पाकिस्तानमधील बॉम्बस्फोटात पत्रकाराचा मृत्यू, बलूचिस्तान लिबरेशन आर्मीने स्वीकारली जबाबदारी

journalist killed in bomb attack in Pakistan
पाकिस्तानमधील बॉम्बस्फोटात पत्रकाराचा मृत्यू, बलूचिस्तान लिबरेशन आर्मीने स्वीकारली जबाबदारी

पाकिस्तानच्या बलुचीस्तान प्रांतात झालेल्या बॉम्ब स्फोटात ३५ वर्षीय पाकिस्तानी पत्रकाराचा मृत्यू झाला आहे. या स्फोटाची जबाबदारी बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने स्वीकारली आहे. डॉन न्यूज एजन्सीला ईदगाह स्टेशन हाऊसचे अधिकारी नदीम हैदर यांच्या हवाल्याने सांगितले की, या स्फोटात ठार झालेला पत्रकार शाहिद जेहरी मेट्रो १ न्यूजसाठी काम करत होता. हब शहरातून ते रविवारी गाडीने कुठे तरी निघत असतानाच हा स्फोट झाला.

तपास यंत्रणांच्या हाती आलेल्या सीसीटीव्ह फुटेजमध्ये स्पष्ट दिसतेय की, जेहरी यांच्या वाहनाने जसा यू टर्न घेतला तसाच भीषण स्फोट झाला. देशी ग्रेनेडच्या माध्यमातून झालेल्या स्फोटात पत्रकार जेहरी यांच्यासह अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. या स्फोटात जखमी झालेल्या नागरिकांना उपचारांसाठी कराची स्थित रुग्णालयात भरती करण्यात आले, मात्र उपचारांआधीच पत्रकार जेहरी यांनी मृत घोषित केले. डॉनच्या माहितीनुसार, पाकिस्तान समाचार पत्र संपादक परिषदने मीडिया फ्रीडम रिपोर्ट २०२० मध्ये म्हटलेय की, या वर्षभरात पाकिस्तानमध्ये जवळपास १० पत्रकारांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. तर अनेक पत्रकारांना जीवे मारण्याचा आणि अपहरणाच्या धमक्या दिल्या जात आहेत.

बलूचिस्तानमधील अलगाववादी समूह बलूच लिबरेशन आर्मीने सोशल मीडियाच्या माध्यामातून स्फोटाची जबाबदारी स्वीकारत सांगितले की, पत्रकार शाहिद जेहरी हेरगिरी करत होता. त्यामुळे त्याची हत्या केली. पाकिस्तान फेडरल युनियन ऑफ जर्नलिस्ट संघटनेने (PFUJ) शाहिद जेहरी यांच्या हत्येचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे. पीएफयूजेचे अध्यक्ष शहजादा जुल्फिकार आणि महासचिव नासिर जैदी यांनी सांगितले की, पाकिस्तानमध्ये पत्रकारांना टार्गेट करत त्यांची क्रूर हत्या केल्याचा आम्ही निषेध करतो, मात्र दोषींना अटक करत त्यांच्याविरोधात तात्काळ कारवाई करा अशी आमची मागणी आहे.


Video : काश्मीर, बाबरी, जिहाद… अल-कायदाच्या नव्या व्हिडिओतून भारताविरोधात चिथावणीखोर वक्तव्ये