मुलांसाठी ऊन्हाळी सुट्टी आवश्यक, नुसतं पुस्तकी ज्ञान उपयोगाचे नाही; केरळ हायकोर्ट

 

केरळः ऊन्हाळी सुट्टी मुलांसाठी आवश्यक आहे. नुसतं पुस्तकी ज्ञान मुलांसाठी महत्त्वाचे नाही. वर्षभर अभ्यास करुन मुले कंटाळतात. अभ्यासातून काही काळ विश्रांती मिळावी म्हणून ऊन्हाळी सुट्टी दिली जाते, असे निरीक्षण केरळ उच्च न्यायालयाने व्यक्त केले.

दहावीच्या विद्यार्थ्याना नववीनंतर आरामाची गरज असते. त्यांना ऊन्हाळी सुट्टी द्यायला हवी. कारण पुढील वर्ष त्यांच्या आयुष्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असते, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे.

ऊन्हाळी सुट्टीत मुलांनी कुटुंब व मित्रांसोबत वेळ घालवायला हवा. केवळ पुस्तकी ज्ञान मुलांसाठी महत्त्वाचे नाही. मुलांना नाचू द्या, गाऊ द्या, त्यांच्या आवडीच खाऊ द्या, गृहपाठाची कोणतीही भीती न ठेवता त्यांना ऊन्हाळी सुट्टीचा आनंद घेऊ द्या. मुलांना त्यांच्या आवडीचे टीव्हीवरचे कार्यक्रम बघू द्या. मुलांना क्रिकेट खेळू द्या, फुटबॉल खेळू द्या, सहलीला जाऊ द्या. त्यांना त्यांच्या आवडीचा खेळ खेळू द्या, असेही न्यायालयाने नमूद केले.

न्या. पी.व्ही. कुन्हीकृष्णन् यांच्या खंडपीठाने हे निरीक्षण व्यक्त केले. सीबीएसई शाळेने ऊन्हाळी सुट्टीत अभ्यास वर्ग घेण्यास परवानगी मागितली होती. त्यास मुदतवाढ द्यावी, अशी शाळेची मागणी होती. ही मागणी न्यायालयाने फेटाळून लावली. १४ वर्षांच्यावरील मुलांचे ऊन्हाळी सुट्टीत अभ्यास वर्ग शाळा घेणार होती.

वर्षभर अभ्यास केल्यानंतर मुलांना आरामाची गरज असते. त्यासाठी ऊन्हाळी सुट्टी दिली जाते. विद्यार्थ्यांनी सुट्टीत मजा करून नंतर पुन्हा अभ्यासकडे वळतात. पुस्तकी अभ्यासातून मुलांचे लक्ष्य खेळाकडे वळवण्यासाठी ऊन्हाळी सुट्टी दिली जाते. खेळाचे ज्ञान पुस्तकातून मिळत नाही. म्हणून तर ऊन्हाळी सुट्टी दिली जाते, असे मत न्यायालयाने व्यक्त केले.

सीबीएसई बोर्डाच्या विभागीय संचालकांनी ऊन्हाळी सुट्टीत अभ्यासवर्ग घेण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी शाळेने केली होती. मात्र विभागीय संचालकांनी ऊन्हाळी अभ्यासवर्गांवर आक्षेप घेतला होता. केरळ सीबीएसई स्कूल मॅनेजमेंट असोसिएशनने न्यायालयात धाव घेतली होती.

मात्र केरळमधील हवामान आणि मुलांच्या आनंदाचा विचार करता अशा प्रकारे अभ्यासवर्गाला परवानगी देता येणार नाही, असे विभागीय संचालकांनी स्पष्ट केले होते. तसे परिपत्रकच संचालकांनी काढले होते. ९ मे रोजी न्यायालयाने या परिपत्रकाला अंतरिम स्थगिती देऊन ऊन्हाळी अभ्यासवर्गाला परवानगी दिली होती.

त्यावरील पुढील सुनावणी न्या. कुन्हीकृष्णन् यांच्यासमोर झाली. त्यात २०१८ च्या निकालाची प्रत न्यायालयात देण्यात आली. पालक, शिक्षक आणि विद्यार्थांची समंती असेल तर ऊन्हाळी सुट्टीत अभ्यासवर्ग घेता येतील, असा हा निकाल सांगतो. अभ्यासवर्गांना पायाभूत द्याव्यात असे आदेशही या निकालात देण्यात आले आहेत.

या निकालाशी मी सहमत नाही, असे न्या. कुन्हीकृष्णन् यांनी स्पष्ट केले. केरळच्या शैक्षणिक नियमानुसार शाळेचे सत्र मार्च महिन्यात संपते व जून महिन्यात पुन्हा सुरु होते. यामध्ये काही बदल असेल तर ते अधिकार संचालकांना देण्यात आले आहेत. या नियमाला याचिकेत आव्हान देण्यात आलेले नाही, असे न्यायालयाने नमूद केले.