नवी दिल्लीः नफरत की बाजार बंद और मोहब्बत की दुकान शुरू, अशी प्रतिक्रिया कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालावर दिली. या निकालात कॉंग्रेसचे उमेदवार आघाडीवर आहेत. तर भाजपची सुरुवात कासव गतीने झाली आहे.
कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालात कॉंग्रेस आघाडीवर आहे. आतापर्यंत कॉंग्रेसचे ५० उमेदवार विजयी झाले आहेत. तर कॉंग्रेसचे ८७ उमेदवार आघाडीवर आहेत. भाजपचे २१ उमेदवार विजयी झाले असून ४२ उमेदवार आघाडीवर आहेत. कॉंग्रेसच्या संभाव्य विजयावर कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी प्रतिक्रिया दिली.
राहुल गांधी म्हणाले, हा कर्नाटकमधील जनतेचा विजय आहे. कर्नाटकमधील कॉंग्रेसचे नेते, कार्यकर्ते आणि कॉंग्रेसला मदत करणाऱ्या सर्वांचा हा विजय आहे. या विजयासाठी मी कर्नाटकमधील जनता आणि सर्वांचे मी आभार मानतो. या सर्वांचे मी अभिनंदन करतो. या निकालाने दाखवून दिले की या देशातील जनतेला द्वेषाचे राजकारण आवडत नाही. इस देश को मोहब्बत अच्छी लगती है. अब नफरत की बाजार बंद हुई और महोब्बत की दुकान शुरू हो गई है.
मुळात ही निवडणूक धनाढ्य आणि गरीब अशी होती. आम्ही गरीबांचे प्रश्न घेऊन निवडणुकीला सामोरे गेलो. आम्ही गरीबांच्या बाजूने ठामपणे उभे राहिलो. त्यामुळे हा विजय गरीबांचा आहे. गरीबांनी धनाढ्यांवर विजय मिळवला आहे, असा दावा राहुल गांधी यांनी केला.
राहुल गांधी म्हणाले, आम्ही द्वेष सोबत घेऊन निवडणूक लढवली नाही. आम्ही प्रेम घेऊन जनतेसमोर गेलो. जनतेने आम्हाला कौल दिला. निवडणुकीत पाच आश्वासने आम्ही दिली होती. पहिल्याच कॅबिनेट बैठकीत आम्ही ही आश्वासने पूर्ण करणार आहोत.
कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात कॉंग्रेस आणि भाजपमध्ये चांगलीच जुंपली होती. निवडणुकीचा प्रचार सुरु असतानाच The Kerala Story चित्रपट प्रदर्शित झाला होता. निवडणुकीच्या प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या चित्रपटाचे समर्थन केले होते. कॉंग्रेसने चित्रपटावर टीका केली होती.
.