अखेर गौरी लंकेश हत्या प्रकरणाच्या मास्टरमाईंडला अटक

gauri lankesh murderar rishikesh devdikar 1

दोन वर्षांपूर्वी म्हणजेच २०१७मध्ये लंकेश पत्रिका या वृत्तपत्राच्या संपादिका गौरी लंकेश यांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणातील मास्टरमाईंडला पकडण्यात अखेर पोलिसांना यश आलं आहे. त्याचं नाव ऋषिकेश देवडीकर असं असून तो मूळचा महाराष्ट्रातल्या औरंगाबादचा आहे. त्याला झारखंडच्या धनबाद जिल्ह्यातल्या कतरास भागातून अटक करण्यात आली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून पोलीस ऋषिकेशच्या मागावर होते. अखेर त्याला अटक करण्यात पोलिसांना यश आलं असून त्याला आता बंगळुरूमध्ये नेण्यात येणार आहे. तत्पूर्वी त्याला कोर्टात हजर करून त्याची कोठडी घेतली जाणार आहे. ऋषिकेश गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी असून तो झारखंडमध्ये अनेक महिन्यांपासून ओळख बदलून राहात असल्याची माहिती समोर आली आहे.

पोलिसांचं विशेष तपास पथक या प्रकरणाची चौकशी करत आहे. या पथकाला ऋषिकेश धनबादमध्ये असल्याबद्दल माहिती मिळाली होती. त्याच्या मागावर असलेल्या एसआयटीने लागलीच पावलं उचलंत धनबादच्या कतरासमध्ये छापा टाकला. या छाप्यामध्ये ऋषिकेश सापडला असून आता या हत्या प्रकरणातील अटक आरोपींची संख्या १८वर पोहोचली आहे.

नक्की काय घडलं होतं?

चळवळीतील समजले जाणारे लंकेश पत्रिका हे वृत्तपत्र गौरी लंकेश चालवत होत्या. या वृत्तपत्रात मांडल्या जाणाऱ्या आक्रमक भूमिकांमुळेच गौरी लंकेश यांची हत्या करण्यात आल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. कट्टर विचारसरणीतून ही हत्या झाल्याचं देखील बोललं जात आहे. गौरी लंकेश या वृत्तपत्राच्या संपादिका होत्या. ५ सप्टेंबर २०१७ रोजी बंगळुरूमधल्या त्यांच्या घरात घुसून त्यांच्यावर जवळून गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. या प्रकरणामुळे देशभरात खळबळ उडाली होती.


हेही वाचा – भाजपच्या अडचणीत वाढ? जस्टिस लोया प्रकरणाची फाईल ओपन होणार?