राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी भाजपकडून मोर्चेबांधणीला सुरुवात, जेपी नड्डा आणि राजनाथ सिंह यांच्यावर मोठी जबाबदारी

भारतीय निवडणूक आयोगाने राष्ट्रपती निवडणुकीची (Voting for Presidential elections) ताहीर जाहीर केली आहे. देशाला लवकरच नवे राष्ट्रपती (President Of India) मिळणार आहेत. १८ जुलैला यासाठी मतदान होणार असून २१ जुलै रोजी निकाल लागणार आहे. यासंदर्भातील सर्व माहिती मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार (Rajiv Kumar) यांनी दिली आहे. परंतु आता आगामी महिन्यात होणाऱ्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी भाजपकडून मोर्चेबांधणी सुरू आहे. भाजपने पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यावर जबाबदारी सोपवली आहे.

भाजपने पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यावर आज राष्ट्रपती पदाच्या निवडणूकबाबत मोठी जबाबदारी दिली आहे. राष्ट्रपती पदाचा उमेदवार निवडण्यासाठी भाजप एनडीएमधील मित्रपक्षांसोबत चर्चा करणार असल्याचं सांगितलं जात आहे. एनडीएचे मित्रपक्ष, अपक्ष आणि युपीएच्या मित्रपक्षांसोबत चर्चा करण्याची जबाबदारी जेपी नड्डा आणि राजनाथ सिंह यांच्यावर सोपवली आहे.

देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ २४ जुलै २०२२ रोजी संपत आहे. त्याआधीच देशाच्या १५ व्या राष्ट्रपतींची निवड होणार आहे. १७ जुलै २०१७ रोजी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुका झाल्या. मात्र, आता राष्ट्रपतींचा पाच वर्षांचा कार्यकाळ संपत असून जनतेने निवडून दिलेले प्रतिनिधी आणि वरच्या सभागृहातील लोकप्रतिनिधी मतदान करणार आहेत.

मागच्या निवडणुकीत ५० टक्के मतदान एनडीएचे उमेदवार रामनाथ कोविंद यांच्या बाजूने झाले होते. तसंच, काही प्रादेशिक पक्षांनीदेखील कोविंद यांनाच पाठिंबा दिला होता. यंदाही भाजप नेतृत्त्वातील एनडीएकडे विरोधकांपेक्षा जास्त संख्या आहे. त्यामुळे यंदाही एनडीएचाच उमेदवार यशस्वी होण्याची शक्यता आहे.


हेही वाचा : राष्ट्रपती पदासाठी निवडणूक जाहीर, १८ जुलैला होणार मतदान