नवी दिल्ली – संसद परिसरात काँग्रेस आणि भाजमध्ये उडालेल्या धुमश्चक्रीनंतर बॉलिवूड अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना रणौत यांनीही लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर गंभीर आरोप केले. राहुल गांधी यांनी गुरुवारी भाजप खासदार प्रताप चंद्र सारंगी यांना धक्का दिल्याचा आरोप होत आहे. तर राहुल गांधी यांनी सांगितले की, आम्हाला संसदेत येण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला. तर या वादात आता कंगना यांनीही उडी घेतली आहे.
खासदार कंगना रणौत यांनी राहुल गांधींवर आरोप केला की, ही वाईट घटना आहे की, आमच्या खासदारांचे डोके फुटले, रक्त आले, त्यांना टाके पडले आहेत. काँग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संविधानाबद्दल कायम खोटं सांगितलं आहे. मात्र प्रत्येकवेळी त्यांचं खोटं उघडं पडलं आहे. आता त्यांची हिंसा संसदेपर्यंत पोहचली आहे.
कंगना रणौत यांनी त्यांच्या इंस्टाग्रामवरून एक स्टोरी पोस्ट केली आहे, ज्यामध्ये त्यांनी राहुल गांधींची तुलना एका जिम ट्रेनरसोबत केली. “भाजप खासदारांवर राहुल गांधींनी आज संसदेत हल्ला केला, ही व्यक्ती संसदेत जिम ट्रेनरप्रमाणे बायसेप्स दाखवत येते आणि आता लोकांना धक्काबुक्की आणि ठोसे द्यायला सुरुवात केली. ” असेही कंगना रणौत यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
महिला खासदाराचे राहुल गांधींवर गंभीर आरोप
तर दुसरीकडे, खासदार फैनोल कोन्याक यांनी राहुल गांधीवर गंभीर आरोप केला आहे. राहुल गांधी हे मकर द्वारातून प्रवेश करत असताना अचानक माझ्यासमोर येऊन उभे राहिले. इतर खासदारांसह राहुल गांधी यांना सुरक्षारक्षकांनी मार्ग करुन दिला होता. तरीही ते माझ्यासमोर येऊन उभे राहिले. त्यांनी माझ्यासोबत आवाज वाढवला. एक महिला सदस्य समोर असताना ते अशाप्रकारे वागत होते की त्यामुळे मला असहज वाटले. असेही त्या म्हणाल्या.
Edited by – Unmesh Khandale