घरदेश-विदेशKarnataka Election : काँग्रेस उमेदवार कुलकर्णी प्रचारापासून दूर, पत्नी आणि मुलगी मैदानात

Karnataka Election : काँग्रेस उमेदवार कुलकर्णी प्रचारापासून दूर, पत्नी आणि मुलगी मैदानात

Subscribe

धारवाड : कर्नाटक निवडणुकीची रणधुमाळी टिपेला पोहचली आहे. धारवाडची लढाई केवळ विधानसभा निवडणुकीपुरती मर्यादित नाही तर, ती आता न्यायाची लढाई बनली आहे. काँग्रेसचे उमेदवार विनय कुलकर्णी हे न्यायालयाच्या आदेशानुसार आपल्या मतदारसंघातील प्रत्यक्ष प्रचारापासून दूर आहेत. त्यामुळे त्यांची पत्नी आणि मुलगी तिथे प्रचार करत आहेत.

जिल्हा पंचायत सदस्य योगेश गौडा यांच्या हत्येतील आरोपी असलेले विनय कुलकर्णी सध्या जामिनावर आहेत. सर्वोच्च न्यायालयाने त्यांना धारवाड जिल्ह्यात प्रवेशबंदी केली आहे. आता निवडणुकीचा हवाला देऊन त्यांनी या बंदीतून दिलासा मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र, उच्च न्यायालयाने अलीकडेच त्यांची विनंती फेटाळून लावली. त्यामुळे आता त्यांची पत्नी आणि मुलगी घरोघरी जाऊन मतदारांशी संपर्क साधत आहेत. तर, विनय कुलकर्णी जिल्ह्याबाहेर तळ ठोकून बसले असून सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या कुटुंबासोबत प्रचार करत आहेत.

- Advertisement -

माजी खाण आणि भूविज्ञानमंत्री विनय कुलकर्णी यांनी धारवाडमधून दोनदा विजय मिळवला आहे. 2004मध्ये ते एकदा अपक्ष म्हणून तर 2013मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर विजयी झाले. ‘माझे पती जवळपास तीन वर्षांपासून मतदारसंघाबाहेर राहतात. त्यांच्यावर खुनाचा आरोप झाल्यानंतर आमच्या मित्रांनी आणि नातेवाईकांनी पाठ फिरवली. तेव्हा मी एकटीनेच प्रचार करण्याचा निर्णय घेतला,’ असे त्यांची पत्नी शिवलीला म्हणाली. कधीही जाहीर भाषण न केलेल्या किंवा कोणत्याही पक्षात कोणतेही पद न भूषवलेली शिवलीला आज ‘करो किंवा मरो’चा नारा देत आपल्या मुलांसह पतीसाठी प्रचारात उतरली आहे.

गेल्या काही निवडणुकांमध्ये शिवलीलाचा सक्रिय सहभाग नव्हता, पण आता संपूर्ण कुटुंबाने विनय कुलकर्णी यांचा प्रचार एक आव्हान म्हणून स्वीकारले आहे. शिवलीला घरोघरी प्रचारात व्यस्त आहेत आणि आपल्या पतीचे कटआउट घेऊन मतदारसंघात रॅली काढत आहेत. शिवलीला म्हणाल्या, “मी शक्य तितक्या लोकांना प्रत्यक्ष भेटून त्यांना आमच्या पक्षाला मतदान करण्यास सांगत आहे. आतापर्यंत जनतेचा प्रतिसाद चांगला आहे,” असे तिने सांगितले आणि आपला पती चांगल्या मताधिक्याने निवडणूक जिंकेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

- Advertisement -

कुलकर्णी यांची 25 वर्षीय मुलगी वैशालीने निवडणुकीच्या काळात आपल्या कुटुंबाला पाठबळ देण्यासाठी एलएलबी सेमिस्टरची परीक्षाही सोडली. ‘बाबा मतदारसंघात नसल्यामुळे आमच्यावरच सर्वांचे लक्ष आहे, त्याचे मला दडपण वाटते. आतापर्यंत काँग्रेसचा एकही वरिष्ठ नेता येथे प्रचारासाठी आलेला नाही. आम्ही स्वबळावर सर्व व्यवस्था करत आहोत,’ असे तिने सांगितले. वैशाली आपल्या धाकट्या भावासोबत एलईडी व्हॅनचा मार्ग निश्चित करून त्याद्वारे वडिलांच्या थेट संवादाची सोय करण्याची जबाबदारी पार पाडत आहेत. धारवाड विधानसभा मतदारसंघात 2.17 लाख मतदार आहेत आणि लिंगायत मते हा प्रमुख आणि निर्णायक घटक आहे. 1983पासून कोणत्याही पक्षाने किंवा उमेदवाराने ही जागा सातत्याने राखलेली नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -