घरदेश-विदेश‘VIP ताफ्यापेक्षाही अॅम्ब्युलन्स महत्त्वाची’, उपमुख्यमंत्र्यांचा नवा आदर्श

‘VIP ताफ्यापेक्षाही अॅम्ब्युलन्स महत्त्वाची’, उपमुख्यमंत्र्यांचा नवा आदर्श

Subscribe

'कोणत्याही व्हीआयपी नेत्याच्या किंवा सिनेसृष्टीतील सेलिब्रिटिच्या कॉन्व्हॉयसाठी अॅम्ब्युलन्स थांबवू नका', असे स्पष्ट निर्देश कर्नाटकचे उपमुख्यमंत्री जी. परमेश्वर यांनी पोलिस दलाला दिले आहेत. त्यामुळे त्यांनी या कृतीतून एक नवीन आदर्शच घालून दिला आहे.

राजकीय नेतेमंडळी असोत किंवा मग सिनेसृष्टीतील सेलिब्रिटि..यांच्या गाड्याचा ताफा जर रस्त्यावरून जाणार असेल, तर त्यांच्यासाठी सामान्य माणसांना थांबवलं जातं. मग ट्रॅफिक जाम झालं तरी चालेल, पण त्यांच्या ताफ्याला आधी वाट करून दिली जाते. आणि यात कोणत्याही राजकीय नेत्यानं किंवा सिने सेलिब्रिटीने आक्षेप किंवा निषेध नोंदवल्याचं आजपर्यंत ऐकिवात आलेलं नाही. अनेकदा तर रुग्णांना नेणारी अॅम्ब्युलन्स सुद्धा या ताफ्यांसाठी थांबवली जाते. मात्र, याला अपवाद ठरले आहेत ते कर्नाटकचे उपमुख्यमंत्री जी. परमेश्वर! आपल्या कॉन्हॉयसाठी ट्रॅफिक पोलिसांनी अॅम्ब्युलन्स थांबवायची नाही, असे स्पष्ट निर्देशच त्यांनी पोलिसांना दिले आहेत. तसेच, कोणत्याही सेलिब्रिटीपेक्षाही एखाद्या व्यक्तीचा जीव जास्त महत्त्वाचा असतो, हेही त्यांनी सांगितलं आहे.

जी. परमेश्वर यांनी ७ जुलैला कर्नाटकच्या पोलिस महासंचालकांना दिलेल्या निर्देशांमध्ये त्यांनी हे आदेश दिले आहेत. नेतेमंडळी आणि सेलिब्रिटींच्या ताफ्यापेक्षाही अॅम्ब्युलन्सला अधिक प्राधान्य दिलं गेलं पाहिजे, असं त्यांनी या आदेशांमध्ये नमूद केलं आहे. यासंदर्भात त्यांनी एक ट्विटही केलं आहे.

- Advertisement -

‘जीव वाचवण्यापेक्षा काहीही महत्त्वाचं नाही’

‘मी अनेकदा पाहिलं आहे की माझ्या गाड्यांच्या ताफ्यासाठी अनेकदा अॅम्ब्युलन्स थांबवल्या जातात. पण आपातकालीन परिस्थितीमध्ये एखाद्या व्यक्तीचा जीव वाचवण्यापेक्षा अजून काहीही महत्त्वाचं असू शकत नाही. त्यामुळे आता कोणत्याही व्हीआयपी ताफ्यासाठी अॅम्ब्युलन्स थांबवली जाणार नाही’, अशा आशयाचं ट्विटदेखील त्यांनी केलं आहे.

‘सर्व नियमांकडे दुर्लक्ष करा’

‘अॅम्ब्युलन्सला वाट करून देताना तुम्हाला कोणतेही नियम वाकवावे लागले, तरी तसं करा. पण अॅम्ब्युलन्सचा प्रवास विनासायास होईल याची दक्षता घ्या’, असेही त्यांनी पोलिसांना सांगितल्याचे इंटरनॅशनल बिझनेस टाईम्सने दिलेल्या वृत्तामध्ये नमूद करण्यात आले आहे.

- Advertisement -

पोलिस दलाकडून सकारात्मक प्रतिसाद

दरम्यान, उपमुख्यमंत्री जी. परमेश्वर यांनी दिलेल्या आदेशांनंतर कर्नाटकच्या पोलिस दलाकडून त्याला सकारात्मक प्रतिसाद आला आहे. किंबहुना पोलिस दलाकडून आधीपासूनच या प्रकारची कार्यवाही केली जात असल्याचं एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितलं आहे. यासाठी २००७मध्ये अॅम्ब्युलन्ससाठी थेट राष्ट्रपतींचाच ताफा अडवणाऱ्या एका पोलिस अधिकाऱ्याचा दाखलाही पोलिसांकडून दिला गेला आहे. या पोलिस अधिकाऱ्यावर नंतर सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव केला गेला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -