घरदेश-विदेशकर्नाटकात त्रिशंकू स्थिती निर्माण झाल्यास तिसऱ्या क्रमांकावरील जेडी (एस) किंगमेकरच्या भूमिकेत

कर्नाटकात त्रिशंकू स्थिती निर्माण झाल्यास तिसऱ्या क्रमांकावरील जेडी (एस) किंगमेकरच्या भूमिकेत

Subscribe

कर्नाटक विधानसभेसाठी शनिवारी मतमोजणी होणार आहे. एक्झिट पोलनुसार राज्यात कोणालाही पूर्ण बहुमत मिळताना दिसत नाही. सर्वात कमी जागा जिंकून जेडी (एस) किंगमेकरच्या भूमिकेत राहाण्याची शक्यता आहे. याआधी दोनवेळा त्यांना मुख्यमंत्रीपद मिळाले आहे. यावेळी ते काँग्रेससोबत जाणार की भाजपसोबत हे पाहावे लागेल.

Karnataka Assembly Election : कर्नाटक विधानसभेसाठी शनिवारी मतमोजणी होणार आहे. एक्झिट पोलनुसार राज्यात कोणालाही पूर्ण बहुमत मिळताना दिसत नाही. सर्वात कमी जागा जिंकून जेडी (एस) किंगमेकरच्या भूमिकेत राहाण्याची शक्यता आहे. याआधी दोनवेळा त्यांना मुख्यमंत्रीपद मिळाले आहे. यावेळी ते काँग्रेससोबत जाणार की भाजपसोबत हे पाहावे लागेल.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल उद्या (१३ मे) सकाळपासून जाहीर होण्यास सुरुवात होणार आहे. राज्यात पुन्हा एकदा जनता दल (सेक्यूलर) (JDS) किंगमेकरच्या भूमिकेत राहण्याची शक्यता आहे. आतापर्यंत आलेल्या सर्व एक्झिट पोलचा एकत्रित विचार केल्यानंतर १० पैकी ५ पोलने त्रिशंकू विधानसभेची भविष्यवाणी केली आहे. त्याचाच अर्थ पुन्हा एकदा जेडी (एस) च्या आधाराशिवाय कोणीही सरकार बनवू शकत नाही.

- Advertisement -

सर्व एक्झिट पोलच्या एकत्रित निरीक्षणानुसार काँग्रेसला १०८, भाजप ९१ आणि जेडी (एस)ला २२ जागा तर इतरांच्या खात्यात ३ जागा जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कर्नाटक विधानसभेत बहुमतासाठी ११३ आमदारांची गरज राहाणार आहे. ते कोण जमवू शकतं हे १३ मे रोजीच कळेल.

तिसऱ्या क्रमांकावर जेडी (एस) राहाण्याची शक्यता आहे. एच. डी. देवेगौडा (H D Deve Gowda) यांच्या या पक्षाने याआधी तीनवेळा सरकार स्थापन केले आहे. त्रिशंकू विधानसभेचा फायदा घेत दोनवेळा जेडी (एस)चा मुख्यमंत्री झाला आहे.

- Advertisement -

एच.डी.देवेगौडा यांच्या राजकीय कारकीर्दीला १९६२ मध्ये सुरुवात झाली. ते पहिल्यांदा अपक्ष म्हणून निवडून आले. त्यानंतर त्यांचा राजकीय प्रवास काँग्रेस (ओ), जनता पार्टी, जनता पार्टी (जेपी) असा होत जनता दलापर्यंत आला. आणीबाणीच्या काळात त्यांना तुरुंगवासही झाला.
देवेगौडा हे १९९४ मध्ये कर्नाटकात पहिल्यांदा जनता दलाचे सरकार स्थापन करण्यात यशस्वी झाले. १९९६ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला फक्त १४० जागा मिळाल्या. तेव्हा जनता दलाचे ४६ खासदार निवडून आले. जनता दल, समाजवादी पक्ष, द्रविड मुन्नत्र कळघम (डीएमके) अशा १३ राजकीय पक्षांनी एकत्र येत एक आघाडी स्थापन केली, यात जनता दलाचे एच.डी.देवेगौडा यांची पंतप्रधानपदी नियुक्ती करण्यात आली.

याच जनता दलाची नंतर शकले उडाली आणि १९९७ मध्ये त्याचे वेगवेगळ्या छोट्या पक्षांमध्ये विभाजन झाले. बिहारमध्ये सत्तेत असलेले दोन्ही जनता दल, नितीशकुमारांचे जनता दल युनायटेड (Janata Dal (United) आणि लालू प्रसाद यादव यांचे राष्ट्रीय जनता दल (Rashtriya Janata Dal) हे याच मुळ जनता दलातून फुटून तयार झाले आहेत. दक्षिणेत १९९९ मध्ये माजी पंतप्रधान देवेगौडांनी जनता दल (सेक्यूलर) पक्षाची स्थापना केली. त्यांच्या पक्षाचा सर्वाधिक दबदबा दक्षिण कर्नाटकात आहे.

दोन दशकांत जेडी(एस)ला २०%च्या आसपास मते
१९९९ – १० जागा – १३.५३% मतांची टक्केवारी
२००४ – ५८ जागा – १८.९६% मतांची टक्केवारी
२००८ – ४० जागा – २०.७७% मतांची टक्केवारी
२०१३ – २८ जागा – २०.९०% मतांची टक्केवारी
२०१८ – ३७ जागा – १८.३६% मतांची टक्केवारी

२००४ मध्ये जेडी(एस) किंगमेकर
१९९९ मध्ये जेडी (एस)ने सर्वप्रथम विधानसभेची निवडणूक लढवली. यामध्ये पक्षाला १० जागा मिळाल्या. त्यानंतर पक्षाचा कर्नाटकमध्ये दबदबा वाढला आणि २००४ च्या निवडणुकीत आमदारांची संख्या ५८ वर पोहोचली. त्यावेळी भाजपला ७९ तर काँग्रेसला ६५ जागा मिळाल्या होत्या. काँग्रेस आणि जेडी (एस) यांनी एकत्र येत सरकार स्थापन केले. अशा प्रकारे देवेगौडांचा पक्ष कर्नाटकात प्रथम किंगमेकरच्या भूमिकेत आला.
दोन वर्षानंतर देवेगौडांचे चिरंजीव एच.डी.कुमारस्वामी (H. D. Kumaraswamy) यांनी काँग्रेससोबतचे नाते तोडले आणि भाजपसोबत हात मिळवणी केली. भाजपने कुमारस्वामी यांना मुख्यमंत्री केले. उर्वरित तीन वर्षांच्या काळात जेडी (एस) आणि भाजप यांच्या मुख्यमंत्रीपद वाटून घेण्याचे ठरले होते. मात्र नंतर कुमारस्वामी यांनी शब्द फिरवल्याचा आरोप भाजपने केला. त्यामुळे २००८ मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजप सत्तेवर आली.

सिद्धरमय्यांची जेडी (एस)ला सोडचिठ्ठी आणि लिंगायतांची नाराजी
२००३ ते २००८ दरम्यान जेडी (एस) मध्ये दोन मोठ्या घटना घडल्या. २००४ मध्ये सिद्धारमय्या जेडी (एस)चे महत्त्वाचे नेते होते. त्यांना मुख्यमंत्रीपदाची आशा होती. मात्र उपमुख्यमंत्रीपदावर त्यांची बोळवण करण्यात आली. जेडी (एस)मध्ये एचडी कुमारस्वामी यांचे वाढत चाललेले प्रस्थ पाहाता आपल्याला या पक्षात अधिक संधी नाही हे सिद्धारमय्या यांच्या लक्षात येऊ लागले. पुढच्या दोन वर्षांत त्यांनी दलित, मागासवर्गीय आणि अल्पसंख्याक समुदायामध्ये आपले वर्चस्व निर्माण करायला सुरुवात केली. सिद्धारमय्या यांचे पक्षा वेगळे नेतृत्व निर्माण होऊ लागले, हे पाहून देवेगौडा यांनी त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला. २०१३ मध्ये हेच सिद्धारमय्या (Siddaramaiah) काँग्रेसकाळात मुख्यमंत्री झाले.

दुसरी महत्त्वाची घटना २००६मधील आहे. जेडी (एस) आणि भाजप यांच्या युतीमध्ये २० -२० महिन्यांच्या मुख्यमंत्रीपदाचा फॉर्म्यूला ठरला होता. मात्र नंतर खातेवाटपावरुन दोन्ही पक्षांत मतभेद सुरु झाले आणि एचडी कुमारस्वामींनी भाजपचा पाठिंबा काढून घेतला. तेव्हा भाजपमध्ये लिंगायत समाजाचे बी. एस. येदियुरप्पा (B. S. Yediyurappa) हे आघाडीचे नेते होते. जेडी (एस)ने भाजपला मुख्यमंत्रीपद देण्याची वेळ आल्यानंतर पाठिंबा काढून घेतल्याने वोक्कालिगा समाजाच्या सत्ता काळात लिंगायतांना सत्तेतून सापत्न वागणूक दिली गेली असा समज पसरवण्यात भाजप यशस्वी झाली. तेव्हापासून लिंगायत जेडी (एस)वर नाराज झाले. वोक्लालिगा (Vokkaliga) आणि लिंगायत (Lingayatism) हे कर्नाटकातील प्रमुख समाज आहे. या घटनेनंतर लिंगायतांचा मोर्चा भाजपकडे वळाला.

जेडी (एस) हा दक्षिण कर्नाटकात पकड असलेला पक्ष आहे. हा भाग ओल्ड म्हैसूर नावाने ओळखला जातो. हासन, मांड्या, रामनगरस तुमकुरु, म्हैसूर आणि दक्षिण कर्नाटकातील जिल्हे यात येतात. जवळपास विधानसभेच्या ६४ जागा अशा आहेत जिथे वोक्कालिगा समाज मोठ्या प्रमाणात आहे. हाच समाज देवेगौडांचा जनाधार मानला जातो.

हासन हा देवेगौडा कुटुंबाचा गृहजिल्हा आहे. येथील होलेनर्सीपूर विधानसभा मतदारसंघातून त्यांनी राजकीय कारकीर्द सुरु केली आणि सहा वेळा आमदार झाले. वोक्कालिगांचे वर्चस्व असलेल्या ओल्ड म्हैसूरमध्ये जेडी (एस)चे वर्चस्व पाहायला मिळते. येथेच दुसऱ्या पक्षांना फटका बसतो आणि जेडी (एस) किंगमेकरच्या भूमिकेत येत आहे.

हेही वाचा : Karnataka Assembly Election : 65.70 टक्के मतदानाची नोंद, शनिवारी निकाल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -