशात 7 महिन्यानंतर रुग्णसंख्या 1 लाखांच्या पुढे