श्रीनगरमध्ये दहशतवाद्यांकडून शिक्षक आणि मुख्याध्यापकाची गोळ्या झाडून हत्या

जम्मू-कश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांपासून दहशतवाद्यांकडून सामान्य नागरिकांना लक्ष्य करण्यात येत आहे. श्रीनगर येथे आज गुरुवारी एका शाळेत घुसून दहशतवाद्यांनी शिक्षक व मुख्याध्यापकांवर गोळ्या झाडून त्यांची हत्या केली. याघटनेमुळे खळबळ उडाली असून गेल्या ५ दिवसात दहशतवाद्यांनी ठार केलेल्या सामान्य नागरिकांची संख्या ७ झाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी ११ वाजता श्रीनगर मधील ईदगाह येथील संगम भागातील मुलांच्या सरकारी शाळेत दहशतवाद्यांनी बेछूट गोळीबार केला. त्यात मुख्याध्यापक सुरुंदर कौर आणि शिक्षक दीपक चंद गंभीर जखमी झाले. त्या दोघांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. यादरम्यान, सुरक्षा दलाने या भागात सर्च ऑपरेशन सुरू केले आहे.

तर याघटनेचे वृत्त कळताच जम्मू-कश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी टि्वट केले. त्यात या घटनेप्रती दु:ख व्यक्त केले असून मृतव्यक्तींच्या आत्म्याला शांती मिळो अशी प्रार्थना केली.
जम्मू-कश्मीरमध्ये या वर्षभरात दहशतवाद्यांनी २५ सामान्य नागरिकांची हत्या केली आहे.