अंगावर कोब्रा सोडत पत्नीची हत्या करणाऱ्या दोषी पतीला दुहेरी जन्मठेपेची शिक्षा

Kerala court gives double life term to man in snake bite murder case
अंगावर कोब्रा सोडत पत्नीची हत्या करणाऱ्या दोषी पतीला दुहेरी जन्मठेपेची शिक्षा

अंगावर विषारी क्रोबा सोडत पत्नीची हत्या केल्याप्रकरणी केरळमधील एक दोषी पतीविरोधात आज कोर्टात अंतिम सुनावणी पार पडली. यावेळी कोर्टाने निर्दयी हत्येप्रकरणी दोषी पतीला दुहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. ही अत्यंत दुर्मिळ घटना असल्याचे सांगत कोर्टाने आरोपीच्या वयाकडे बघून त्याला मृत्यूदंडाची शिक्षा देत नसल्याचे म्हटले आहे. यावेळी कोर्टाने ही हत्या अत्यंत थंड डोक्याने आणि हेतुपुरस्सर केली असून माणुसकीला काळीमा फासणारी घटना असल्याचा ठपका ठेवला आहे.

३२ वर्षीय आरोपी पती सुरजने हुंड्यासाठी २५ वर्षीय पत्नी उत्तराचा छळ करत हत्या केली. या प्रकरणी कोर्टाने आता पत्नीच्या हत्येसाठी कोब्रा नागाचा उपयोग करणे, विष देणे, पुरावे मिटवण्याचा प्रयत्न करणे आणि हत्या असे गुन्हे आरोपीवर ठेवले आहेत. यापैकी विष देण्याच्या गुन्ह्यासाठी १० वर्षं आणि पुरावे मिटवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी ७ वर्षांची शिक्षा देण्यात आली आहे. ही शिक्षा भोगून झाल्यानंतर जन्मठेपेची शिक्षा सुरू होणार आहे.

नेमके प्रकरण काय आहे? 

केरळच्या सुरज आणि उत्तराचे दोन वर्षांपूर्वी लग्न झाले होते. त्यांना एक वर्षाचे मूलही आहे. सूरज उत्तराकडे अनेकदा हुंड्याची मागणी करत तिचा छळ करत होता. दरम्यान ७ मे २०२० च्या रात्री सूरज आणि उत्तरा जेवून झोपी गेले. दुसऱ्या दिवशी रोज लेट उठणारा सुरज सकाळी उत्तराच्या आधी उठला. त्याच रात्री पती सुरजने पत्नी उत्तरा झोपेत असताना तिच्या अंगावर कोब्रा साप सोडला. सापाच्या दंशामुळे तिचा मृत्यू झाला. या संपूर्ण कटाआधी त्याने पत्नीला झोपेच्या गोळ्या दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे. तपासात असेही समोर आले की, गेल्या वर्षी २ मार्च रोजीही सुरजने पत्नीची हत्या करण्याच्या उद्देशाने घरात कोब्रा सोडला होता.

मात्र या घटनेतून ती थोडक्यात बचावली होती. त्यावेळी तिला तिरवल्ला येथील खाजगी वैद्यकीय महाविद्यालयात तिच्यावर जवळपास १६ दिवस उपचार सुरु होते. रसेल वायपर साप चावल्यामुळे ती पूर्णपणे आजारी पडली यात तब्बल ५२ दिवस ती अंथरुणावर पडून होती. यानंतर तिची प्लास्टिक सर्जरीही करावी लागली होती. पोटच्या मुलीचा संसार वाचवण्यासाठी उत्तराच्या आईने सुरजला १० लाख रुपये रोख, मालमत्ता, नवीन कार आणि सोने दिल्याचा दावा केला. मात्र दोन वर्षांच्या अयशस्वी विवाहानंतरही त्याने अधिक हुंडा मागण्याचा प्रयत्न केला, असा आरोप उत्तराच्या आईने केला.

मात्र उत्तराच्या मृत्यूनंतर तिच्या कुटुंबीयांनी उपस्थित केलेल्या संशयावरून सुरजला २४ मे रोजी अटक करण्यात आली. यात १२ जुलै रोजी सुरजने त्याने कोल्लममधील परीपल्ली येथील गारुडी सुरेश कुमार यांच्याकडून १० हजार रुपयांना दोन वेळा साप खरेदी करुन तो पत्नीच्या अंगावर सोडल्याची जाहीर कबूली दिली. १ नोव्हेंबर रोजी दाखल केलेल्या आरोपपत्रानुसार, सुरजने दोन वेळा विषारी साप सोडून उत्तराला मारण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे कोर्टानेही सर्व घटनेचा तपास आणि त्य़ातील सुरजविरोधातील पुराव्यांचा आधारे त्याला दोषी जाहीर केले. त्यामुळे उत्तराचा जीव घेणाऱ्या पती सुरजविरोधातील निकालाची तिचे आई-वडील आतुरतेने वाट पाहत होते. मात्र आज या प्रकरणी कोर्टाने अंतिम निकाल जाहीर केला आहे.


पालिका चिटणीस विभागातील ‘सेवा जेष्ठता धोरण’ मंजूर