नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधील (Jammu Kashmir) दहशतवाद्यांचा संपवण्यासाठी सुरक्षा दल वेळोवेळी शोध मोहीम राबवत असतात. अशीच एक शोध मोहीम राजौरी (Rajouri) येथे सुरू असताना लष्कराच्या दोन जवानांना वीरमरण आले आहे, तर यात एका अधिकाऱ्यासह चार जवान जखमी झाले आहेत. सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये यांच्यामध्ये गेल्या 7 तासांपासून चकमक सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राजौरीमधील कंडी भागात २ ते ३ दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली. त्यानंतर शोध मोहिमेदरम्यान सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली. जम्मू-काश्मीरमध्ये तीन दिवसांतील ही तिसरी चकमक आहे. अशी माहिती मिळत आहे की, हे तेच दहशतवादी आहेत, ज्यांनी पुंछमध्ये लष्कराच्या ट्रकवर हल्ला केला होता. दरम्यान, दहशतवाद्यांनी आयईडी स्फोट घडवून आणला, ज्यात लष्कराचे दोन जवानांना वीरमरण आले आहे, तर चार जवान जखमी झाले आहेत. सध्या राजौरीमध्ये सध्या इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.
#WATCH | Jammu: An encounter has started in the Kandi area of Rajouri. Security forces on the spot.
(Visuals deferred by unspecified time) pic.twitter.com/WGsPJXGh2w
— ANI (@ANI) May 5, 2023
दरम्यान, अनंतनाग जिल्ह्यातील बिजबेहारा भागात गुरुवारी (4 मे) संध्याकाळी दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर हल्ला केला होता. या हल्ल्यात एक सुरक्षा रक्षक किरकोळ जखमी झाला असून त्याला रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. या हल्ल्याची जबाबदारी काश्मीर टायगर्सने घेतली होती. ग्रुपने एका पोस्टमध्ये म्हटले की, या हल्ल्यात वरिष्ठ अधिकाऱ्यांसह अनेक सैनिक जखमी झाले आहेत. काश्मीर टायगर्स अशा आणखी हल्ल्यांची योजना आखत आहे.
दहशतवाद हा जगासाठी सर्वात मोठा धोका
गोव्यातील पणजी येथे सुरू असलेल्या SCO बैठकीचा आज शेवटचा दिवस आहे. या बैठकीत पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुत्तोही सहभागी झाले आहेत. त्यांनी भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांचीही भेट घेतली. दरम्यान, या बैठकीपूर्वी राजौरीतील चकमक सुरू झाली. त्यामुळे बैठकीत भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर भुत्तोंसमोर म्हणाले की, दहशतवाद हा जगासाठी सर्वात मोठा धोका आहे.