नवी दिल्ली : आजकाल लोकं कशाकशाची चोरी करतील काही सांगता येत नाही. हरयाणातील जिंद जिल्ह्यातून अशीच एक धक्कादायक चोरी समोर आली आहे. येथील एका ऍनिमल हाऊस अर्थात प्राणी घरातून 3500 हून अधिक चिचुंद्र्या आणि 150 उंदरांची चोरी झाली आहे. एवढेच नाही तर चोरांनी या उंदरांचे खाणे देखील पळवले आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून एकाला अटक केली आहे. (jind haryana large number of rats mice and feed disappeared from animal house fir loged in police station)
हरयाणातील जिंद जिल्ह्यातील ढाठरथ गावातील ही घटना आहे. चोरांनी केवळ उंदीर आणि चिचुंद्री पळवले नाहीत तर त्यांच्या खाण्याच्या 12 गोण्या देखील पळवल्या आहेत. गावातील प्राणी घरात ही चोरी झाली आहे. हे प्राणी घर छोट्या प्राण्यांवरील संशोधन आणि ब्रीडिंगसाठी वापरले जाते. पोलिसांनी या प्रकरणाच्या चौकशीस सुरुवात केली असून दोघांविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा – Plane Crash : विमान प्रवाशांसाठी डिसेंबर ठरला घातक; एकाच महिन्यात 6 अपघात अन् 234 जणांचा मृत्यू
अशी उघडकीस आली चोरी
या प्राणीसंग्रहालयाचे मालक राजेश कुमार यांना 17 डिसेंबर रोजी उंदरांची संख्या कमी झाल्याचे जाणवले. तेव्हा त्यांना संशय आला. त्यांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फूटेज तपासण्यास सुरुवात केली. आणि 19 डिसेंबर रोजी त्यांनी एका चोराला चोरी करताना पकडले. प्राण्यांचे खाणे प्राणीसंग्रहालयातून बाहेर नेत संजय कुमार नामक एका व्यक्तीने उंदरांचे हे खाणे एका छोट्या टेम्पोत भरल्याचे सीसीटीव्हीमध्ये दिसले. मालकाने या गाडीचा पाठलाग केला असता, संजय कुमार याने एका पेट्रोल पंपावर तो टेम्पो थांबवला आणि त्यातील खाणे आपल्या गाडीत काढून घेतले. पोलिसांनी सुनील शर्मा आणि संजय कुमार यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा तपास करण्यास सुरुवात केली आहे.
पिल्लूखेडा पोलीस ठाण्याचे अधिकारी दिवाण सिंह म्हणाले की, गावातील एका व्यक्तीने या प्रकरणी तक्रात दाखल केली होती. त्यांच्या प्राणीघरातून 3500 चिचुंद्री, 150 उंदरी आणि प्राण्यांचे खाणे गायब झाल्याची ही तक्रार होती. या प्रकरणातील आरोपी सुनील शर्मा हा गेले 4 वर्ष या प्राणीघरात काम करतो. सीसीटीव्हीत काय ते समोर आले आणि पोलिसांनी तात्काळ कारवाई केली आहे. दुसरा आरोपी संजय कुमार हा फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या अनोख्या चोरीची सध्या जिल्हाभरात चर्चा आहे.
हेही वाचा – Koneru Humpy : डी गुकेशनंतर चेसमध्ये कोनेरू हम्पीने रचला इतिहास; केली ही कामगिरी
Edited by : Ashwini A. Bhatavdekar