घरदेश-विदेशजेएनयूमध्ये आता विनापरवानगी कार्यक्रम आयोजित करण्यास मनाई, अन्यथा कारवाईचा बडगा

जेएनयूमध्ये आता विनापरवानगी कार्यक्रम आयोजित करण्यास मनाई, अन्यथा कारवाईचा बडगा

Subscribe

नवी दिल्ली : जवाहरलाल नेहरू विद्यापीठात आता विनापरवानगी होणाऱ्या कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP) आणि डाव्या आघाडीच्या विद्यार्थी संघटनांमध्ये अलीकडेच झालेल्या संघर्षानंतर विद्यापीठ प्रशासनाने सोमवारी याबाबतची अधिसूचना जारी केली. कॅम्पसमध्ये कोणताही कार्यक्रम आयोजित करण्यापूर्वी विद्यार्थ्यांना आता परवानगी घ्यावी लागणार आहे.

जवाहरलाल नेहरु विद्यापीठात रविवारी आयोजित शिवजयंतीच्या कार्यक्रमात शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची विटंबना केल्याची घटना घडली. यावेळी आखिल भारतीय विद्यार्थी परिषद व डाव्यांची विद्यार्थी संघटना (जेएनयूएसयू) यांच्यामध्ये हाणामारीही झाली. अखेर पोलिसांनी हस्तक्षेप करत दोन्ही विद्यार्थी संघटनांना शांत राहण्याचे आवाहन केले. जेएनयूएसयूच्या कार्यालयात शिवाजी महाराजांची प्रतिमा लावण्यासाठी जेएनयूएसयूच्या कार्यकारिणीची परवानगी बंधनकारक आहे. मात्र अभाविपने ही परवानगी न घेताच शिवाजी महाराजांची प्रतिमा जेएनयूएसयू कार्यालयात लावली. त्यावरून वाद झाला, असेही या वादाचे कारण सांगितले जात आहे.

- Advertisement -

मुंबईतील पवई आयआयटी संकुलात दर्शन सोलंकी या विद्यार्थ्याने वसतिगृहाच्या सातव्या मजल्यावरून उडी मारत आत्महत्या केली. १८ वर्षीय सोलंकीच्या आत्महत्येचे पडसाद सर्वत्र उमटले. सोलंकीच्या आत्महत्येच्या निषेधार्थ जेएनयूमध्ये कॅंडल मार्चचे आयोजन करण्यात आले होते. सोलंकी मागास जातीचा असल्याने त्याला त्रास देण्यात आला. त्यामुळे त्याने आत्महत्या केली, असा आरोप करत यातील दोषींवर कारवाई करण्याची मागणी कॅंडल मार्चमध्ये करण्यात आली. त्यावेळी एबीव्हीपी सदस्य विद्यार्थ्यांनी कॅंडल मार्चमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना मारहाण केली. एबीव्हीपी जाती द्वेषाचे समर्थन करत आहे. त्यातूनच हा वाद झाल्याचेही बोलले जात आहे.

या पार्श्वभूमीवर आता विद्यापीठ प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. विद्यार्थ्यांना सर्व वसतिगृहांमध्ये, स्टॅडंट्स अॅक्टिव्हिटी सेंटर, विद्यार्थी संघटना कार्यालय आणि मैदानांसह आंतर-हॉल-प्रशासकीय परिसरांमध्ये कोणताही कार्यक्रम करण्यासाठी डीनची औपचारिक परवानगी घेणे आवश्यक असेल. परवानगीशिवाय कोणताही कार्यक्रम आयोजित केल्यास विद्यापीठाच्या नियमांनुसार शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असे स्टुडंट वेल्फेअर डीन सुधीर प्रताप सिंग यांनी जारी केलेल्या अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -