घरताज्या घडामोडीज्योतिरादित्य शिंदे यांचा अखेर भाजप प्रवेश; राहुल गांधी गोटाला धक्का!

ज्योतिरादित्य शिंदे यांचा अखेर भाजप प्रवेश; राहुल गांधी गोटाला धक्का!

Subscribe

मध्य प्रदेशमधील काँग्रेसचे महत्त्वाचे नेते आणि राहुल गांधींच्या गोटातले मानले जाणारे ज्योतिरादित्य शिंदे यांनी यांनी अखेर भाजपमध्ये प्रवेश केला आहे. काँग्रेससाठी हा मोठा फटका मानला जात आहे.

मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसला मोठा झटका बसला असून पक्षाचे राज्यातले महत्त्वाचे नेते आणि माजी पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांच्या गोटातले समजले जाणारे ज्योतिरादित्य शिंदे यांनी अखेर भाजपचा झेंडा हाती धरला आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या उपस्थितीत त्यांचा आज भाजपमध्ये अधिकृत प्रवेश झाला. यावेळी ‘पूर्वीचा काँग्रेस पक्ष आज राहिला नाही’, अशी बोचरी टीका ज्योतिरादित्य शिंदे यांनी केली. त्याशिवाय, ‘भाजपमध्ये प्रवेश करायला मिळणं हे माझं नशीब समजतो’, असं देखील शिंदे यावेळी म्हणाले. शिंदे यांच्या समर्थनासाठी काँग्रेसच्या २२ आमदारांनी देखील सरकारमधून बाहेर पडत राजीनामे दिले आहेत. त्यामुळे आता मध्य प्रदेशमधलं कमलनाथ सरकार अडचणीत आलं असून आकडेमोडीच्या आधारावर भाजप मध्य प्रदेशात सरकार स्थापन करण्याची तयारी करत आहे.

काय म्हणाले ज्योतिरादित्य?

राहुल गांधी यांच्या युवा गोटातले समजले जाणारे ज्योतिरादित्य शिंदे यांनी भाजपमध्ये प्रवेश करताना काँग्रेसवर बोचरी टीका केली. ‘वास्तवाचं भान न ठेवता त्याला नकार देत राहाणं, सुस्तावलेलं वातावरण आणि नव्या नेतृत्वाला योग्य तो सन्मान न मिळणं या बाबी काँग्रेसच्या या परिस्थितीला कारणीभूत आहेत. राज्यात सत्तेत आल्यापासून गेल्या १८ महिन्यांत सरकारने दिलेली आश्वासनं पूर्ण केली नाही. त्यात शेतकऱ्यांना दिलेलं कर्जमाफीचं आश्वासन, आर्थिक मदतीचं आश्वासन पूर्ण झालेलं नाही. त्या दृष्टीने प्रयत्न होत नाहीत’, असं शिंदे यावेळी म्हणाले.

- Advertisement -

महाराष्ट्रात देखील बंडखोरी?

ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासोबत काँग्रेसच्या २२ आमदारांनी राजीनामा दिल्यामुळे आता काँग्रेस सरकार कोणत्याही क्षणी पडू शकतं अशी परिस्थिती मध्य प्रदेशात निर्माण झाली आहे. त्यात भाजपकडून मोठा पक्ष म्हणून सत्तास्थापनेचा दावा केला जाण्याची शक्यता आहे. शिवराजसिंह चौहान पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकतात असं देखील आता बोललं जाऊ लागलं आहे. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेससाठी मध्य प्रदेशसारखं मोठं राज्य हातून जाणं हा मोठा फटका मानला जात आहे. मध्य प्रदेशप्रमाणेच महाराष्ट्रातील महाविकासआघाडी सरकारमध्ये देखील बंडखोरी होऊ शकते, असे दावे भाजपच्या नेत्यांकडून आणि मित्रपक्षांकडून केले जात आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -