Sunday, September 26, 2021
27 C
Mumbai
घर ट्रेंडिंग 'जगात सगळ्यात सभ्य आणि सहिष्णू फक्त हिंदूच',भाजप-RSS वरील वक्तव्यावर जावेद अख्तर यांचे...

‘जगात सगळ्यात सभ्य आणि सहिष्णू फक्त हिंदूच’,भाजप-RSS वरील वक्तव्यावर जावेद अख्तर यांचे रोखठोक मत

“तालिबानला कोणतेही अल्पसंख्याक समुदाय अजिबात आवडत नाहीत; त्याचप्रमाणे हिंदू उजव्या विचारसरणीनेही अल्पसंख्याकांबद्दल त्यांच्या मनात कोणत्या प्रकारचे विचार आणि भावना आहेत हे वेळोवेळी त्यांच्या भाषणांमधून आणि घोषणांमधून आणि जेव्हा जेव्हा त्यांना संधी मिळते तेव्हा त्यांच्या कृत्यांमधून स्पष्ट केले आहे.

Related Story

- Advertisement -

प्रख्यात पटकथा लेखक आणि गीतकार जावेद अख्तर यांनी शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’ मध्ये एक लेख लिहला असून या लेखामध्ये त्यांनी म्हटले आहे की हिंदू हे जगातील सर्वात “सुसंस्कृत” आणि “सहिष्णु” बहुसंख्य आहेत. तालिबानची उजव्या विचारसरणीच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) आणि विश्व हिंदू परिषद (व्हीएचपी) यांच्याशी तुलना केल्यानंतर, जावेद अख्तर यांना  टीकेला सामोरे जावे लागलो होते यानंतर जावेद अख्तर यांनी मौन सोडले असून सामना मधून त्यांनी आपले परखड मत मांडेल आहे.

सामना लेखामध्ये जावेद अख्तर काय म्हणाले

“मी जेव्हा 3 सप्टेंबर 2021 रोजी ‘एनडीटीव्ही’ वाहिनीला मुलाखत दिली तेव्हा मला अजिबात कल्पना नव्हती की, या मुलाखतीचे इतके तीव्र पडसाद उमटतील. एका बाजूला असे काही लोक आहेत ज्यांनी शक्य तितक्या तीव्र भाषेत त्यांचा निषेध आणि संताप व्यक्त केला आहे, तर दुसरीकडे देशाच्या कानाकोपऱ्यातील असे अनेक लोक आहेत ज्यांनी मला समर्थनाचे संदेश पाठवले आहेत आणि माझ्या मताशी त्यांची सहमती व्यक्त केली आहे. मी त्या सर्वांचे नक्कीच आभार मानीन, पण सर्वप्रथम मला माझ्या उपरोल्लेखित मुलाखतीचा तिरस्कार करणाऱ्यांच्या आरोपांना आणि टीकेला उत्तर द्यायचे आहे. प्रत्येक टीकाकाराला वैयक्तिकरीत्या उत्तर देणे शक्य नसल्यामुळे हे माझे जाहीर उत्तर आहे,” असं जावेद अख्तर यांनी स्पष्ट केलं आहे.

- Advertisement -

“माझ्या टीकाकारांनी म्हटले आहे की, मी हिंदू धर्मातील कट्टर उजव्या विचारसरणीच्या लोकांवर टीका करत असताना मुस्लिमांमधील धर्मांधांच्या विरोधात मात्र कधीच ठामपणे भूमिका घेतलेली नाही. त्यांनी माझ्यावर, मी मुस्लिम समुदायातील तिहेरी तलाकबद्दल, पडदा पद्धतीविषयी किंवा इतर कोणत्याही प्रतिगामी प्रथांविषयी काहीही बोलत नाही, असा आरोप केला आहे. मला याचे अजिबात आश्चर्य वाटलेले नाही की, गेल्या काही वर्षांत मी काय काय केले आहे याविषयी ते पूर्णपणे अनभिज्ञ आहेत. कारण मी काही इतकाही महत्त्वाचा माणूस नाही की मी काय करतोय किंवा काय करत होतो हे प्रत्येकाला माहिती असावे,” असा उपहासात्मक टोला जावेद अख्तर यांनी लगावला आहे.

गेल्या दोन दशकांमध्ये धर्मांध मुस्लिमांपासून माझ्या जिवाला धोका-

“मात्र वस्तुस्थिती अशी आहे की, गेल्या दोन दशकांमध्ये धर्मांध मुस्लिमांपासून माझ्या जिवाला असलेल्या धोक्यांमुळे मला दोनवेळा पोलीस संरक्षण देण्यात आले होते. पहिले, जेव्हा तिहेरी तलाकच्या मुद्दय़ावर देशात फारशी चर्चा नव्हती तेव्हादेखील मी तिहेरी तलाकला जोरदार विरोध तर केला होताच, त्याशिवाय मुस्लिम फॉर सेक्युलर डेमोक्रेसी (एमएसडी) नावाच्या संस्थेसह हैदराबाद, अलाहाबाद, कानपूर आणि अलिगढ यांसारख्या हिंदुस्थानातील अनेक शहरांचा दौरा केला होता. अनेक सार्वजनिक व्यासपीठांवरून मी या प्रतिगामी पद्धतीच्या विरोधात बोललो आहे. या सगळय़ांचा परिणाम म्हणून मला जीवे मारण्याच्या धमक्या येऊ लागल्या. मुंबईमधील एका उर्दू वृत्तपत्रात त्या ठळकपणे प्रसिद्ध झाल्या होत्या. ही 2007 मधील घटना आहे. मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त ए. एन. रॉय यांनी त्यावेळी त्या वृत्तपत्राचे संपादक आणि प्रकाशक यांना प्रत्यक्ष बोलावून घेतले आणि इशारा दिला की, जर नंतर कोणतेही हिंसक कृत्य घडले तर त्यासाठी मुंबई पोलीस या वृत्तपत्राला जबाबदार धरतील 2010 मध्ये एका टीव्ही चॅनेलवर मौलाना कल्बे जवाद या एका प्रख्यात मुस्लिम धर्मगुरूशी मी पडदा पद्धतीच्या प्रतिगामी प्रथेवर वादविवाद केला होता. मौलाना त्यामुळे खूप नाराज झाले होते आणि काही दिवसांत लखनौमध्ये माझे पुतळे जाळण्यात आले आणि मला पुन्हा एकदा द्वेषपूर्ण मेल आणि जीवे मारण्याच्या धमक्या येऊ लागल्या. पुन्हा मला मुंबई पोलिसांनी संरक्षण पुरवले. म्हणूनच मी मुस्लिम कट्टरवाद्यांच्या विरोधात बोलत नाही हा माझ्यावरील आरोप पूर्णपणे निराधार आहे,” असं जावेद अख्तर यांनी स्पष्ट केलं आहे.

तालिबानचे गौरवीकरण केल्याचा आरोप-

- Advertisement -

“काहींनी माझ्यावर तालिबानचे गौरवीकरण केल्याचा आरोप केला आहे. यापेक्षा तथ्यहीन आणि हास्यास्पद काहीही असू शकत नाही आणि माझ्या मनात अशा मानसिकतेच्या लोकांबद्दल फक्त तिरस्कार आहे. या वादग्रस्त मुलाखतीच्या एका आठवडय़ापूर्वी 24 ऑगस्ट 2021 रोजी मी एक ट्विट केले होते की, ‘मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या दोन सदस्यांनी रानटी तालिबानने अफगाणिस्तानवर पुन्हा ताबा मिळविल्याबद्दल अत्यंत आनंद व्यक्त केला आहे हे धक्कादायक आहे. जरी बोर्डाने त्यापासून अंतर राखले असले तरी तेवढे पुरेसे नाही. बोर्डाने त्यांचे मत अत्यंत निःसंदिग्ध शब्दांत व्यक्त केले पाहिजे. मी येथे माझ्या या मतांचा पुनरुच्चार करतो आहे. कारण मला हिंदू उजव्या विचारसरणीच्या समर्थकांना मी मुस्लिम समुदायातील प्रतिगामी चालीरीती आणि प्रथांच्या विरोधात उभा राहत नाही या खोटय़ा सबबीमागे लपू द्यायचे नाही. त्यांनी माझ्यावर हिंदू धर्माचा आणि हिंदूंचा अपमान केल्याचाही आरोप केला आहे. यामध्ये एक कणभरही सत्य नाही,” असं जावेद अख्तर यांनी स्पष्ट केलं आहे.

“खरे तर नुकत्याच एका मुलाखतीत मी म्हटले होते की, ‘हिंदू हे जगातील सर्वात सभ्य आणि सहिष्णू बहुसंख्याक आहेत, याचा मी अनेक वेळा पुनरुच्चार केला आहे आणि हेदेखील ठामपणे बोललो आहे की, हिंदुस्थान कधीही अफगाणिस्तान होऊ शकत नाही. कारण हिंदुस्थानी हे निसर्गतः कट्टरवादी नाहीत; नेमस्त असणे, मध्यममार्गी भूमिका घेणे हे त्यांच्या डीएनएमध्ये आहे. मग तुम्हाला प्रश्न पडेल की, इतक्या ठामपणे आणि स्पष्ट बोलूनही काही लोक माझ्यावर इतके नाराज का आहेत? याचे उत्तर असे आहे की, मी सर्वच धर्मांमधील कट्टर उजव्या विचारसरणीच्या लोकांचा, धर्मांधांचा, कडव्यांचा स्पष्टपणे निषेध केला आहे. प्रत्येक समुदायाच्या उजव्या विचारसरणीच्या लोकांमध्ये विलक्षण साम्य आहे, यावर मी जोर दिला आहे,” असं जावेद अख्तर म्हणाले आहेत.

जावेद अख्तर यांनी केलेल्या विधानाचे दिले स्पष्टीकरण

“तालिबान आणि हिंदू उजव्या विचारसरणीच्या मानसिकतेत मला बरेच साम्य आढळते, याचादेखील माझ्या टीकाकारांना प्रचंड राग आला आहे. पण वस्तुस्थिती अशी आहे की, त्यांच्यात खरंच खूप साम्य आहे. तालिबान धर्मावर आधारित इस्लामिक सरकार स्थापन करत आहे. हिंदू उजव्या विचारसरणीला हिंदू राष्ट्र स्थापन करायचे आहे. तालिबानला स्त्रीयांच्या हक्कांवर निर्बंध घालायचे आहेत आणि त्यांना उपेक्षित ठेवायचे आहे. हिंदू उजव्या विचारसरणीलाही स्त्रीया आणि मुलींना स्वातंत्र्य दिलेले आवडत नाही, हे स्पष्ट केले आहे. उत्तर प्रदेश, गुजरातपासून कर्नाटकपर्यंत अनेक राज्यांत रेस्टॉरंट, बागेत किंवा कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी एकत्र बसल्यामुळे तरुण-तरुणींना निर्दयपणे मारहाण करण्यात आली आहे. मुस्लिम धर्मांधांप्रमाणेच हिंदू उजव्या विचारसरणीलाही स्त्रियांचा स्वतःचा जीवनसाथी निवडण्याचा अधिकार मान्य नाही. अलीकडेच एका अत्यंत महत्त्वाच्या उजव्या विचारसरणीच्या नेत्याने म्हटले आहे की, स्त्रिया स्वतःच्या मर्जीने आणि स्वतंत्रपणे जगण्यास सक्षम नाहीत. तालिबानप्रमाणेच हिंदू उजवी विचारसरणीही कोणत्याही मानवनिर्मित कायदा किंवा न्यायालयापेक्षा धर्म आणि आस्था या गोष्टी श्रेष्ठ असल्याचा दावा करते,” असं सांगत जावेद अख्तर यांनी काही दिवसांपूर्वी केलेल्या आपल्या वक्तव्याचं स्पष्टीकरण समाना मधून दिलं आहे.

तालिबानला कोणतेही अल्पसंख्याक समुदाय अजिबात आवडत नाहीत

“तालिबानला कोणतेही अल्पसंख्याक समुदाय अजिबात आवडत नाहीत; त्याचप्रमाणे हिंदू उजव्या विचारसरणीनेही अल्पसंख्याकांबद्दल त्यांच्या मनात कोणत्या प्रकारचे विचार आणि भावना आहेत हे वेळोवेळी त्यांच्या भाषणांमधून आणि घोषणांमधून आणि जेव्हा जेव्हा त्यांना संधी मिळते तेव्हा त्यांच्या कृत्यांमधून स्पष्ट केले आहे. तालिबान आणि या कट्टर गटांमध्ये फरक एवढाच आहे की, तालिबानकडे आज अफगाणिस्तानात अनिर्बंध सत्ता आहे आणि त्यांना प्रश्न विचारणारे तिथे कोणीही नाही तर हिंदुस्थानात मात्र हिंदुस्थानी संविधानाशी पूर्णपणे विसंगत असणाऱ्या तालिबानी विचारसरणीच्या या हिंदुस्थानी आवृत्तीला मोठय़ा प्रमाणात विरोध आहे. आपले संविधान धर्म, समुदाय, जात पिंवा लिंग या आधारावर भेदभाव करीत नाही. आपल्याकडे न्यायपालिका आणि प्रसारमाध्यमांसारख्या संस्थाही आहेत. या दोघांमधील फरकाचा एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तालिबानने अफगाणिस्तानात स्वतःचे लक्ष्य आता साध्य केले आहे. हिंदू उजवी विचारसरणीदेखील हिंदुस्थानात तशी परिस्थिती निर्माण करण्यासाठी आटोकाट प्रयत्न करीत आहे. सुदैवाने हा हिंदुस्थान देश आहे आणि असे काही हिंदुस्थानी लोक आहेत जे याला कडवा प्रतिकार करीत आहेत,” असं जावेद अख्तर यांनी लिहलं आहे.

गोळवलकरांचा उल्लेख केल्याने काही लोक नाराज

“माझ्या मुलाखतीत मी एम. एस. गोळवलकर यांना नाझी जर्मनीबद्दल आणि अल्पसंख्याकांना हाताळण्याच्या नाझींच्या पद्धतीबद्दल असलेल्या कौतुकाचा उल्लेख केल्यामुळेही काही लोक माझ्यावर नाराज आहेत. गोळवलकर 1940 ते 1973 पर्यंत संघ परिवाराचे सर्वेसर्वा होते. त्यांनी ‘वुई ऑर अवर नेशनहूड डिफाइंड’ आणि ‘अ बंच ऑफ थॉट्स’ ही दोन पुस्तके लिहिली. ही पुस्तके इंटरनेटवर सहज उपलब्ध आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये त्यांच्या समर्थकांनी यापैकी पहिले पुस्तक गुरुजींनी लिहिलेच नाही असे म्हणून हात झटकायचा प्रयत्न सुरू केला आहे. अशा प्रकारे नाकारण्याचे कारण म्हणजे कितीही वाईट धर्मांधदेखील आज या पुस्तकातील मजपुराचे समर्थन करण्यास धजावणार नाही. अनेक आवृत्त्या निघालेल्या या पुस्तकात एम. एस. गोळवलकर यांचे नाव तेव्हा चुकीने छापले गेले होते, असे त्यांचे समर्थक आता म्हणतात. ‘वुई ऑर अवर नेशनहूड डिफाइंड’ हे पुस्तक पहिल्यांदा 1939 मध्ये प्रकाशित झाले होते. गोळवलकर हे 1973 पर्यंत हयात होते. 1939 ते 1973 या काळात, म्हणजेच तब्बल 34 वर्षांत या पुस्तकाच्या अनेक आवृत्त्या प्रकाशित झाल्या, पण गोळवलकर यांनी कधीही हे पुस्तक आपण लिहिलेले नाही असे म्हणून ते नाकारले नाही. म्हणून साहजिकच त्यांच्या समर्थकांनी त्यांच्या लेखकत्वाला नकार देणं हे राजकीय स्वार्थाशिवाय दुसरं काही नाही,”अशी टीका जावेद अख्तर यांनी केली आहे.

संघ परिवारातील काही संघटनांसंदर्भात माझा आक्षेप

“होय, या मुलाखतीत मी संघ परिवारातील काही संघटनांसंदर्भात माझे आक्षेप व्यक्त केले आहेत. धर्म, जात आणि पंथाच्या आधारावर लोकांमध्ये फूट पाडणाऱ्या कोणत्याही विचारसरणीला माझा विरोध आहे आणि अशा प्रकारच्या कोणत्याही भेदभावाच्या विरोधात असलेल्या सर्वांच्या पाठीशी मी उभा राहिलो आहे. कदाचित म्हणूनच 2018 मध्ये हिंदुस्थानातील सर्वात आदरणीय मंदिरांपैकी एक असलेल्या वाराणसीच्या ‘संकटमोचन मंदिरा’ने मला आमंत्रित केले आणि त्याहूनही अभूतपूर्व म्हणजे, मला ‘शांतिदूत’ अशी उपाधी आणि ट्रॉफी देण्यात आली. मंदिराच्या आत भाषण देण्याचीही मला संधी देण्यात आली. माझ्यासारख्या नास्तिकासाठी हा अत्यंत दुर्मिळ सन्मान आहे,” गीतकार जावेद अख्तर यांनी संपूर्ण लेखात आपले प्रखर मत मांडत स्पष्टीकरण दिले आहे.


हे हि वाचा – जग कोरोना संकटातून लवकर मुक्त होणार नाही, WHO ने दिला इशारा

 

- Advertisement -