घरदेश-विदेशकेरळमध्ये पीएफआय छापेमारीविरोधातील बंदची हाक; अनेक भागात हिंसाचार, जाळपोळ

केरळमध्ये पीएफआय छापेमारीविरोधातील बंदची हाक; अनेक भागात हिंसाचार, जाळपोळ

Subscribe

एनआयए आणि ईडीने देशभरात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाशी संबंधित लोकांवर छापेमारी केली. टेरर फंडिंग प्रकरणात केंद्रीय तपास यंत्रणांनी पीएफआयच्या अनेक कार्यकर्त्यांनाही अटक केली आहे. मात्र पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाने (पीएफआय) केंद्रीय तपास यंत्रणेच्या छाप्यांविरोधात शुक्रवारी केरळ बंदची हाक दिली आहे. पीएफआयने पुकारलेल्या बंदमध्ये केरळच्या विविध भागात हिंसाचाराच्या घटना समोर आल्या आहेत. केरळमधील अनेत शहरांमध्ये तोडफोड आणि गोंधळाच्या घटना समोर आल्या, तर कोल्लममध्ये पोलिसांवर हल्ला झाला आहे. त्याचवेळी तामिळनाडूतील कोईम्बतूर येथील भाजप कार्यालयात तोडफोड केल्याचे वृत्त आहे.

तर तिरुअनंतपुरममध्येही बंदला पाठींबा देणाऱ्या पीएफआयच्या जवानांनी ऑटो रिक्षा आणि कारचे नुकसान केले. केरळमधील तिरुवनंतपुरम, कोल्लम, कोझिकोड, वायनाड आणि अलप्पुझा यासह विविध जिल्ह्यांमध्ये केरळ राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसेसवर दगडफेक करण्यात आली, सकाळी कन्नूरमधील नारायणपारा येथे न्यूजपेपर घेऊन जाणाऱ्या वाहनांवर पेट्रोल बॉम्ब फेकण्यात आल्याचे वृत्तही आहे.

- Advertisement -

अलाप्पुझा येथे केएसआरटीसी बस, टँकर लॉरी आणि काही इतर वाहनांवर पीएफआय समर्थकांनी दगडफेक केली. कोझिकोड आणि कन्नूरमध्ये पीएफआय कार्यकर्त्यांनी केलेल्या दगडफेकीत १५ वर्षीय मुलगी आणि रिक्षा चालक किरकोळ जखमी झाले. या घटनांच्या पार्श्वभूमीवर केरळ पोलिसांनी राज्यात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. पीएफआयने राज्यव्यापी बंद पुकारल्यानंतर कायदा व सुव्यवस्था सुनिश्चित करण्यासाठी जिल्हा पोलीस प्रमुखांना सुचना दिल्य़ा आहेत. तसेच कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल असे पोलिसांनी निवेदन जारी करत म्हटले आहे.

दरम्यान, केरळ हायकोर्टाने पीएफआयच्या बंदच्या हाकेवर कडक भूमिका घेतली आहे. या प्रकरणाची स्वत:हून दखल घेत उच्च न्यायालयाने संघटनेच्या नेत्यांवर गुन्हा दाखल केला. केरळ उच्च न्यायालयाच्या आधीच्या आदेशानुसार, परवानगीशिवाय राज्यात बंदचे आयोजन करता येणार नाही. NIA आणि इतर केंद्रीय तपास यंत्रणांनी काल PFI च्या कार्यालयांवर आणि त्याच्या प्रमुखांशी संलग्न असलेल्या देशभरात छापे टाकले होते. यादरम्यान 100 हून अधिक नेते आणि कार्यकर्त्यांना अटक करण्यात आल्याची माहिती आहे. अनेक ठिकाणी संतप्त कार्यकर्त्यांनी छापेमारी उधळण्याचा प्रयत्न केला, मात्र सीआरपीएफ जवानांनी त्यांचा प्रयत्न हाणून पाडला.

- Advertisement -

दरम्यान, सरकारी बस सेवा केएसआरटीसीने सांगितले आहे की, ते या बसेस चालवत राहतील. परिवहन महामंडळाने सांगितले की, गरज भासल्यास रुग्णालये, विमानतळ आणि रेल्वे स्थानकांपर्यंत पोहोचण्यासाठी विशेष सेवा चालवण्यात येतील. आवश्यकता भासल्यास पोलिस संरक्षणही मागविण्यात येईल, असे परिवहन महामंडळाने सांगितले.

देशभरातील छापेमारी दरम्यान केरळमध्ये सर्वाधिक २२ अटक करण्यात आली आहेत. अटक करण्यात आलेल्यांमध्ये पीएफआयचे विचारवंत पी कोया, राष्ट्रीय अध्यक्ष ओएमए सलाम, राष्ट्रीय सचिव नसरुद्दीन एलमारोम आणि प्रदेशाध्यक्ष सीपी मोहम्मद बशीर यांचा समावेश आहे. ट्रान्झिट वॉरंट मिळाल्यानंतर अटक केलेल्या या लोकांना दिल्लीला नेण्यात येणार आहे. अटक करण्यात आलेल्यांवर दहशतवाद्यांना निधी पुरवणे, तरुणांना अशांत भागात पाठवणे, देशाच्या विविध भागात अशांतता निर्माण करणे आणि हिंसाचार भडकावणे आदी आरोपांचा समावेश आहे.

NIA ने गुरुवारी PFI वर 15 राज्यांमध्ये 93 ठिकाणी छापे टाकले. केरळ-39, तामिळनाडू-16, कर्नाटक-12, आंध्र प्रदेश-7, तेलंगणा-1, उत्तर प्रदेश-2, राजस्थान-4, दिल्ली-2, आसाम-1, मध्य प्रदेश-1, महाराष्ट्र-4, गोवा- 1, पश्चिम बंगाल-1, बिहार-1 आणि मणिपूर-1 ठिकाणी छापे टाकण्यात आले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एनआयएचे सुमारे 300 अधिकारी शोध मोहिमेत सहभागी झाले होते. एनआयएच्या डीजींनी या कारवाईचे निरीक्षण केले. 2010-11 पूर्वी PFI प्रकरणांमध्ये एकूण 46 आरोपींना दोषी ठरवण्यात आले होते आणि PFI विरुद्धच्या प्रकरणांमध्ये 355 आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.


MMRCला मेट्रो 3 स्थानकांच्या नावांच्या अधिकारातून 200 कोटींहून अधिकचा महसूल मिळणार


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -