(Justin Trudeau) नवी दिल्ली : कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांनी राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपाची युवा शाखा असलेल्या भारतीय जनता युवा मोर्चाने (भाजयुमो) ‘X’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच ‘बिग बॉस’ असल्याचे म्हटले आहे. सोबतच, इतर देशांच्या नेतृत्वात कसे बदल झाले, हे इन्फोग्राफिक्सच्या माध्यमातून दाखविले आहे. (BJP says Modi is ‘Big Boss’)
पंतप्रधान मोदी हे 2014पासूनचे “बिग बॉस एनर्जी” असल्याचे भाजयुमोने म्हटले आहे. या इन्फोग्राफिकच्या माध्यमातून अमेरिका, युनायटेड किंगडम, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि जपान यासारख्या देशांमध्ये वारंवार नेतृत्व बदल झाल्याचे भाजयुमोने दर्शविले आहे. या देशांतील नेत्यांच्या बदलासह तिथे झालेले राजकीय बदल आणि पंतप्रधान मोदी यांचे स्थिर नेतृत्व याची तुलना भाजयुमोने केली आहे.
Baki sab gone, but PM Modi’s game is still on! pic.twitter.com/7EduQKnPvv
— BJYM (@BJYM) January 7, 2025
अनेक देशांमध्ये 2014पासून नेतृत्वात बदल झाले आहेत. बराक ओबामा, डेव्हिड कॅमेरून, टोनी ॲबॉट आणि शिंजो आबे यांनाही आपल्या पदांचा राजीनामा द्यावा लागला आणि त्यांच्या जागी नवे नेते आले. या काळात ब्रिटनमध्ये पाच पंतप्रधान बदलले आहेत. सध्या कीर स्टार्मर पंतप्रधान आहेत. त्याचप्रमाणे ऑस्ट्रेलियातही तीन पंतप्रधान बदलले आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी हेच अंतत: ‘बिग बॉस’ ठरले असल्याचे भाजयुमोने ग्राफिक्सद्वारे दाखविण्याचा प्रयत्न केला आहे.
ठाकरे गटाचा टोला
जस्टीन ट्रुडो यांनी पायउतार होण्याच्या घेतलेल्या निर्णयावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने सामना दैनिकातील अग्रलेखाद्वारे भाजपावर शरसंधान केले आहेगेल्या काही महिन्यांपासून जगातील राजकारणात ‘बदलाचे वारे’ फिरत आहेत. गेल्या वर्षी युरोपियन महासंघ, ब्रिटन, फ्रान्स, इराण येथील सार्वत्रिक निवडणुकांत याच बदलाच्या वाऱ्यांनी उलथापालथी केल्या. ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक, न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा ऑर्डर्न यांनी राजीनामे दिले. फ्रान्सचे पंतप्रधान मिशेल बर्निए यांना पद स्वीकारल्यानंतर अवघ्या तीन महिन्यांत पदत्याग करण्याची वेळ आली. राजकीय उलथापालथीमुळे बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना यांना पदासह देशही सोडावा लागला. त्यात आता कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्या राजीनाम्याची भर पडली आहे. ट्रुडो यांना तेथील देशांतर्गत आणि पक्षांतर्गत दबावामुळे राजीनामा देणे भाग पडले असले तरी मोदी सरकारशी पंगा घेण्याची किंमत त्यांना मोजावी लागली, अशी शेखी मोदीभक्तांनी उद्या मिरवलीच तर त्यात नवल काय, असा टोला ठाकरे गटाने लगावला आहे. (Justin Trudeau: BJP says Modi is ‘Big Boss’)
हेही वाचा – Sharad Pawar : शरद पवारांच्या 7 खासदारांना तटकरेंकडून अजितदादांकडे येण्याची ऑफर? सुळेंचा पटलेंना फोन अन्…