Kamal Nath : कमलनाथ यांनी काँग्रेस विधिमंडळ पक्षनेतेपदाचा दिला राजीनामा

kamalnath

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ यांनी गुरुवारी मध्य प्रदेश विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला. त्यांच्याकडे पक्षाची दोन पद होती, त्यापैकी पक्षाच्या ‘एक व्यक्ती एक पद’ या तत्त्वानुसार त्यांनी एक पद सोडले आहे. मात्र, ते मध्य प्रदेश काँग्रेसचे प्रमुख म्हणून आपली जबाबदारी पार पाडतील. २०२३ मध्ये मध्य प्रदेशात विधानसभा निवडणुका होणार आहेत. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी गुरुवारी कमलनाथ यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, “काँग्रेस अध्यक्ष (सोनिया गांधी) यांनी तुमचा काँग्रेस विधिमंडळ पक्ष (CLP) मध्य प्रदेशच्या नेतेपदाचा राजीनामा स्वीकारला आहे.”

यासोबतच सोनिया गांधी यांनी गोविंद सिंग यांची काँग्रेस विधीमंडळ पक्षाचे नवे नेते म्हणून नियुक्ती केल्याचेही पत्रात म्हटले आहे. गोविंद सिंग हे भिंड जिल्ह्यातील लहारमधून विधानसभेचे सदस्य आहेत. गोविंद सिंग हे माजी मंत्री आणि सात वेळा आमदार राहिलेले आहेत.

मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ हे २०१८ च्या विधानसभा निवडणुकीत विजयी झाल्यापासून काँग्रेसचे राज्य युनिटचे प्रमुख आहेत. वृत्तसंस्था पीटीआयने पक्षाच्या सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की, कमलनाथ यांनी ‘एक व्यक्ती एक पद’ या पक्षाच्या तत्त्वानुसार विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा देण्यासाठी सांगितले आहे.