Eco friendly bappa Competition
घर देश-विदेश देशाच्या बाबतीत चुकीच्या बातम्या लिहिणारे पत्रकार बहुसंख्य भारतीयच, अनुराग ठाकूर यांची टीका

देशाच्या बाबतीत चुकीच्या बातम्या लिहिणारे पत्रकार बहुसंख्य भारतीयच, अनुराग ठाकूर यांची टीका

Subscribe

नवी दिल्ली : परदेशी प्रसार माध्यम कंपन्या, विशेषत: ज्यांचा भारताबाबत द्वेष बाळगण्याचा इतिहास आहे त्या, भारताबाबतीत चुकीच्या बातम्या देतात. या बातम्या देणारे पत्रकार बहुसंख्य भारतीयच किंवा भारतीय वंशाचे असतात. त्यांची व्यक्तिगत माहिती जाणून घेतली तर आपल्याला समजेल की हे पत्रकार भारत आणि भारतीय, खास करून हिंदू, यांच्या बाबतीत आपल्या मनात द्वेषभावना बाळगतात, असे परखड मत केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री अनुराग ठाकूर यांनी व्यक्त केले.

भारतीय विचारसरणी आणि भारतीय समाजाच्या विरोधातील एका रणनीतीनुसार काही परदेशी प्रसार माध्यमे आणि काही देशातील न्यूज पोर्टल कार्य करत आहेत, हे आपल्याला मान्य करावे लागेल, असे सांगून केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी, कोणतेही परदेशी प्रसार माध्यम भारतीय न्यायालयापेक्षा मोठे नाही आणि घटनात्मक संस्थांच्या कार्यप्रणालीत हस्तक्षेप सहन केला जाणार नाही, असा स्पष्ट इशारा दिला.

- Advertisement -

भारत आज पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली अतिशय वेगाने पुढे जात आहे. 76 टक्के जागतिक मान्यतेच्या मानांकनासह पंतप्रधान मोदी यांना जगातील सर्वात लोकप्रिय नेते म्हणून मान्यता मिळाली आहे. भारताची ही पुढे पडणारी पावले काही परदेशी शक्तींना आवडलेली नाहीत. काही परदेशी प्रसारमाध्यमे कुटील हेतूने अपप्रचार करत, भारताची बदनामी करण्यात सहभागी आहेत. मात्र, परदेशी प्रसारमाध्यमांना भारताची वाटचाल आणि स्थिती कशी असावी हे ठरवण्याचा अधिकार नाही, असेही अनुराग ठाकूर यांनी सुनावले.

- Advertisement -

आज भारतामध्ये ना ज्ञानाची कमतरता आहे, ना डिजिटल मागासलेपण आहे, ना तंत्रज्ञानाचे मागासलेपण आहे. आज भारताकडे ते सर्व काही आहे, जे एका विकसित देशाकडे असते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आज भारतात एक राष्ट्रवादी विचारसरणी असलेले, समाजाला जोडणारे सरकार आहे, जे भारताला विश्वगुरु बनवण्यासाठी सक्षम आहे, असेही ते म्हणाले. भारतात अशी अनेक परदेशी प्रसारमाध्यमे आहेत, ज्या भारतविरोधी विचार घेऊन काम करत आहेत. त्यांनी अशा प्रकारे आपले एक नेटवर्क तयार करून ठेवले आहे की, आपल्या चुकीच्या कामांबाबत सरकारने चौकशी केल्यावर देखील आरडाओरडा करतात आणि भारतात प्रसारमाध्यमांचे स्वातंत्र्य धोक्यात आहे, असे सर्वत्र सांगत सुटतात, अशी टीका त्यांनी केली.

कुठलाही वैज्ञानिक आधार नसलेले काही कपोलकल्पित अहवाल हेतुपुरस्सर जाहीर केले जातात, याकडे लक्ष वेधून अनुराग ठाकूर यांनी, देशातील प्रसार माध्यमांनी कोणत्याही परदेशी प्रसार माध्यमांना आपल्या देशाची दिशा आणि स्थिती ठरवण्याची संधी देऊ नये. तेवढी ताकद भारतीय माध्यमांमध्ये आहे, असे सांगितले. परदेशी प्रसार माध्यमे ज्याप्रमाणे निवडक भारतीय बातम्यांना चुकीचा रंग चढवत खळबळजनक बनवतात, त्याप्रमाणे आपली प्रसार माध्यमे परदेशातील बातम्यांना थोडे तरी स्थान देतात का? अमेरिकेत सध्या बंदुकीचा दहशतवाद खूपच फोफावला आहे. पण याची चर्चा भारतात किंवा जागतिक स्तरावर झालेली तुम्ही पाहिले आहे का? असा सवाल अनुराग ठाकूर यांनी केला. परदेशी प्रसार माध्यमे वसाहतवादी विचारसरणीचे पाईक असल्याचेही त्यांनी सांगितले.

- Advertisment -