घरदेश-विदेशएच. डी. कुमारस्वामी यांच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी

एच. डी. कुमारस्वामी यांच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी

Subscribe

कर्नाटकात कुमारस्वामी सरकारचा शपथविधी सोहळा बुधवारी पार पडला. यावेळी २५ आमदारांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली. गेमचेंजर म्हणून ओळख असलेले डी. के. शिवकुमार यांना देखील मंत्रिपदाची शपथ देण्यात आली. तर, जयमाला एकमेव महिला चेहरा मंत्रिमंडळात पाहायाला मिळणार आहे.

कर्नाटकात एच. डी. कुमारस्वामी यांच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा बुधवारी पार पडला. यावेळी २५ आमदारांना राज्यपाल वजुभाई वाला यांनी मंत्रिपदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली. यामध्ये काँग्रेसचे १४, जेडीएसचे ९ आणि बसपा आणि केपीजेपी यांच्या प्रत्येकी एका मंत्र्यांचा समावेश आहे. २३ मे २०१८ रोजी एच. डी. कुमारस्वामी यांनी मुख्यमंत्रीपदाची तर, जी. परमेश्वर यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. त्यानंतर जवळपास १५ दिवसांनी कुमारस्वामी यांच्या मंत्रिमंडळात २५ आमदारांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली आहे. कर्नाटकातल्या राज भवनात हा शपथविधी सोहळा पार पडला.

कुमारस्वामी यांच्या मंत्रिमंडळात गेमचेंजर म्हणून ओळख असलेल्या डी. के. शिवकुमार यांचा देखील सहभाग करण्यात आला आहे. तसेच माजी पंतप्रधान ए. डी. देवेगौडा यांचा मुलगा एच. डी. रेवण्णा यांना देखील मंत्रिपदाची शपथ देण्यात आली. कुमारस्वामी यांच्या मंत्रिमंडळात जयमाला यांच्या रूपाने एकमेव महिला चेहरा मंत्रिमंडळात पाहायाला मिळणार आहे. बुधवारी जरी २५ मंत्र्यांना शपथ देण्यात आली असली तरी, आगामी काळात मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची माहिती देखील मिळत आहे.

- Advertisement -

कर्नाटकातील राजकीय नाट्य

विधानसभेच्या निवडणुका पार पडल्यानंतर कर्नाटकात राजकीय नाट्य पाहायाला मिळाले. भाजपने केलेल्या सत्तास्थापनेच्या दाव्याला राज्यपालांना परवानगी दिली. राज्यपालांच्या या निर्णयाविरोधात काँग्रेस आणि जेडीएसने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली. मध्यरात्री या प्रकरणावर सुनावणी घेत ४८ तासांत बहुमत सिद्ध करण्याचे आदेश न्यायालयाने भाजपला दिले. पण, पाठिंब्यासाठी आवश्यक असलेला ११२चा जादुई आकडा गाठण्यात भाजपला यश आले नाही. अखेर, येडीयुरप्पा यांनी भावनिक भाषण करत मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला.

येडीयुरप्पा यांच्या राजीनाम्यानंतर राज्यपाल वजुभाई वाला यांनी काँग्रेस आणि जेडीएसला सत्तास्थापनेसाठी आमंत्रण दिले. २३ मे २०१८ रोजी बहुमत सिद्ध झाल्यानंतर जेडीएसच्या एच. डी. कुमारस्वामी यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ देण्यात आली तर, काँग्रेसच्या जी. परमेश्वर यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ देण्यात आली.

- Advertisement -

भाजपला जशास तसे उत्तर

कर्नाटकात भाजपने जरी सर्वाधिक जागा जिंकल्या असल्या तरी बहुमताचा जादुई आकडा गाठणं भाजपला शक्य झाले नाही. गोवा आणि मणिपूरप्रमाणे राजकीय पेच उभा राहू नये यासाठी काँग्रेसने जेडीएसला मुख्यमंत्रीपदाची ऑफर देत राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा केला. न्यायालयीन लढाईनंतर का होईना काँग्रेसने भाजपला जशास तसे उत्तर देत गोवा आणि मणिपूरमधला राजकीय हिशोब चुकता केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -