ब्रेकअप झाल्याने प्रियकराने केली प्रेयसीची हत्या

Pune Police arrested husband for killing his wife
(फोटो प्रातिनिधिक आहे)

प्रेयसीने ब्रेकअप केल्याने माथेफिरू विवाहीत तरुणाने (२६) तिची झोपेत गोळ्या घालून हत्या केली. पण ती ठार झाल्याची खात्री करण्यासाठी त्याने नंतर तिच्या गळ्यावर अनेकवेळा भोसकल्याची भयंकर घटना दक्षिण कोलकाता येथे शनिवारी सकाळी घडली आहे. प्रियंका पुरैकत (२०) असे मृत तरुणीचे नाव असून राकेश हल्दर (२६) असे आरोपीचे नाव आहे. त्याला अटक करण्यात आली आहे.

प्रियंका व राकेश यांचे चार वर्षांपासून अनैतिक संबंध होते. राकेश विवाहीत असल्याने त्याने प्रियंकाबरोबर लग्नास नकार दिला होता. यामुळे संतप्त झालेल्या प्रियंकाने राकेशबरोबर प्रेमसंबध ठेवण्यास नकार दिला व त्याच्याशी संबंध तोडले. यामुळे राकेश संतापला होता. त्याने वारंवार प्रियंकाला समजावण्याचा प्रयत्न केला. पण तिने त्याला नकार दिला. यामुळे प्रियंकाला कायमची अद्दल घडवण्याचा राकेशने निर्णय घेतला. त्यासाठी त्याने युट्यूबवर बंदूक कशी तयार करायची ते बघितले. त्यानंतर त्याने एक बंदूक बनवली. प्रियंका आई व काकीबरोबर राहत होती. शनिवारी सकाळी आठच्या सुमारास ती झोपली असताना राकेश मागच्या दाराने तिच्या घरी गेला. प्रियंकाची आई कामासाठी बाहेर गेली होती. तर काकी अंगणात होती. हे बघून राकेशने झोपेत असलेल्या प्रियंकावर गोळ्या झाडल्या. त्यात तीचा जागीच मृत्यू झाला. पण ती मृत झाल्याची खात्री पटवण्यासाठी राकेशने चाकूने तिच्या गळ्यावर अनेकवेळा भोसकले. पण प्रियंका काहीच प्रतिकार करत नसल्याचे बघून तिचा मृत्यू झाल्याची राकेशची खात्री झाली. त्यानंतर सायकलवरून तो पळून गेला. पण प्रियंकाच्या काकीने त्याला घरातून बाहेर पळत येताना बघितले. आत जाऊन बघताच प्रियंकाचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह बघून तिने आरडाओरडा केला. त्यानंतर पोलिसांनी राकेशच्या मुसक्या आवळल्या.