Homeदेश-विदेशHemant Soren : जमीन गैरव्यवहार प्रकरणात झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना ईडीकडून...

Hemant Soren : जमीन गैरव्यवहार प्रकरणात झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना ईडीकडून अटक

Subscribe

रांची : मनी लाँड्रिंग प्रकरणात झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना अटक करण्यात आली आहे. हेमंत सोरेन यांना ईडीने ताब्यात घेतले आहे. ईडीकडून अटक होताच, त्यांनी आपला राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द केला. महत्त्वाची बाब म्हणजे यावेळी नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या. कारण ईडीने सोरेन यांना ताब्यात घेतल्यानंतर ते ईडीच्या पथकासोबतच राज्यपालांकडे गेले आणि ईडीच्या अधिकाऱ्यांसमोर त्यांनी आपला राजीनामा राज्यपालांकडे दिला. तर राज्यपालांकडूनही तत्काळ तो राजीनामा मंजूर करण्यात आला आहे. हेमंत सोरेन यांच्या राजीनाम्यानंतर आता चंपई सोरेन हे मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील. देशात अनेक राज्यांमध्ये विविध कारणांमुळे राजकीय भूकंप झाले आहेत. परंतु झारखंडध्ये ईडीमुळे मोठा राजकीय भूकंप झाला आहे. गेल्या काही तासांमध्ये झारंखडच्या राजकारणात मोठी खळबळ उडालेली पाहायला मिळत आहे. (Jharkhand CM Hemant Soren arrested in land embezzlement case)

हेमंत सोरेन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर मुख्यमंत्री पदाची शपथ घेणारे चंपई सोरेन यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. चंपई सोरेन यांनी राज्यपालांची भेट घेत 43 आमदारांचे समर्थन असल्याचा दावा राज्यपालांसमोर केला. तर यावेळी झारखंड काँग्रेस आणि झारखंड मुक्ती मोर्चा यांचे सर्व आमदार हे राजभवनात उपस्थित असल्याचे सांगण्यात आले. परंतु, नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणारे चंपई सोरेन यांचा शपथविधी सोहळा नेमका कधी होणार, याबाबत कोणतीही माहिती अद्याप देण्यात आलेली नाही. तर दुसरीकडे मात्र, हेमंत सोरेन हे देशातील पहिले असे मुख्यमंत्री आहेत, ज्यांना पदावर असतानाच ईडीकडून अटक करण्यात आली आहे.

कोण आहे चंपई सोरेन?

चंपई सोरेन हे सरायकेला मतदारसंघाचे आमदार असून सध्या ते परिवहन, अनुसूचित जमाती, अनुसूचित जाती आणि मागासवर्गीय कल्याण मंत्री आहेत. ते झारखंड मुक्ती मोर्चाचे उपाध्यक्षही आहेत. चंपई सोरेन हे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचे विश्वासू सहकारी मानले जातात. परंतु, हेमंत सोरेन यांच्या पत्नी कल्पना मुख्यमंत्री होऊ शकतात अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. मात्र विधिमंडळ पक्षाच्या बैठकीनंतर चंपई सोरेन यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी देण्याचा निर्णय घेण्यात आला.