घरदेश-विदेशJharkhand Political Crisis: चंपाई सोरेन यांच्या हाती सत्ता दिली खरी.. पण, JMM...

Jharkhand Political Crisis: चंपाई सोरेन यांच्या हाती सत्ता दिली खरी.. पण, JMM सावधान; नेमकं कारण काय?

Subscribe

रांची: झारखंड मुक्ती मोर्चाच्या विधिमंडळ पक्षाचे नेते चंपाई सोरेन यांनी शुक्रवारी नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राजभवनात राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांनी त्यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. चंपाई सोरेन यांच्यासोबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आलमगीर आलम आणि आरजेडी नेते सत्यानंद भोक्ता यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. राजभवनाच्या दरबार हॉलमध्ये हा शपथविधी सोहळा पार पडला. यावेळी झामुमो आघाडीचे वरिष्ठ नेते उपस्थित होते. शपथविधीनंतर झामुमोचे आमदार चार्टर्ड विमानाने हैदराबादला गेले आहेत. ते तेथे दोन दिवस राहणार आहेत. सोमवारी फ्लोर टेस्टमध्ये भाग घेणार आहेत. (Jharkhand Political Crisis Power given to Champai Soren But JMM beware What is the real reason)

67 वर्षीय आदिवासी नेते चंपाई सोरेन यांनी राज्याचे 12 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. झारखंडमधील कोल्हान भागातील ते सहावे मुख्यमंत्री बनले. या भागात पूर्व सिंगभूम, पश्चिम सिंगभूम आणि सेराकेला-खरसावन जिल्ह्यांचा समावेश होतो. याआधी बुधवारी झामुमोच्या बैठकीत चंपाई यांची विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड करण्यात आली. त्यानंतर त्यांनी राजभवनात जाऊन सरकार स्थापनेचा दावा केला. गुरुवारी रात्री राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांनी शुक्रवारी शपथविधीची वेळ निश्चित केली होती.

- Advertisement -

‘सभागृहात आमची ताकद दिसेल’

मुख्यमंत्री चंपाई सोरेन म्हणाले, हेमंत सोरेन यांनी आदिवासींच्या सर्वांगीण विकासासाठी काम केले. त्यांनी सुरू केलेल्या कामाला गती देईन. जनतेच्या आशा-आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही कामे वेळेत पूर्ण करू. आमच्या आघाडीच्या ताकदीमुळे राज्यात अस्थिरता निर्माण करण्याचा विरोधकांचा प्रयत्न फसला आहे. काँग्रेस नेते बन्ना गुप्ता म्हणाले, सभागृहात आमची ताकद तुम्हाला दिसेल. रांची विमानतळावर विचारले असता आमदार कुठे जात होते? यावर झामुमोचे आमदार हाफिझुल हसन म्हणाले, बिर्याणी खायला हैदराबादला जात आहोत. झामुमोचे नेते मनोज पांडे म्हणाले, 39 आमदार हैदराबादला जात आहेत. ज्यांना उपस्थित राहायचे आहे ते (शपथ समारंभाच्या वेळी) उपस्थित राहतील.

‘मुलभूत सुविधांवर काम व्हायला हवे’

गव्हर्नर सीपी राधाकृष्णन म्हणाले की, आम्ही नेहमीच एकच अपेक्षा करतो – गरीबांना सेवा मिळावी, आम्ही त्यांना त्यांच्या मूलभूत गरजा, चांगले रस्ते, चांगले पिण्याचे पाणी, चांगल्या शाळा, चांगली आरोग्य सेवा निर्माण करण्यासाठी काम केले पाहिजे. शेतकऱ्यांना लाभ मिळावा यासाठी संपूर्ण राज्यातील सुविधांमध्ये सुधारणा कराव्या लागतील.

- Advertisement -

हा आमचा मोठा विजय

JMM खासदार महुआ माजी म्हणाले, चंपाई सोरेन आज झारखंडच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. हा पक्षाचा मोठा विजय आहे. भाजपने राष्ट्रपती राजवट लागू करण्याची पूर्ण तयारी केली होती, पण तो कट उधळून लावला आहे. आम्हाला पूर्ण विश्वास आहे. सीएम (हेमंत सोरेन) लवकरच परततील, असे कोर्टात सांगण्यात आले आहे. सोमवारी फ्लोर टेस्ट घेण्यात येणार आहे.

आम्हाला कोणीही तोडू शकत नाही’

प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष राजेश ठाकूर यांनी सांगितले की, चंपाई सोरेन यांना त्यांच्या सरकारचे बहुमत सिद्ध करण्यासाठी 10 दिवसांची मुदत देण्यात आली आहे. काँग्रेस झामुमोच्या नेतृत्वाखालील आघाडीत सहयोगी आहे. तर चंपाई सोरेन म्हणाले होते, आम्ही एक आहोत. आमची युती खूप मजबूत आहे. ती कोणीही तोडू शकत नाही.

ईडीने हेमंत सोरेनला अटक केली

बुधवारी अंमलबजावणी संचालनालयाने हेमंत सोरेन यांची जमीन घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात सात तासांहून अधिक काळ चौकशी केली होती. त्यानंतर अटक करण्याचा निर्णय घेण्यात आला. हेमंत यांनी आधी राजभवनात जाऊन राजीनामा दिला, त्यानंतर त्यांनी अटक मेमोवर स्वाक्षरी केली. न्यायालयाने हेमंत सोरेन यांना 5 दिवसांची ईडी कोठडी सुनावली आहे.

चंपाई सोरेन यांनी शुक्रवारी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर झामुमोच्या नेतृत्वाखालील आघाडीचे आमदार रांची विमानतळावर पोहोचले आणि हैदराबादला रवाना झाले. ते तेथे दोन दिवस राहणार आहेत. हे आमदार सोमवारपर्यंत परतण्याची शक्यता आहे. सुमारे 35 आमदारांना दोन चार्टर्ड विमानांतून हैदराबादला पाठवण्यात आले आहे. येथे, हेमंत सोरेन यांच्या राजीनाम्यानंतर, इंडिया ब्लॉकच्या नेत्यांनी नवीन मुख्यमंत्र्यांच्या नियुक्तीतील विलंबाचा मुद्दा संसदेत उपस्थित केला आणि राज्यपालांवर अंतरिम व्यवस्था न केल्याचा आरोप केला. विरोधी पक्षाच्या खासदारांनी लोकसभा आणि राज्यसभेतून सभात्याग केला.

झारखंडचा मुद्दा संसदेत मांडला

राज्यसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी नवीन मुख्यमंत्र्यांच्या नियुक्तीच्या प्रक्रियेची तुलना आठवड्यापूर्वी बिहारमध्ये आणि नंतर झारखंडमध्ये झालेल्या उलथापालथीशी केली. बिहारमध्ये नितीशकुमार यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यावर त्यांचा राजीनामा तत्काळ स्वीकारण्यात आल्याचे खरगे यांनी सांगितले. नवीन सरकार स्थापन होईपर्यंत त्यांना पदावर राहण्यास सांगितले होते आणि त्यानंतर 12 तासांतच नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. पण झारखंडमध्ये हेमंत सोरेन यांनी बुधवारी राजीनामा दिला तेव्हा कोणतीही अंतरिम व्यवस्था करण्यात आली नाही. ते म्हणाले, हेमंत यांच्या राजीनाम्यानंतर 81 सदस्यांच्या विधानसभेत 43 समर्थक आमदारांच्या स्वाक्षरीचे पत्र देण्यात आले. यामध्ये विधिमंडळ पक्षनेते निवडीबाबत माहिती देण्यात आली. अन्य चार आमदारही युतीचे समर्थक असून राज्याबाहेर असल्याने त्यांना पाठिंब्याच्या पत्रावर स्वाक्षरी करता आली नाही. पण त्यांनी (राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन) कोणतीही व्यवस्था केली नाही.

(हेही वाचा: Sanjay Raut : अखेर प्रकाश आंबेडकर मविआच्या बैठकीला हजर; राऊत म्हणतात, भाजपाला मदत होईल…)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -