21 शतकात खाकी हाफपँट घालणारे कौरव, राहुल गांधी यांचा आरएसएसवर निशाणा

Rahul Gandhi criticizes Modi again from the petition filed against the sentence

नवी दिल्ली : काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर निशाणा साधला आहे. 21व्या शतकातही कौरव आहेत, जे खाकी हाफ पँट परिधान करतात आणि शाखा घेतता, अशी टीका त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) थेट नाव न घेता केली.

राहुल गांधी यांची कन्याकुमारी ते श्रीनगर अशी भारत जोडो यात्रा सुरू आहे. या यात्रेदरम्यान त्यांनी वेळोवेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तसेच भाजपावर हल्लाबोल केला आहे. आताही हरियाणातील कुरुक्षेत्रात त्यांनी सोमवारी नाव न घेता संघाची तुलना कौरवांशी केली. राहुल गांधी यांनी केवळ संघावरच निशाणा साधला नाही, तर पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही टीका केली. 21व्या शतकातही खाकी हाफ पँट घालणारे, हातात काठी असणारे आणि शाखा घेणारे कौरव आहेत. त्यांच्या पाठीशी 10-12 अब्जाधीश उभे आहेत, असे सांगून राहुल गांधी म्हणाले, नोटाबंदी कोणी लागू केली? नोटाबंदी, चुकीच्या जीएसटीवर नरेंद्र मोदींनी सही केली असेल, पण भारतातील 2-3 अब्जाधीशांनी पंतप्रधानांच्या हाताला काम दिले.

राहुल यांनी संघ किंवा पंतप्रधान मोदींवर अशा प्रकारे निशाणा साधण्याची ही पहिलीच वेळ नाही. भारत जोडो यात्रेदरम्यान त्यांनी अनेक वेळा अशाच पद्धतीने हल्ले केले आहेत. प्रत्येक वेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपा त्यांच्या निशाण्यावर असतात. राहुल गांधी यांच्या आणखी एका वक्तव्यावरून नवा वाद निर्माण झाला आहे. ‘हा देश पुजाऱ्यांचा नाही, तपस्वींचा आहे. भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे लोकांना त्यांची पूजा करण्यास भाग पाडतात, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे देशभरातील पुजारी नाराज झाले असून हरिद्वारपासून प्रयागराजपर्यंतचे पुजारी राहुल गांधींचा निषेध करत आहेत.

काँग्रेस पक्ष ही तपस्या करणारी संघटना आहे. तपश्चर्या करता तेव्हा त्यातून ऊर्जा मिळते. भाजपा ही पूजेची संघटना आहे. तुम्ही केलेल्या पूजेतून तर तिला शक्ती मिळते. पूजेचे दोन प्रकार आहेत. मी देवाची पूजा करतो आणि काहीतरी मागतो, अशी सर्वसाधारण पूजा आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पूजा वेगळी आहे. त्यांची बळजबरीने पूजा करावी, अशी त्याची इच्छा असते. पंतप्रधान मोदी यांचीही इच्छा आहे की, बळजबरीने त्यांची पूजा केली जावी आणि देशातील प्रत्येकाने त्यांची पूजा करावी. त्याचे उत्तर केवळ तपस्याच असू शकते. या प्रवासात काँग्रेसच नव्हे तर लाखो लोक तपश्चर्या करत आहेत, असे राहुल गांधी म्हणाले.